पेशवाईची अखेर कशी झाली?

(पुण्यावर चाल करून जाणा-या इंग्रज फौजेत 500 महार सैनिक सामील झाले होते. त्या सैनिकांनी अतुलनीय पराक्रम गाजवला ह्यात शंका नाही. परंतु!.. परंतु दुस-या बाजीरावाची कारकीर्द पुष्कळच खिळखिळी झालेली होती. मराठेशाहीच्या अस्ताला कारणीभूत ठरलेले राजकारण कसे घडले? त्या राजकारणाची साधार हकिगत ज्ञानकोशकार ग. वि. केतकर ह्यांनी दिली आहे. -पेजएडिटर सीमा घोरपडे)

बाजीराव रघुनाथ पेशवे (१७७५ – १८५१) – या पेशव्याचा जन्म धार येथे झाला (७ जानेवारी १७७५). दादासाहेब जिवंत असेपर्यंत बाजीराव उर्फ रावबाजी हा त्यांच्याजवळ असे. दादांच्या पक्षपाती मंडळीने स.१७८४त सवाई रावसाहेबांना काढून रावबाजीला गादीवर बसविण्याची खटपट चालविली, पण ती फुकट गेली. यावेळेपासून नाना फडणविसाच्या मनांत रावबाजीबद्दल तेढ बसली. रावबाजी उंच, गोरा, भाषणाने दुस-यावर छाप पाडणारा, धर्मभोळा, भव्य, उतावळा संशयी व अनिश्चित मनाचा होता. स्वतः लढवय्या व मुत्सद्दी नसल्याने आणि भोवतालची बहुतेक सर्व मंडळी हलकट, नीच, फितुरी असल्याने नाना फडणविसाच्या पश्चात रावबाजीच्या हातून मराठी राज्य निभावणें कठिण गेले, तरीहि त्याने शेवटपर्यंत धडपड केली होती व त्याबद्दल कांही इंग्रज ग्रंथकरांनीहि त्याच्याविषयी स्तुतिपर उद्गगार काढलेले आहेत. सर्व आभाळच फाटल्यावर एकटया रावबाजीचे कांही चालण्यासारखे नव्हते.

