सांब सदाशिव पाऊस दे

( पाऊस सुरू झाल्याने महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले संकट तूर्त तरी टळल्यासारखे वाटते. पण पावसानंतर धान्य पिकेल का? आणि पिकले तर ते स्वस्त मिळेल का? उशिरा का होईना, पर्जन्यराजा बरसला. तो ला निनोच्या कृपेने बरसला की इंद्राच्या कृपेने बरसला ह्या वादात जाण्याचे कारण नाही!.. मुळ मुद्दा असा की पाऊस पाडण्यासाठी देशातल्या आणि जगातल्या सरकारांना अजून तरी काही करता आलेले नाही. )
हवामानात बदल घडवून आणण्याचे प्रयोग अमेरिका आणि रशियात करण्यात आले. भारतातही कृत्रिम उपायाने पाऊस पाडण्याचे प्रयोग झाले. अजूनही ह्या प्रयोगांना म्हणावे तसे यश आलेले नाही हे वास्तव शिल्लक आहेच. बरे, पाऊस पडला तरी धान्य, भाज्या, फळे स्वस्त मिळण्याची आशा नाहीच. शहरी भागातली कृत्रिम टंचाई आपण समजू शकतो. परंतु ज्या गावात हे सारे पिकते तेथेही ते स्वस्त मिळू शकत नाही. कारण, शेतक-यांना द्यावा लागणारा पैसा गावक-यांच्या हातात नाही. जुन्या काळात पर्जन्यराजाची आराधना करण्याचे कल्पक मार्ग गावोगावी अवलंबले जात असत. देवाला पाण्यात कोंडणे हा एक लोकप्रिय मार्ग देशभरात अवलंबला जायचा. पेजएडिटर सीमा घोरपडे सादर करीत आहे अशीच एक गोष्ट सुप्रसिध्द लेखक साने गुरूजी ह्यांच्या ‘श्यामची आई’ पुस्तकातली! गावच्या ह्या गोष्टीतला नायक आहे गाव आणि साने गुरूजी स्वतः!
ह्या गोष्टीतली मागणी मजेशीर आहेः “सांब सदाशिव पाऊस दे शेते भाते पिकू दे
पैशाने पायली विकू दे” )
सांब सदाशिव पाऊस दे
त्या वर्षी पाणी पडे ना, पीक वाढेना. अवर्षणाची चिन्हे दिसू लागली. अवर्षण जावे व वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पध्दत आहे. गावात शंकराचे देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवावयाचे. सारा गाभारा पाण्याने भरून टाकावयाचा. भटजी रूद्र म्हणत असतात. काही लोक पाण्याचे हांडे भरभरून आणीत असतात व ओतीत असतात. सात दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा. सात दिवसच नाही, तर पाऊस पडेपर्यत. गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो, त्याची यादी होत असे व त्यांना ते वेळ वाटून देत. तसेच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावीत.
शंकरच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या -त्या ऋषीच्या- डोळ्यांसमोर सर्व ब्रह्मांड आहे, असे वाटते. भराभर सारी सृष्टी त्याच्या डोळ्यांसमोरून जात आहे, असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या सा-या गरजा त्याच्या डोळ्यांसमोर आलेल्या आहे, असे वाटते. तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे असे वाटते. माझ्या वडिलांना रूद्र येत असे. त्यांची पाळी रात्री बारानंतर येत असे.
आई मला म्हणाली, “ जा जा रे तू देवळात. पाणी आणावयास नाही का लागत, जा.”
“ मला नाही उचलणार ते हंडे. केवढाले हंडे व घागरी! ” मी म्हटले.
“ अरे आपली लहान कळशी घेऊन जा. नाही तर, तांब्या नेलास तरी चालेल. विहीरीतून एकेक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा. गणपतीच्या विहीरीवर उतरावयाचेही सोपे आहे. सरळ पायठण्या आहेत. जा, तो तांब्या घेऊन जा. ” आई म्हणाली.