त्याला जुन्नरास नेऊन ठेवल्यानंतर रावबाजीने तेथून गुप्तपणे सवाईरावसाहेबांशी पत्रव्यवहार चालवून आपल्याविषयी त्यांचे मत उत्तम बनविले. सवाईरावसाहेब वारल्यावर प्रथम यशोदाबाईंच्या मांडीवर दत्तक देऊन गादी चालविण्याचे दरबा-यांचे ठरले. परंतु बाळोबा पागनीस त्यास कबूल होईना व पुण्याचे लोकहि म्हणू लागले की प्रत्यक्ष वंश (रावबाजी) हयात असतां, दत्तक देऊन का घ्यावा? एवढी बातमी समजतांच रावबाजीने बाळोबास वश करून शिंद्यांस चार लक्षांचा मुलुख व दोन कोट रुपये स्वारीखर्च कबूल करून आपल्यास गादीवर बसविण्याचे कारस्थान केले. परंतु शिंदे येण्यापूर्वीच हें कारस्थान समजल्यावरून नानांनीच पुढाकार घेऊन रावबाजीस पुण्यास आणले (१७९६). परंतु शिंदे जवळ आल्याचे ऐकून नाना साता-याकडे गेले व पागनिसाने रावबाजीला त्याच्या दुटप्पी स्वभावामुळे नजरकैद करून व चिमणाजीअप्पास यशोदाबाईंच्या मांडीवर दत्तक देऊन पेशव्यांच्या गादीवर बसविले. इकडे नानानी प्रख्यात महाडचे राजकारण करून रावबाजीस गादीवर बसविले. (ही सर्व माहीती नाना फडणवीस यांच्या चरित्रांत पहा. ज्ञा. को. वि. १६) रावबाजीस नाना अगर शिंदे यांचे वर्चस्व नको होते त्यामुऴे प्रथम त्याने शिंद्याकडून नानांस कैद करविले (१७९७) व अमृतरावास आपला कारभारी नेमले. पुढे शिंद्याला टाळण्याचा त्याचा विचार होऊन त्याने कवायती पलटणे वाढविण्याचा प्रयत्न केला. हा त्याचा प्रयत्न इंग्रजांना समजला होता (१७९८). शिंद्यास कबूल केलेले दोन कोट रु. देण्यासाठी रावबाजीने सर्जेरावास पुण्यांतून पैसा वसूल करण्यास परवानगी दिली, त्यामुळे त्याने पुण्यांतील लोकांचा फार छळ केला (घाटगे पहा). त्यामुळे रावबाजी चिडून त्याने अमृतरावाच्या साहाय्याने शिंद्यास पकडण्याचा बेत केला परंतु आयत्या वेळी त्याचा धीर न होऊन उलट त्याने दौलतरावास अमृतरावाबद्दल सावध केले (नाना फडवणीस पहा). रावबाजीने प्रथम आपण होऊनच सातारकर राजास स्वतंत्रता देऊन नानांचा हस्तक आपटे यास कैद करविले होते. त्यामुळे सातारकर, कोल्हापूरकर आणि दौलतराव एक होऊन त्यांनी दंगा माजविला, शिवाय रावबाजीच्या सैन्यानेहि पगारासाठी दंगा केला. तेव्हा परशुरामभाऊ व नानांची विश्वासु मंडळी यांना रावबाजीने सोडले व भाऊकडून १० लक्ष रु. दंड घेण्याचे ठरविले. भाऊने सातारकराचा दंगा मोडला. इकडे शिंद्यांच्या बायांचे प्रकरण उद्भवले होते, त्याला आंतून रावबाजीची फूस होती ­­(१७९८). अखेर दौलतरावाने नानांस मोकळे केले. (नाना फडणवीस पहा) त्याने सर्वत्र स्थिरस्थावर केले. याच वेळी इंग्रजांनी तैनाती फौजेचा डाव पेशव्यांवर टाकला, पण नानानी तो धुडकावून दिला. रावबाजीने शिंद्यास मुद्दाम पुण्यास ठेवून घेतले याचे कारण त्याला नानांची भीति वाटत होती. पुन्हां एकदां नानानां पकडण्याची खटपट रावबाजीने केली त्यामुळे नानांनी आपले कारभारातील लक्ष बरेचसे कमी केले. रावबाजीने ठरल्याप्रमाणे टिप्पूवरील इंग्रजांच्या शेवटल्या स्वारीत मदत केली नाही त्यामुळे मराठयांना टिप्पूच्या राज्याची वाटणी मिळाली नाही. या वेळी पुन्हा कोल्हापूरकराने व शिंद्याच्या बायांनी त्रास दिल्यावरून परशुरामभाऊंस त्यांच्यावर धाडले, परंतु ते या मोहिमेत गारद झाले. त्यावर भाऊचा पुत्र आप्पा याने कोल्हापूरकराची चांगलीच खोड मोडली, ते राज्य हस्तगत होण्याची वेळ आली इतक्यांत इकडे नानांस देवाज्ञा झाली (मार्च १८००), त्यामुळे पुन्हा सर्वत्र बेबंदशाही माजली. रावबाजीने नानांची सर्व संपत्ति व जहागीर जप्त केली व नानांच्या पक्षाच्या मंडळीस कैद केले. आणि दौलतरावास भाऊंची जहागिरी लुटण्यास परवानगी दिली. याच सुमारास धोंडया वाघाचे पारिपत्य करण्यासाठी इंग्रजी सैन्य पेशव्यांच्या राज्यांतून गेल्याचे दौलतरावास पसंत पडले नाही, त्याबद्दल त्याने पेशव्यांस दोष दिला. होळकराने इंग्रज लोकांच्या चिथावणीवरून शिंद्याच्या प्रांतांत दंगल उडविल्या कारणाने शिंदे तिकडे जाण्यास तातडीने निघाला. फौजबंद शिंदे जोपर्यंत पुण्यांत आहे, तोपर्यंत रावबाजी आपल्या तडाख्यांत सांपडत नाही हे जाणूनच इंग्रजांनी होळकरास चिथावणी दिली होती. त्याप्रमाणे शिंदे तिकडे निघून गेला. यांनतर रावबाजीने ज्या ज्या घराण्यांनी राघोबादादास व स्वतःस त्रास दिला होता त्यांचा नाश करण्याचा उद्योग आरंभिला, त्यांत रास्ते घराणे प्रमुख होते (१८०१). यशंवतराव होळकराचे मनहि रावबाजीविरुध्द होते त्यामुळे इकडे विटोजी होळकर दंगल करीत असता पकडला गेल्याने रावबाजीने बाळाजी कुंजीरच्या सल्ल्याने त्यास हत्तीच्या पायी दिले. त्याचा परिणाम वाईट होऊन यशवंतराव होळकराचे व रावबाजीचे वैर जुंपले. यावेळी यशवंतराव जर आपल्यास २५ लक्षांचीं नजर देईल तर त्यास आपण होळकरशाहीची सरदारकी देऊं असे रावबाजीने जाहीर केले. तिकडे यशवंतरावानें शिंद्याचा पराभव केल्याने त्याने पुण्याहून सर्जेराव घाटग्यास मदतीस बोलविले. या घाटग्यानें पुण्यास लुटण्याचा धुमाकूळ घातला होता व पैशासाठी तो रावबाजीस तगादेहि लावीत होता. तो उत्तरेकडे गेला, परंतु होळकराच्या माने वगैरे सरदारांनी पेशव्यांच्या मुलुखांत धुमाकूळ सुरू केला (१८०२) व थोडयाच दिवसांनी खुद्द यशवंतरावहि पुण्याच्या रोखे आला आणि त्याने पेशवे याचा पुण्यास पराभव केला. यशवंतरावास पुण्यास अमृतराव पेशवे याने बोलावून आणले होते. कारण त्याचे व रावबाजीचे वांकडे आले होते. यावेऴी बाऴोजी कुंजर व चिंतोपंत देशमुख हे कारभारी होते (१८०२ ऑक्टो). रावबाजी पुण्याहून निघून सिंहगडास गेला व तेथून त्याने इंग्रजांकडे मदत मागितली, इतक्यांत होळकराची फौज मागे आल्याने रायगड, सुवर्णदुर्ग वगैरे मार्गाने वसईस तो इंग्रजांकडे येऊन दाखल झाला. तेथे मराठी राज्याची सत्ता ज्यामुळे इंग्रजांच्या हाती सर्वस्वी गेली तो तह रावबाजीने नाइलाजाने इंग्रजांशी केला (डिसेंबर). लागलीच त्यास पश्चाताप होऊन तो मोडण्याचा प्रयत्नहि त्याने सुरू केला. शिंदे व भोसले यांनां त्याने आपल्या मदतीस (होळकराविरुध्द) बोलाविले. इकडे अमृतरावाचे व होळकराचे पुढे पटेना म्हणून होळकरांने पुणे जाळून व लुटून सात कोटींची रक्कम गोळा करून उत्तरेचा रस्ता धरला आणि रावबाजी इंग्रजांच्या मदतीने पुण्यास येऊन पुन्हां गादीवर बसले (१८०३ मे.) त्यामुऴे शिंदे व भोसले यांनां राग आला व त्यांनी होऴकरासहि आपणांस मिऴण्याबद्दल विनविले, पण त्याने ते ऐकले नाही. तेव्हा शिंदे व भोसले यांनीच इंग्रजांविरुध्द लढाईची तयारी चालविली. वसईचा तह ठरविण्यापूर्वी आपला सल्ला रावबाजीने घ्यावयास पाहिजे होता असे त्यांचे म्हणणे होते. इंग्रज सर्व मराठी साम्राज्य काबीज करीत आहेत हे आतां या सरदारांच्या लक्षांत आले व त्यांनी त्याविरुध्द प्रतिकार सुरू केला. परंतु आतां उशीर झाला होता व इंग्रजहि सावध होऊन त्यांनी आपली तयारी जारीने केली होती. आसई येथे इंग्रजांची व या सरदारांची लढाई होऊन सरदार मागे हटले. या लढार्इंत पेशव्यांचे सैन्य इंग्रजांतर्फे लढत होते. परंतु रावबाजीची आंतून सरदारांना मदत होती, बाळोजी कुंजर शिंद्याच्या छावणीत होता (आगष्ट), शिंदे व भोसले यांनी पुढे इंग्रजांशी स्वतंत्र तह केले त्यांत मिळालेला मुलूख इंग्रजांनीच घेतला, फक्त अहमदनगरचा किल्ला पेशव्यांस दिला, व तुम्ही मदत करण्यांत कुचराई केली असा त्यांच्यावर आरोप ठेविला (डिंसेबर). याच वेळी पेशव्यांच्या राज्यांतील बंडाळी मोडण्याच्या निमित्तावर खुद्द पुण्यास इंग्रजांनी आपले बरेच सैन्य ठेविले. तिकडे होळकराने इंग्रजांशी लढाई केली, ती दीड वर्ष चालून, अखेरीस इंग्रजांनां होळकराचा घेतलेला सर्व प्रांत त्यास परत द्यावा लागला. यावेळी रावबाजीने व शिंद्याने होळकरास प्रत्यक्ष मदत केली नाही, मात्र आंतून त्याची सहानुभूति होती (१८०५ नोव्हेंबर).

यावेळी मराठी साम्राज्यवृक्षाच्या सर्व फांद्या तुटून गेल्या होत्या. सालबाईच्या तहाने (१८८३) इंग्रजांनी पेशव्यांचा शिंद्यावरील धनीपणा उडविला होता, मॉनिंग्टनने तैनाती फौजेच्या जोरावर हेंच धोरण पुढे रेटले, पेशव्याने तर आपला पुष्कळच प्रांत आतापर्यंत इंग्रजांना दिला होता, त्याचा परराष्ट्रीय संबंध इंग्रजांच्या हाती होता व तोहि यावेळी त्यांच्याच जोरावर गादीवर स्थिर झाला होता. याचवेळी शिंदे, होळकर, भोसले व गायकवाड यांनी पेशव्यांना एकीकडे सारून स्वतःच इंग्राजांशी तह केले, मराठयांचा प्रतिस्पर्धी मोंगल पातशहा व निजाम हे यापूर्वीच इंग्रजांच्या कबज्यांत गेले होते. याप्रमाणे साधारण ५।६ वर्षांच्या अवधींत पेशवे व त्यांचे सरदार आपल्याच गैरमुत्सद्दीपणाने परतंत्र बनून गेले. आतां त्यांनां आपल्या चुक्या दिसून आल्या, परंतु आता उशीर होऊन गेला.

रावबाजी मुत्सद्दी नव्हता तरी कारस्थाने मात्र पुष्कळ करी, शिवाय ”ज्याच्यावर त्याचा पूर्ण भरवसा बसेल असा यावेळी एकहि माणूस त्याच्याजवळ नव्हता” असे खुद्द डफच म्हणतो. बहुतेक सरदार लोक नाकर्ते, लालचावलेले व कोत्या बुध्दीचे होते. त्यामुळे पेशवा भांबावून जाई व त्याच्या हातून एकहि मसलत पुरी होत नसे. तरी पण डफ म्हणतो की, ”जेव्हां जेव्हां वेळ येई तेव्हा बाजीराव महाराष्ट्रांतील सर्व संस्थानिकांवर व जहागिरदारांवर आपला ताबा आहे हे प्रतिपादन करण्यास केव्हाहि माघार घेत नसे.” इंग्रजांची फौज पुण्यास होती तरीहि एकदा हुजरतने बंडाळी केली, ती इंग्रजांनी खंडेराव रास्त्याच्या हातून नाहीशी केली. इंग्रजानी जवळ जवळ आपल्या हातांत हा कारभार घेतला तरीहि राज्याची स्थिति दिवसेंदिवस वाईट होत चालली. भिल्लांचे बंड (१८०४), मान्याची लूट (१८०५), चतुरंसिंगाचे बंड वगैरे गोष्टी घडल्यानंतर पेशव्यानें प्रतिनिधीस बंदीत टाकून बापू गोखल्यास त्याची बहुतेक जहागीर दिली (१८०७).

क्लोज हा पुण्यास रेसिडेंट असेपर्यंत साधारण वरील प्रकार घडून आले. त्याच्या हाताखाली खुश्रूशेट मोदी होता. त्याचे पेशव्यांशी संधान होते. पुढे क्लोज जाऊन एलफिन्स्टन आला (१८११). हा मोठा खोल मुत्सद्दी होता. त्याने सर्व कारभार आपल्या हातांत घेतला. खुश्रू वगैरे देशी लोकांच्या तंत्राने चालण्याचे रहित केले. पेंढा-यांचा उपद्रव राज्यांत फार झाल्याने पेशव्याने आपल्या जहागिरदारांनां फौजा पाठविण्यांस आज्ञा केली. परंतु याच जहागीरदारांचा बराचसा प्रांत पेशव्याने जप्त केला होता, शिवाय परभारे इंग्रजांनी त्यांनां आपल्या पंखाखाली घेतले होते म्हणून त्यांनी पेशव्यांच्या हुकुमाकडे दुर्लक्ष केले. याचा फायदा घेऊन खुश्रूने (एलफिन्स्टनच्या अंतस्थ सूचनेवरून) पेशव्यांस इंग्रजी फौज ठेवण्यास सांगून, फोर्डच्या हाताखाली, जिच्यांत इंग्रजांच्या ताब्यांतीलच लोक जास्त होते अशी एक मोठी पलटण तयार करविली. इंग्रजांशी लढण्याचा प्रसंग आल्यास ही फौज आयती इंग्रजांनांच उपयोगी पडेल ही गोष्ट पेशव्यांच्या लक्षांत आली नसावी. यावेळी सातारकर चतुरसिंगाने फार धुमाकूळ घातल्याने त्रिंबकजी डेंगळयाने त्याला पकडून कैदेत ठेविले, तेव्हां त्याचा एक तोतया निघाला (१८१२). यावेळी सदाशिवराव माणकेश्वर हा पेशव्यांचा दिवाण होता. हा मूळचा हरिदास, त्यामुळे राजकारणांत कच्चा होता. याच्यावर एलफिन्स्टननें मोदीच्या साहाय्याने शह बसविला. मोदीचा व याचा कर्नाटकच्या सुभेदारीमुळे वाद माजला होता. यावेळी आपली फौज वाढवून (कारण पेशव्यांजवळ सारे अडीच हजार घोडदळ व तीन हजार पायदळ होते) पुन्हां एकदा सर्व सरदारांच्या साहाय्याने इंग्रजांशी लढाई द्यावी असे पेशव्याने मनांत ठरवून पेंढा-याच्या निमित्ताने फौज वाढविण्यास सुरूवात केली व शिंदे, होळकर, भोसले वगैरशी गुप्त तह केले. यावेळी त्रिंबकजी डेंगळे हा पेशव्यांचा मुख्य सलजगार बनला (१८१५). या सुमारास पेशवाई राज्याचा वसूल १ कोट १० लक्षांचा होता, मामलती मक्त्याने देण्यांत येऊं लागल्याने अंदाधुंदी माजली.