“ एवढासा तांब्य ग काय घेऊन जायचे? तू म्हणशील झारी नाही तर पंचपात्रीच घेऊऩ जा. लोक हसतील तेथे! ” मी नाखुशीने म्हटले.
“ श्याम कोणी हसणार नाही. उलट, तू मोठी घागर उचलू लागलास, तर मात्र लोक हसतील. आपल्या शक्तीबाहेर काम करू पाहणे तेही वाईट; परंतु आपल्याला जेवढे काम करता येईल, तेही न करणे व आळशासारखा बसणे तेही वाईट. हे सा-या गावाचे काम आहे. तुला रूद्र म्हणात येत नाही, तर नुसते पाणी घाल. या कामात तुझा भाग तू उचल. प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. कामचुकारपणा वाईट.”
शेवटी मी उठलो. लहानशी कळशी देवळात गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती. शंकराला कोंडीत होती, पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते. पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती. मी त्यांच्यात मिळलो. मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले, “ श्याम, आज आलास वाटते? तू इंग्रजी शिकतोस, म्हणून लाज वाटत होती वाटते? ” मी काही बोललो नाही. लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती. वेदातला नव्हे हो, संस्कृतही नव्हेत, हो. त्यांचे मंत्र मराठीत होते.
सांब सदाशिव पाऊस दे
शेते भाते पिकू दे
पैशाने पायली विकू दे
हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेतेभाते पिकोत. स्वस्ताई होवो, असे देवाजवळ ती मुले मागत होती. मला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रूद्र येत नव्हता व हे बालमंत्र म्हणावयासही लाज वाटत होती. परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली. मी मोठमोठ्याने “सांबसदाशिव पाऊस दे” म्हणू लागलो; मीही त्या मुलांत मिसळून गेलो. त्यांच्याबरोबर नाचू लागलो.
सामुदायिक कामात आपणांसही जे करता येईल ते आपण निरलसपणे केले पाहिजे. त्यात लाज कशी बाळगायची? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे. हत्तीने हत्तीप्रमाणे.
साने गुरुजी
(‘श्यामची आई’ ह्या मराठीतील 1935 साली प्रसिध्द झालेल्या उत्कृष्ट पुस्तकातून)

जैनं जयति शासनम्

देशात आणि महाराष्ट्रात सत्तापालट होताच यंदा पर्युषण पर्व काळात पशुंची कत्तल आणि मांसविक्रीवर बंदी घालण्यावरून मुंबईत राजकीय वादळ उसळले. पर्वकाळात दोन दिवस मांसबंदी घालण्याचा शिरस्ता अनेक वर्षांपासून अस्तित्वात होता म्हणे. पण ह्यावेळची बंदी दोन दिवसांऐवजी पाच दिवसांची घालण्यात आली. त्यामुळे ठिणगी पडली. शिवसेना नेते आणि जैन संघटनात बरीच झमकाझमकी झाली. ह्या वादात असा प्रश्न उपस्थित होतो की ‘पर्युषण पर्व’ म्हणजे काय?
पर्युषण पर्व म्हणजे आपल्या आत्म्याशी जवळिक साधून तो अधिकाधिक शुद्धावस्थेप्रत नेणे. उपास हे शुद्धतेचे साधन आहे. पर्व संपल्यानंतर झाले गेले विसरून जाऊन एकमेकांची क्षमा मागून नववर्षांस सुरूवात करायची असते. मिच्छामी दुकड्ड्म  किंवा खमा खमा म्हणत एकमेकांना शुभेच्यांची अदानप्रदान सुरू असते. जैन पंथियात चार प्रमुख शाखा आहेत त्याखेरीज अनेक उपशाखाही आहेत. त्यामुळे साहजिक श्वेतांबरांचे पर्व 11 सप्टेंबरपासून सुरू झाले असून 18 सप्टेंबर रोजी ते संपेल. ह्याउलट दिगंबरांचे पर्व 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 27 सह्टेंबर रोजी संपणार आहे. त्या त्या पंथांच्या मुख्य मुनींचा जसा आदेश असेल त्याप्रमाणे पर्युषण पर्वाच्या तिथ्या ठरतात.