इतक्यांत गायकवाडांची भानगड निघाली. गायकवाड अद्यापीहि नांवाचा पेशव्यांचा चाकरच होता, त्याच्याकडील बाकी वसूल करणे व गुजराथचा पुढील इजारा देणे या भानगडी पेशवे व गायकवाड यांच्यांत चालावयाच्या होत्या. त्यांत इंग्रजांचा अर्थाअर्थी संबंध नव्हता, परंतु त्यांच्या जोखमदारीवर गंगाधरशास्त्री पुण्यास आला. बरीच वाटाघाट होऊन अखेरीस फलप्राप्ती न होता बडोद्याच्याच एका पक्षाकडून गंगाधरशास्त्रयाचा खून पंढरपुरास झाला (गायकवाड, ज्ञा. को. १२ पहा). त्याचा आळ इंग्रजांनी त्रिंबकजीवर घेऊन त्यास सैन्याच्या जोरावर ताब्यांत घेतले (१८१५). परंतु त्रिंबकजी त्याला ठेवलेल्या ठाण्याच्या तुरुंगांतून पळाला व पुन्हा गुप्तपणे पेशव्यास येऊन मिळाला (१८१६). या सुमारास माणकेश्वर, मोरदीक्षित व चिमणाजीपंत हे पेशव्यांचे सल्लागार होते. त्रिंबकजीने बरीच फौज जमवून फुलगांवी पेशव्यांचीं गुप्त भेट घेऊन बेत ठरविले, परंतु एलफिन्स्टन यास ही माहिती लागून त्याने या त्रिंबकजीच्या फौजेचा पराभव केला, तसेच तिच्या मदतीस नाशीककडे जी दुसरी फौज गोळा झाली होती तिचाहि (या दोन फौजांची भेट होण्यापूर्वी) इंग्रजांनी पराभव केला. पेशव्यांचे सर्व गुप्त बेत एलफिन्स्टन यास समजत त्यामुळे त्यास ही गोष्ट घडविता आली (१८१७). याप्रमाणे इंग्रज व मराठे यांत उघड युध्द सुरू होऊन त्यांचे दरबारी दळणवळणहि बंद झाले. एलफिस्टनने पुण्यास ठेवलेल्या कुमकी सैन्यास व इतर ठिकाणच्या (नगर, कलकत्ता) सैन्यासहि तयार राहण्यास सुचविले. गर्व्हनर जनरलने डेंगळे हाती आल्यास युध्द बंद करावे असे एलफिस्टन यास गुप्तपणे कळविले होते. पण एलफिन्स्टनने पुण्यसहि वेढा दिला (मे), शेवटी सिंहगड, पुरंदर आणि रायगड हे रावबाजीपासून हस्तगत करून मग वेढा उठविला. त्रिंबकजीस पकडण्यासाठी पेशव्यांनी बक्षिसे लावली तरी तो सापडेना, तेव्हा इंग्रजांनी पुढील अटी पेशव्यांवर लादल्या. आणि शिंदे, होळकर व भोसले हे आपल्या मदतीस येण्याचे लक्षण न दिसल्याने पेशव्यांनी त्या कबूल केल्या. इतर संस्थानिकाशी पत्रव्यवहार इंग्रजांच्या परवानगीने करणे, त्यांचे वकील वगैरे न ठेवणे, तुंगभद्रा-नर्मदा-दोआबशिवाय सर्व राज्य इंग्रजांस देणे, गुजराथचा इजारा गायकवाडास देणे, तैनाती फौजेसाठी कर्नाटक, उत्तरकोकण, अहमदाबाद वगैरे ३४ लक्षांचा प्रांत व नगरचा किल्ला इंग्रजांस कायमचा देणे, इत्यादी अठरा कलमे होती. या तहाने पेशवे हे इंग्रजांचे एक जहागीरदार बनले (मे). याबद्दल पेशव्यांस वाईट वाटून त्यानी बापू गोखल्याकडून पुन्हा फौजेची तयारी करविली, मात्र पावसाळा जवळ आल्याने प्रत्यक्ष चढाईचे धोरण स्वीकारले नाही. चिंतामणराव पटवर्धन, धुळप (आरमाराचा अधिपति), भोसले, मीरखान पेंढारी व होळकर हे पेशव्यांस सामील झाले. शिंद्याने इंग्रजांशी ग्वाल्हेरचा १२ कलमी तह करून (नोव्हेबर १८१७) तो मराठामंडळातून फुटला. पेंढा-यांच्या नाशाच्या सबबीवर पेशव्यांनीं फौज वाढविली. गारपिरावर इंग्रजांनी आपल्या बचावासाठी फौजांची छावणीच ठोकली होती, तेथे पेशव्यांची फौज उतरली. त्यावेळी त्यानी वेळ फुकट घालविल्याने मुंबईची इंग्रजी फौज येऊन पुण्याच्या फौजेस मिळाली. तरीहि बापू गोखल्याने तयारी करून इंगजांवर चढाई केली. गणेशखिंडीजवळ लढाई होऊन दोघांची बरोबरी झाली (५ नोव्हेंबर १८१७). पण मराठी फौज विनाकारणच मागे हटली. त्याचवेळी चढाई करून पुढे जाती तर इंग्रजांचा पराभव झाला असता. स्मिथ हा दुसरी फौज घेऊन घोडनदीहून पुण्याकडे येत होता, त्यास अडविण्यास नारोपंत आपटे गेला, परंतु त्याच्याने तिला थोपविणे झाले नाही. पुढे १२ दिवसांनी पुन्हा येरवाडयास मराठयांचे व इंग्रजांचे युध्द झाले. त्यांत मराठयांकडील अरबांनी व बापू गोखल्यांनी शिकस्त केली, परंतु पेशव्यांनी इंग्रजांस फितूर झालेल्या मराठी सरदाराच्या सल्ल्यावरून बापूस परत बोलविले व आपण सासवडकडे निघून गेले. अर्थात त्यांच्या रक्षणार्थ बापू तिकडे गेले व दुस-या दिवशी शनवार वाडयावर युनिअन जॅक लागले. बापूस जर श्रीमंत परत बोलाविते ना, तर इंग्रजांचा ताबा इतक्या लवकर बसताना. राजधानीजवळ केव्हाहि शत्रूशी युध्द सुरू करू नये असा युध्दशास्त्रांतील सर्वसाधारण नियम असतो, शत्रूच्या मुलुखांत युध्द खेळावे, परंतु तो येथे मोडला गेला पुण्याच्या रयतेने तर आधीच पळ काढला व निव्वळ शेपाऊणशे शिपायांच्या साहाय्याने व बाळाजी नातूच्या फितूरीने भगव्या झेंडयाच्या ठिकाणी लाल बावटा फडकला (१७ नोव्हेंबर).

यानंतर पुष्कळ दिवस (२२ नोव्हेंबर – २० फेब्रुवारी १८१८) पेशव्यानी गनिमी लढाई चालवून इंग्रजांस दमविले, याबद्दल तत्कालीन इंग्रज अधिका-यांनीहि त्यांची प्रशंसा केली आहे. माहुली, कोपरगांव (येथे सातारकर महाराजांस पेशव्यांनी आपल्याबरोबर घेतले) नारायणगाव, (येथे डेंगळे उघडपणे पेशव्यांच्या लष्करांत आला), वाडें, फुलगाव, रावाडी, पाडळी गोकाक, मिरज, सातारा इकडे श्रीमंत गेले. मागे स्मिथ, एलफिन्स्टन, बेल वगैरे इंग्रज सारखा पाठलाग करीत होते. यावेळी सातारकर महाराजांनी फितुरी करून एलफिन्स्टनशी बोलणे चालविले व त्यानेहि तुम्ही पेशव्यांच्या लष्करच्या मागे रहात जा, सवड सांपडताच तुम्हास सोडवून साता-यास गादीवर बसवू असे आश्वासन दिले. मध्यंतरी इंग्रजांनी सातारा घेऊन पेशव्यांच्या विरुध्द जाहीरनामा काढला की, बाजीरावसाहेब राज्याचे उपयोगी नाहीत, याजकरिता त्यास बिलकुल राज्यांतून काढून कंपणी सरकारातून (मराठी राज्याचा) मुलुक व किल्ले काबीज करून अंमल करावा” (फेब्रु १८१८). नंतर स्मिथ हा पेशव्यांच्या मागे लागला व एलफिन्स्टन वगैरे दुसरी टोळी किल्ले घेण्यास गेली. इकडे श्रीमंत सोलापूर-टेंबुर्णीवरून गोपाळाच्या अष्टीस आले. स्मिथने तांतडी करून येथे त्यानां गांठले. येथे आप्पा देसाई निपाणकराने फितुरी केली. बापूने श्रीमंतांस पुढे जाण्यास सांगितले असता आप्पाने आपण इंग्रजाशी लढतो. असे सांगून श्रीमंतास ठेवून घेतले व स्मिथ चालून आला तेव्हा ”झाडयाचे निमित्त करून” आप्पा पसार झाला. अशा अडचणीत पेशवे वैतागून ते बापूस टाकून बोलले. हया तिरीमिरीत बापूनी त्यानां शेवटचा नमस्कार करून स्मिथवर चालून गेले. घनघोर युध्द होऊन बापूनी स्मिथची तीन वेळ फळी फोडून अखेर आपला प्राण स्वामीकार्यी अर्पण केला (२० फेब्रु). ठरल्याप्रमाणे येथे सातारकर राजे इंग्रजांच्या गोटात जाऊन दाखल झाले (प्रतापसिंह छत्रपति व गोखले बापू, ज्ञा.को.वि.१७ व १२ पहा). इकडे एलफिन्स्टननें सिंहगड, पुरंदर वगैरे किल्ले घेऊन प्रतापसिंहास साता-याच्या गादीवर बसविले. कर्नाटकांतील सर्व किल्ले, ठाणी वगैरे घेऊन मनरो हा पुण्याकडे येण्यास निघाला. नागपुराकडे आप्पासाहेब भोसल्याने इंग्रजांवर हल्ला केला, पण तेथेहि फितुरीमुळे (दारूच्या पोत्यांऐवजी बाजरीची पोती निघाल्याने) भोसल्यांचा पाडाव होऊन, तो इंग्रजांच्या हाती लागला. मल्हारराव होळकराने मालकमशी तोंड दिले, त्यांत मल्हाररावांचाच मोड होऊन त्याने त्याच्याशी तह केला. याप्रमाणे यावेळी श्रीमंत एकटे पडले.

 

पेशवे अष्टीहून निघाले, तो त्यांनी कोपरगावाहून उत्तरेकडे मोर्चा फिरविला. येथे पटवर्धन सरदारांनी त्यांनां सोडले आणि खुद्द चिमाजीआप्पा, नारोपंत आपटे, आप्पा देसाई वगैरे मंडळी इंग्रजांच्या स्वाधीन झाली. श्रीमंत हे चांदा, पांढरकवडा, सिवणीवरून अशीरगडाजवळ धूळकोटास आले. नर्मदापार शिंद्याकडे जाण्याच्या वाटेवर मालकम बसला असल्याने शेवटी हताश होऊन त्यानी महूस मालकमकडे वकील पाठविला. यावेळी पेशवे जेर झाले होते, त्यांचे सर्व अश्रित त्यांनां सोडून गेले, कोणाकडूनहि त्याना मदत मिळेना, जवळ फक्त अरब वगैरे आडदांड लोक होते, तेहि पगारासाठी बंड करण्यास तयार झाले होते. अशा कचाटीत श्रीमंतानी मालकमशी बोलणे लाविले. मालकमहि तेथे आला व त्याने आपल्या जबाबदारीवर सालिना ८ लक्षांची जहागीर खुद्द पेशव्यांना कबूल केली आणि शेवटपर्यंत त्याच्यापाशी टिकून राहिलेल्या दोन तीन सरदारांना तोशीस न लावण्याचेहि कबूल केले. या शर्ती फार सढळ आहेत असे हेस्टिंग्जनें म्हणून अखेर त्या करार केल्या, मात्र आपण दक्षिणेस परत जाणार नाही व पेशवाईच्या गादीवर हक्क सांगणार नाही असे पेशव्यांकडून इंग्रजानी कबूल करवून घेतले. नंतर त्यांच्या पसंतीप्रमाणे ब्रह्मावर्त येथे त्यांना नेऊन ठेविले (जून १८१८).