महत्त्वाचे म्हणजे जैनधर्म हा मुनिप्रणित असून तो निर्ग्रंथ आहे. भगवान महावीर ह्या धर्माचे संस्थापक म्हणून ओळखले जात असले तरी ते चोविसावे तीर्थंकर आहेत. त्यांच्यापूर्वीच्या 23 तीर्थंकरांनी जैन धर्मांची तत्त्वे निश्चित करत आणलेली आहेत. जैनांचे एक तीर्थंकर नेमिनाथ हे श्रीकृष्णाचे आतेभाऊ होते असे म्हणतात. शिवाजी सावंतांनी अंगिरस ऋषी हेच नेमिनाथ असे म्हटले आहे. अर्थात ब्रम्हजिज्ञासेनंतर ते ह्या निरीश्वर विचारांकडे वळले असावेत. ऋषभनाथापासून तीर्थंकरांची परंपरा सुरू होते. प्रत्येक युगात शलाका पुरूष अवतरत असतात. 24 तीर्थंकर हे शलाकापुरुषच आहेत.
भारतवर्षातल्या वैदिक धर्मप्रेरणांमागे ईश्वर प्रेरणा मुख्य असून त्या कल्पनेचा विकास होत होत आजचा हिंदू धर्म साकार झाला आहे. ह्याउलट जैन मतास ईश्वराची संकल्पना मान्य नाही. जैन आत्मा मानतात, पण ईश्वर मानत नाहीत. हिंदू संस्कृतीचा विकास ‘ब्राह्मण संस्कृती’ म्हणून ओळखला जातो तर जैन धर्म ‘श्रमण संस्कृती’ म्हणून ओळखला जातो. ह्याला ऐतिहासिक काळात ‘अर्हत’ म्हणूनही ओळखले गेले. जैन धर्म हा संपूर्ण विज्ञानवादी आहे. परंतु आत्म्याच्या उन्नतीवर भर देणारा आहे. जैन धर्माचा अर्थ आहे, जिनप्रणित कल्याण-मार्ग. ज्याने बाह्याभ्यन्तर विकारांवर विजय मिळवला तो जैन. रागव्देष, मोहादि विकार हे आत्म्याचे प्रबळ शत्रू आहेत. जैन ही रूढ अर्थाने ‘जात’ नाही. जो आत्मोन्नतीच्या मार्गावर चालतो तो जैन. आत्मोन्नतीच्या मार्गावर चालणा-यांना जैन धर्मात श्रमण म्हटले जाते तर हिंदू धर्मात आत्मोन्नतीच्या मार्गावर चालणारे ब्राह्मण!  श्रमणात श्रम, समता तसेच विकारशमन इत्यादि गुण अभिप्रेत आहेत. समतेमुळेच अहिंसा, अपरिग्रह इत्यादि पंचमहातत्वांची प्राप्ती होते. ज्यांना मुनीमार्गापर्यंत प्रगती करायची आहे त्यांना श्रमण संबोधले जाते. बाकी, संसारी जैनांना श्रावक म्हटले जाते. अर्थात केशालोचनादि विधी पार पडल्यानंतर कोणालाही मुनिमार्गाने जाण्याची परवानगी दिली जाते. स्यादवाद म्हणजे अनेकान्तवाद हे जैनमताचे अंतिम धर्म आहे. विश्वातले भिन्नत्व समाप्त झाले की तो निर्वाणाप्रत पोहचला.  जैन मुनींसाठी काय वाटेल ते करण्याची वा सोडून देण्याची श्रावकांची तयारी असते. जैन मुनींबद्दल भागवतादि ग्रंथात उल्लेख आहेत. ज्ञानेश्वरीत जैन मुनीची उपमा फारच वेगळ्या संदर्भात वापरली आहे. दिगंबर साधूंच्या गावात धोब्याला कुठून काम मिळणार, अशी पृच्छा ज्ञानेश्वरांनी केली आहे.
जैन धर्म निर्ग्रंथ असल्यामुळे ह्याही पंथात ग्रंथ असला पाहिजे असे विनोहबांना वाटू लागले. आमच्या गीतेप्रमाणे जैनांचाही एखादा ग्रंथ असला पाहिजे, अशी सूचना विनोबांनी जैन मुनींना केली. त्यानुसार समण् सुत्तं नावाचा 754 श्लोकांचा एक ग्रंथ सिद्ध करण्यात आला. सर्वसेवा संघाने तो प्रकाशित केला. समण् म्हणजे श्रमण. आणि सुत्तम म्हणजे सूत्र. ह्या ग्रंथासाठी उपलब्ध सर्व जैन पोथ्या धुंडाळण्यात आल्या. ज्यावर जैनांच्या चारी शाखांच्या मुनींचे मतैक्य झाले अशी 754 सूत्रे निवडण्यात आली. भगवान महावीराच्या पंचवीसशेव्या निर्वाण वर्षी हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी जैन मुनींची आणि श्रावक मंडळींची एक परिषद झाली. त्या परिषदेला तीनशे जण उपस्थित होते. महाराष्ट्रात अनेक मराठीभाषिक जैन आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील आणि रत्नप्पा कुंभार हे जैनधर्मीय होते. जैन धर्मालाही कधी काळी राजाश्रय होता असे महाराष्ट्राचा इतिहास सांगतो.
सीमा घोरपडे
(समणसुत्तंच्या आधारे)

 

महाराष्ट्र सुलतानी काळातला

(पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी निवडणूक प्रचार सभांतून सुशासनाची घोषणा केली होती. त्यांचे सुशासन केंद्रीय मंत्रीमंडळापुरते तरी अमलात आलेले दिसते. अनेक मंत्री समित्या त्यांनी बरखास्त केल्या. मंत्रिमंडळाचा सर्व कारभार त्यांनी स्वतःच्या हातात घेतलेला दिसतो. नियोजन मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. परंतु जिल्हा स्तरावरचे प्रशासन बदलले का? दिल्लीत कोणतेही सरकार आले तरी जिल्हा पातळीवर मात्र प्रशासनात फारसा बदल झालेला दिसत नाही. देशात अगदीच काही अस्मानी सुलतानी आलेली नाही हे खरे;  परंतु कशी होती अस्मानी सुलतानी’? गुलशन ए इब्राहिम ह्या पुस्तकात अस्मानीवर नाही परंतु सुलतानीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ह्या पुस्तकाचा लेखक फरिस्ता हा स्वतः अनेक सुलतानांच्या आतल्या गोटात वावरणारा होता. त्यामुळे महाराष्ट्रावर दोनशे वर्षे राज्य करणा-या बहामनी आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या पाच सुलतानांच्या काळात कसे होते प्रशासन? त्याच्या पुस्तकात जे चित्र दिसते ते असे की सुभ्यावर सत्ता कोणाचीही असो, मुलकी राज्यकारभार मात्र देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील आणि कुलकर्णी ह्याच वतनदारांच्या हातात होता. त्यांच्याकडे जमिनी महसुलाची वसुली करण्याचे काम होते. सुलतानाच्या दरबारात कुर्नीसात करून वतन मिळवावे ह्याचे त्या काळी जनतेला अतिशय वेड होते. कधी स्वेच्छा तर कधी बळजबरीने धर्मान्तर सोडल्यास मध्यमयुगीन कालखंडात बहमनी राज्यकर्त्यांकडून त्याकाळच्या हिंदू समाजात आणि रुढ आर्थिक आणि सामाजिक स्थितीत ढवळाढवळ करण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. -सीमा घोरपडे, पेजएडिटर)
बहमनी राजघराण्याची स्थापना जरी दौलताबाद येथे झाली असली तरी काही काळानंतर बहमनींनी आपली राजधानी महाराष्ट्राबाहेर गुलबर्गा येथे नेली. बहमनींचा अंमल सर्व दक्षिण किंवा सर्व महाराष्ट्र यावर पूर्णपणे कधीच नव्हता. बहमनींच्या काळात बहमनी राज्याचे जे विभाग पाडले होते त्यांचा राज्यकारभार हा ज्या अधिका-याच्या हाती असे ते अधिकारी लष्कारातील मनसबदार असत.