ब्रह्मावर्ताचे राज्य सुमारे ६ चौरस मैलाचे होते. तेथे एक इंग्रज रेसिंडेट राहत असे, राज्याची लोकसंख्या १०-१५ हजार होती. यापुढे श्रीमंताचे व इंग्रजांचे संबंध स्नेहभावाचे होते. पेशव्यांनी इंग्रजांना एवढा ६ लक्ष रूपये देणगी दाखल देऊन १ हजार सैन्याचीहि मदत केली होती. येथे त्यांचे लक्ष धार्मिक कृत्यांत विशेष गढले, त्यानी तेथे देवळे, घाट वगैरे बांधले. त्यानी पुण्यास असता ६ लग्ने केली होती ब्रह्मावर्तास गेल्यावर आणीक ५ केली तेथे त्याना ३ मुली झाल्या, त्यापैकी एक कुसुमबाईसाहेब (बयाबाई आपटे) या होत्या, एक मुलगा झाला, पण तो वारला म्हणून त्यांनी ३ मुले दत्तक घेतली (नानासाहेब, दादासाहेब व बाळासाहेब) आणि आपला वारसा त्यापैकी नानासाहेबांस देण्यास इंग्रजास कळविले. त्यास इंग्रजांनी रुकार दिला होता. श्रीमंतांनी आपली शिल्लक इंग्रजांच्या रोख्यांत गुंतविली होती. ब्रह्मवर्तास याप्रमाणे ३३ वर्षे घालविल्यानंतर श्रीमंत बाजीराव रघुनाथ उर्फ बाबासाहेब पेशवे यांना १४ जानेवारी १८५१ रोजी देवाज्ञा झाली. श्रीमंतानी अग्निहोत्र घेतले होते म्हणून त्याचा अंत वेदीजवळ झाला. उत्तरकार्य नानासाहेबांनी केले. और्ध्वदेहिक व दान वगैरे कार्यास तीन लक्ष रु. खर्च आला. यावेळचे भूमिदानविषयक हृदयद्रावक वर्णन रघुनाथराव विंचूरकराने समक्ष पाहून केले आहे.

ज्ञानकोशवरून

 

 

 ‘सच्चा डेरा’ कसा झाला?

(डॉ. अमित शिंदे हे स्त्रीरोगतज्ज्ञ असून लैंगिक शिक्षणावर ते व्याख्याने देतात. अनेक नियतकालिकात ते नियमितपणे लेख लिहीतात.  सच्चा बाबाच्या प्रमुखाला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर डे-याचे खरे स्वरूप उघड झाले. असे ‘सच्चे डेरे’ भारतात कितीतरी क्षेत्रात असतील! अशा डे-यावर प्रकाश टाकत आहेत डॉ.  अमित शिंदे.  -सीमा घोरपडे, पेज एडिटर)

बाबा राम रहीम ‘इन्सान’ हे नाव अन्वर्थक आहे. हा ‘माणूस’ स्वप्रेमी आहे. डेरा सच्चा सौदाचे बहुसंख्य अनुयायी  प्रामुख्याने मागास जातींमधून आलेले आहेत. ‘मस्ताना’ बलुचचिस्तानी नावाच्या अवलियाने या डे-याची स्थापना केली. जातीभेद निर्मूलन, सर्वधर्मसमभाव, समाजकार्य या गोष्टींमुळे हा डेरा समाजातील शोषितांना आपलासा वाटत गेला. त्याचे अनुयायी वाढत गेले. मार्क्सचे ‘धर्म ही अफूची गोळी’ हे वाक्य अनेकांना माहित असते. पण त्याच परिच्छेदात “धर्म हा शोषितांचा हुंकार असतो, ह्रदयहीन जगाचे ह्रदय असते, आत्मा हीन जगाचा आत्मा असतो.” हेही नमूद केले आहे हे अनेकांना माहित नसते. डेराच्या अनुयायांना डेरा का प्राणापेक्षा प्रिय वाटतो याचे उत्तर यात आहे. जो दिलासा त्यांना जातीव्यवस्थेने नाकारला तो त्यांना डे-याने दिला. ‘मस्ताना बलुचिस्तानी’ यांच्या मृत्युनंतर बाबा राम राहीम हा डे-याचा तिसरा वारसदार. डे-याच्या पूर्व पुण्याईच्या बिळावरील हा ऐतखाऊ नागोबा. भोळेभाबडे भाविक त्याच्याकडे मस्ताना बलुचिस्तानी यांचा वारसदार म्हणूनच पाहत आहे. पण हळू हळू डे-याचे रुपांतर एककल्ली साम्राज्यात होत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. सात आठ वर्षांपूर्वी डेरा अनुयायी आणि अकाल तख्त यांच्यात संघर्ष झाला. आरोप होता ईशनिंदेचा. बाबा राम रहीमने गुरु गोविंद सिंग यांच्या वेशात स्वतःची प्रतिमा छापल्याचा अकालींना राग आला होता. या प्रकरणात लक्षात आले की डे-याला होणारा सगळा विरोध प्रामाणिक नाहीये. जातीयवादाची किनार देखील या वादाला आहे. थोडक्यात डे-याच्या अनुयायांमधील आक्रमकतेला अशी पार्श्वभूमी आहे.

अनेकदा वंचित चुकीच्या माणसाला आपला प्रेषित समजतात. शोषितांच्या नावाने सुरु झालेली चळवळ हळूहळू शोषणाचे साधन बनते. धर्माच्या, पक्षाच्या, संघटनेच्या ताब्यात सर्वसामान्य लोकं आपली विचारशक्ती;  ताकद देतात आणि त्याचे ठेकेदार या ताकदीचा वापर त्यांचेच शोषण करण्यासाठी वापरतात. धार्मिक नेता हा धार्मिक संघटनेचे प्रतिकचिन्ह असतो. आपली ब्रॅन्ड इमेज तो इतकी ‘लार्जर द्यान लाईफ’ बनवतो की त्या प्रतिमेच्या तो स्वतःच प्रेमात पडतो. रामरहीम असा नार्सिसीस्ट आहे. ते रंगीबेरंगी कपडे ते सबकुछ  रामरहीम असलेले सिनेमे, तो झगमगाट यातून एक ईश्वरी अवतार प्रगट होतो. मग आजूबाजूच्या लोकांचे सर्वस्व नियंत्रित करण्याच्या राक्षशी शक्तीची त्याला चाटक लागते. हे ‘काही लोकांचे देव’ प्रचंड चार्मिंग असतात. ते आपल्या भक्तांची काळजी घेतात, विचारपूस करतात, मग हळूहळू त्यांच्या आयुष्याची इतकी पकड घेतात की त्यांचा श्वास गुदमरून जावा. त्यांच्या मोकाट सुटलेल्या कल्पनाशक्तीला मग धुमारे फुटू लागतात. काहींना वाटते आपण कृष्ण आहोंत तर काहींना वाटते आपण मुक्तिदाते. समोरची व्यक्ती वरवर विरोध करत असली तरी मनातून स्वर्गीय सुख उपभोगते आहे याची त्यांना खात्री असते. आपण तिच्यावर कृपा करत आहोत अशी त्यांची धारणा असते. अर्थातच हे वास्तव नसते केवळ फँन्टसी असते. आपण ज्या दैवी समर्पणाची अपेक्षा केली होती त्याची पूर्ती आपला भक्त करू शकत नाही हे लक्षात आल्यावर शोध सुरु होतो तो नव्या भक्ताचा. भक्त हा शब्द आता भक्ष असा वाचावा.