बहमनींचे राज्य स्थापन होण्याचे अगोदर दिल्लीच्या सुलतानांनी दक्षिणेमध्ये जी राज्ययंत्रणा स्थापन केली होती तिच्यामधे फारसा बदल करण्याची जरुरी बहमनींना आपल्या राज्याची विभागणी राज्यकारभाराच्या सोयीकरिता वेगवेगळ्या प्रांतामध्ये केली आणि त्यावर मनसद-ई-अली, आजम –ई हुमायून आणि मलिक-नायब हे अधिकारी नेमले. हे प्रांत म्हणजे दौलताबाद, व-हाड, बीदर आणि गुलबर्गा हे होते. हे प्रांत महमदशहा पहिला याच्या कारकिर्दीत पाडण्यात आले. ही राज्यव्यवस्था जवळजवळ शंभर वर्षेपर्यंत टिकली.
प्रांताची पुनर्रचना तिस-या महमदशहाच्या कारकिर्दीत महमूद गावान याने केली. या शंभर वर्षात बहमनींच्या ताब्यातील प्रदेशात बरीच भर पडली होती, साहजिकच सत्तेत भर पडून प्रांतिक सुभेदारांची वृत्ती बंडखोरीकडे वळली होती, पुढील धोका ओळखून महमूद गावान याने प्रांतिक सुभेदारांची सत्ता कमी करुन त्यांच्या वर्चस्वाला आळा घालण्याचे ठरविले, त्यानुसार बहमनी राज्याची विभागणी गावील, माहूर, दौलताबाद, जुन्नर, विजापूर, अहसनाबादगुलबर्गा, राजमहेंद्री आणि वरंगळ या आठ भागात करण्यात आली. महमूद गावान याने या विभागांचे तरफदार हे प्रांताधिकारी नेमले होते त्यांच्या अधिकारांवर अजून बंधने आणली. त्यांच्या ताब्यातील प्रदेशांपैकी काही भाग नविनसुधारणांप्रमाणे त्याने सुलतानाच्या अमलाखाली आणली. (खासा- ई- सुलतानी). बहमनी राज्याची नव्या त-हेने विभागणी झाल्यामुळे लष्करी संघटनेतही बदल करणे क्रमप्राप्त झाले. महमूद गावानने बहमनींच्या लष्करी संघटनेत आमुलाग्र बदल केले, प्रांतातील केवळ एकच किल्ल्याचा ताबा तरफदाराकडे ठेवण्यात आला तर बाकीच्या किल्ल्यावरील किल्लेदारांच्या नेमणूका केद्रींय सरकारकडून केल्या जाऊ लागल्या त्याचप्रमाणे प्रत्येक मनसबदार किंवा जहागिरदार यांच्यावर विशिष्ट संख्येने सैनिक ठेवण्याची सक्ती करण्यात आली, या सुधारणांमुळे तरफदार असंतुष्ट झाले. त्याची परिणती महमूद गावान याच्या खूनात झाली.