ही कथा एकट्या रामरहीमची नाही तर आसाराम, नित्यानंदासह अनेकांची हीच कथा आहे. नव्हे सेक्रेटरीचे शोषण करणाऱ्या बॉसची, कार्याकर्तीचे शोषण करणाऱ्या मंत्र्याची, अभिनेत्रीची परीक्षा घेणाऱ्या निर्मात्याची हीच कथा आहे. नीट बघितले तर गावागावात रामरहीम सापडतील.

डॉ. अमित शिंदे 

डोवल आणि चीन

(बातम्यातील ‘बातमी’ शोधणे हा सुनील तांबे ह्यांचा हातखंडा. इंग्रजी वर्तमानपत्रात बातमीदारी करत असताना त्यांना ही हातोटी साध्य झाली असावी. नेमका तपशील पकडून सुटसुटीत वाचनेबल बातमी कशी लिहायची ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे सध्या रोज प्रसिध्द होणा-या चीनविषयक बातम्या. ह्या बातम्यांवर त्यांनी लिहीलेले भाष्य म्हणजे त्यांची फेसबुकवरील ‘ डोवल आणि चीन’ ही पोस्ट. -सीमा घोरपडे )

डोवल हे भारताचे सिक्युरिटी अॅडव्हायझर आहेत.
चीन आणि भूतान यांच्यामध्ये सध्याचा सीमावाद आहे.
भूतान आणि चीन यांचे राजनैतिक संबंध नसल्यामुळे भारतीय फौजांनी चीनच्या फौजांना अटकाव केला आहे. ह्या तणावात भारताची भूमिका थर्ड पार्टीची आहे.
चुंबी व्हॅली – जिथे भारत, भूतान आणि चीन यांच्या सीमारेषा मिळतात, ती चीनला द्यावी त्या बदल्यात चीनची (म्हणजे तिबेटची) चौपट जमीन आम्ही भूतानला देऊ, अशी ऑफर चीनने भूतानला दिली होती. भूतानची भूमिका सकारात्मक होती. मात्र भारताने नाड्या आवळल्याने भूतान मागे हटला.
हा इतिहास अनेकांना ठाऊक नाही.
चीनला भारताच्या भूमीवर आक्रमण करण्यामध्ये रस नाही. मात्र चीनच्या महत्वाकांक्षांना भारताने खो देऊ नये अशी अपेक्षा आहे.
भारताने अमेरिकेचे हितसंबंध राखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जपान, व्हिएटनाम, अमेरीका आणि भारत असा चौकोन चीनच्या महत्वाकांक्षांना आव्हान देतो आहे.
पाकिस्तान-चीन इकॉनॉमिक कॉरिडॉरला भारताचा विरोध आहे कारण सदर कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मीरमधून जातो.
वन बेल्ट-वन रोड या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये पाकिस्तान-चीन इकॉनॉमिक कॉरिडॉरचं महत्व लक्षणीय आहे.
वन बेल्ट वन रोड, या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये चीनचे आर्थिक, राजकीय आणि संरक्षणात्मक हितसंबंध आहेत.
चीनमध्ये उत्पादित होणार्‍य़ा वस्तूंना बाजारपेठ मिळावी, चीनला होणार्‍या खनिज तेलाच्या पुरवठ्यामध्ये व्यत्यय न यावा, इत्यादी चीनचे हितसंबंध आहेत. ह्या हितसंबंधांंना भारताने शह देऊ नये, असा चीनचा आग्रह वा हेका आहे.
चीनच्या या हितसंबंधांच्या विरोधात अमेरिका, जपान, व्हिएटनाम यांची युती अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झाली आहे. भारतही त्याच युतीमध्ये सहभागी होतो आहे, हे चीनला खटकत आहे.
वन बेल्ट वन रोड परिषदेला दक्षिण आशियातील म्हणजे भारतीय उपखंडातील सर्व देशांनी– पाकिस्तान, श्रीलंका, बांग्ला देश, नेपाळ, मालदीव यांनी हजेरी लावली. भारत मात्र अनुपस्थित होता. कारण मोदीप्रणित राष्ट्रवाद भारताचे नाही तर अमेरिकेचे हितसंबंध जोपासणारा आहे. त्यामुळे सध्याचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
पाकिस्तान वगळता अन्य शेजारी राष्ट्रबरोबरही भारताचे संबंध तणावपूर्ण आहेत ही बाब वन बेल्ट वन रोड या चीनने बोलावलेल्या परिषदेवरून स्पष्ट झाली.
अडचण अशी आहे की नरेंद्र मोदी यांचा भक्त संप्रदाय आणि तथाकथित राष्ट्रवादी लोक भारताचे हितसंबंध आशियाशी आहेत की अमेरिकेशी हा साधा भौगोलिक विचार करेनासे झाले आहेत. त्यामुळे डोभल को डरा चीन, यासारखे कार्यक्रम झी टिव्ही वा झी न्यूजवर आयोजित केले जातात.
मूर्खांचा बाजार आणि वेड्यांचा शेजार अशी मोदीभक्तांची आणि राष्ट्रवाद्यांची स्थिती आहे. चीनची अर्थव्यवस्था १२ ट्रिलियन डॉलर्सची आहे तर भारताची अर्थव्यवस्था २ ट्रिलियन डॉलर्सची आहे या वस्तुस्थितीचाही त्यांना विसर पडला आहे.
मोदीभक्त आणि तथाकथित राष्ट्रवादी त्यामुळे डोवल ह्यांच्या रणनीतीवर फाजील विश्वास ठेवतात. राष्ट्रवादाचा प्रश्न असल्याने लोंढा प्रसारमाध्यमे आणि सामाजिक प्रसारमाध्यमे यासंबंधातील वस्तुस्थिती काय आहे हे भारतीयांना सांगत नाहीत. त्यामुळे जोक्स करणं हा एकमेव पर्याय उरतो.
भारताचा नकाशा पाहण्याचीही तसदी लोक्स घेत नाहीत. वंदे मातरम्, जन गण मन, इत्यादी घोषणा दिल्यावर भारतापुढचे प्रश्न सुटतील अशा भ्रमात लोक आहेत.
भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीबाबत एवढी बेपर्वा वृत्ती भाजप आणि संघप्रणित राष्ट्रवादाने रुजवली आहे. देशाच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत संपूर्ण बेफिकीरी संघ-भाजप प्रणित राष्ट्रवाद रुजवत आहे.
सुनील तांबे. ज्येष्ट पत्रकार