बहमनी सुलतान जहागिरीदाखल फारच क्वचित राज्यामधील जमिनी देत असत. ज्यावेळी अशी जमीन जहागिरीदाखल दिली जाई त्यावेळी जहागिरदाराच्या कार्यक्षेत्रापासून ती ब-याच दुर असे. जहागिरीचे अस्तित्व हे सुलतानाच्या मर्जीवर अवलंबून असे. ज्या प्रदेशावर अथवा प्रांतावर जहागिरदारांची निवडणूक होई त्याच्या कारभारासाठी ते सुलतानाला जबाबदार असत, याउलट त्यांच्या जहागिरीवर मात्र त्यांची संपूर्ण सत्ता चाले, जहागिरी प्रमाणे बहमनींनी मोकाशाची पद्धती अनुकरणात आणली. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला मोकासादार नेमले जाई, त्यावेळी त्याला दिलेल्या प्रदेशातील (परगणा) वसुलाची जबाबदारी त्याच्यावर असे. जहागिरदाराप्रमाणेच मोकासदाराच्या अधिकारांचे स्वरुप दुहेरी असे.
बहमनींच्या राज्यकारभारात वर उल्लेख केल्याप्रमाणे इराण, तुर्कस्थान आणि इतर अरब देश यामधून आलेल्या आणि त्याचप्रमाणे हबसाणातून आलेल्या व्यक्तीचा पुष्कळच भरणा होता. या व्यक्तीमध्ये खलफहसन बसरी, महमूद गावान, युसुफ आदिल, सुलतान कुली आणि अमिर बरीद यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. बाहेरुन आलेले मुसलमान यांच्यामध्ये उत्पन्न झालेल्या स्पर्धेमुळे बहमनींच्या राज्यात झालेल्या यादवी युद्धांचा उल्लेख वर आलेला आहेच. हे युद्धच बहमनींच्या विनाशाचे कारण ठरले. बहमनींच्या राज्यात हिंदूना मोठ्या अधिकाराच्या जागा जवळ-जवळ नव्हत्याच. परदेशी मुसलमान आणि दक्षिणीमुसलमान यांच्यातूनच या जागांवर भरती केली जाई. बहमनींच्या राजवटींच्या शेवटच्या एकदोन वर्षात ज्या एक-दोन हिंदू    अधिका-यांची नावे होती, त्यात मुधोळच्या घोरपडे घराणे होते. मध्ययुगीन महाराष्ट्रात सरकार हे बहुसंख्य हिंदूवर राज्य करणा-या अल्पसंख्य मुसलमानांचे होते असे विधान केल्यास काहीच चूक होणार नाही.
मुलकी राज्यकारभारात बहमनींनी प्रचलित पद्धतीत फारसा बदल केला नाही. मुलकी राज्यकारभार ज्या वतनदारांच्या हाती असे ते म्हणजे देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील आणि कुलकर्णी हे होत. त्यांच्याकडे जमिनीपासून येणा-या कराची वसुली करण्याचे काम होते, महाराष्ट्रामध्ये जनतेला वतनाचे अतिशय वेड होते, मध्यमयुगीन कालखंडात बहमनी राज्यकर्त्यांकडून त्याकाळच्या हिंदू समाजात आणि त्या समाजाच्या रुढ आर्थिक आमि सामाजिक स्थितीत ढवळाढवळ करण्याचे फारसे प्रयत्न झाले नाहीत.
1481 साली महमूद गावानच्या झालेल्या खुनानंतर बहमनी राज्याच्या विघटनास सुरुवात झाली. बहमनी राज्यातून अहमदनगर, विजापूर, व-हाड, बीदर आणि गोवळकोंडा ही पाच राज्ये निर्माण झाली. त्याशिवाय बहमनीचे समकालीन असे खानदेशचे राज्य होते ते सहावे. वर उल्लेखिलेल्या पाचही शाह्यात बहमनींच्या काळी अस्तित्वात असलेली राजयंत्रणा थोड्याफार फऱकाने पुढे चालू ठेवण्यात आली. फरिश्ता आणि सयद्दअली हे या शाह्यांच्या थोडेफार समकालीन असल्यामुळे या राज्ययंत्रणेची बरीचशी माहिती आपल्याला अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडून मिळते.
(गुलशन ए इब्राहीम ह्या पुस्तकाची प्रस्तावना)