राज्य शासनाचा पारदर्शक लोकसहभाग

राज्यापुढील विशिष्टसमस्यांवर नेमके सोल्युशन काढण्यासाठी शासन आणि लोकसहभाग ह्या सर्वस्वी नव्या माध्यमाचा अभिनव प्रयोग यंदा महाराष्ट्र दिनी करण्यात आला. देशातला हा पहिलाच प्रयोग असून ह्या प्रयोगात विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणांची गुणवत्ता पाहता ह्या पहिल्याच प्रयोगाला महारष्ट्र सरकारला अफाट यश मिळाले. भ्रष्टाचार निर्मूलन, घनकच-यातून नविनिर्मिती, न्यायालयातील विलंबनिर्मूलन, शिक्षकांच्या कामावरचा बोजा कमी करणे, महानगरातील निरनिराळ्या वाहतूक यंत्रणांचे समन्वयीकरण, विकास आराखडे, सामाजिक कामाचे सुसूत्रीकरणा, स्टार्टअपची अमलबजावणी इत्यादि 11 विषयांवर विद्यार्थ्यांकडून सादरीकरण मागवण्यात आले होते. त्यांच्या सादरीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलेली उत्स्फूर्त टिपणी केली. त्यामुळे सादरीकरणाचा कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला. सादरीकरणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. फाईल, मंत्रालयात खेटे, संबंधितांच्या जुजबी उपस्थितीत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर ‘तपासून अहवाल सादर करा’ अशा टाईपचा शेरा ह्या रूढ कारभारशैलीला फाटा देण्याचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला.
राज्याला भेडसावणा-या 11 समस्यांवर तोड काढण्याच्या दृष्टीने सादरीकरण करण्यासंबंधीच्या आवाहनास राज्यातून सुमारे 2300 सादरीकरणे आली. ह्या सादरीकरणाची गुणवत्ता तपासून निवडक सादरीकरणाची यादी तयार करण्यासाठी तज्ज्ञांचे परीक्षक मंडळ नेमण्यात आले होते. महाराष्ट्र दिनी वरळीच्या भव्य नॅशनल स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या 4 तासांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शासनाचे उच्चाधिकारी, आणि 6000 हजार उपस्थितांसमोर स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. ह्या सादरीकरणास टाटा समूहाचे अध्वर्यू रतन टाटा, मेजर जनरल अनुज माथूर आणि चित्रपट अभिनेते अक्षयकुमार ह्यांनीही मुद्दाम हजेरी लावली होती.
गेल्या 57 वर्षांत आतापर्यंत जे ‘व्हिजन कार्यक्रम’ झाले ते सारे कार्यक्रम परिसंवाद, वर्कशॉप अशा प्रकारच्या पारंपरिक माध्यामातूनच झाले आहेत. किंवा एखादे वेळी मंत्र्यालयात मोजक्या अधिका-यांच्या उपस्थितीत झाले. परंतु ‘व्हिजन २०२५’ कार्यक्रम मात्र बदलत्या ऑडिओ व्हिज्युअल तंत्रज्ञानाचा वापर करून झाला. ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र कार्यक्रमात राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग, घनकचरा व्यवस्थापन. विकास आराखडा ह्यासारख्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अप्स, सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दला. ह्या सादरीकरणातील सूचनांचा शासनाकडून चपखल उपयोग केला जाणार असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी सादरकर्त्यांना दिले. काही सादरीकरणांना मुख्यमंत्र्यांनी उत्स्फूर्त दाद दिली तर काही वेळा सॉफ्टवेअर सोल्युशन आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य व्हावा म्हणून ‘स्केल अप’ करण्याचा सल्ला दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या समोर न बुजता विद्यार्थ्यांनी आपल्या सोल्युशन्सचे ठाम सादरीकरण केले. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र विषयावर केलेल्या सादरीकरणावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या विद्यार्थ्यांनी सादर केलेले एसडीएसएस हे मॉडेल उत्तम असून जलयुक्त शिवार योजनेत त्याचा समाविष्ट करण्यात येईल. नागरी गरिबी निर्मूलन विषयावरील सादरीकरणामध्ये स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त उपाययोजना आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी वसंतदादा पाटील वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरणावर व्यक्त केले. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुण्याच्या विद्यार्थ्यांचे एकात्मिक वाहतूक यंत्रणेवरील सादरीकरण, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यावर व्हिजेआयटीच्या विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण, इत्यादि सादरीकरणे केवळ मुख्यमंत्र्यांनाच आवडली असे नाही तर सरकारी अधिका-यांनी त्यांना चांगली दाद दिली.
अवसारीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्थेच्या ‘टीम नन्ही आशा’, प्रगत शिक्षण योजनेमुळे माध्यमातून शिक्षणाच्या कामगिरीत देशात 18 व्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. व्हीजेटीआय मुंबईच्या विद्यार्थ्यांनी स्टार्टअप इंडियावर सादरीकरण केले. यामध्ये स्टार्टअप मार्गदर्शन सेंटर व वेबसाईटची कल्पना सुचविली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासनाने नुकतेच स्टार्टअपसाठी विशेष धोरणाचा मसुदा जाहिर केला आहे. या धोरणावर नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. ह्या सादरीकरणातील काही भाग मसुद्यात आवर्जून समाविष्ट केला जाणार आहे.
अभिनेते अक्षयकुमार ह्यांनी ह्या कार्यक्रमात आपल्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे रहस्य सांगितले तर रतन टाटांनी प्रकल्पातील बारकाव्यांवर भाष्य केले. दोघांनी सादरीकरणांचे कौतुक केले. आजच्या तरुणांकडे खूप नवनव्या कल्पना आहेत. सोल्युशन चांगले आहेत; परंतु खर्चाच्या दृष्टीने ते परवडले पाहिजेत हेही मुख्यमंत्र्यांनी अनेकदा स्पष्ट केले. चाहत्यांकडून आलेल्या कल्पनांचा मी चित्रपट निर्मितीच्या वेळी विचार आणि त्यानुसार पुढचे काम करतो, असेही अक्षय कुमार यांनी सांगितले.

रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
नंदकुमार वाघमारे
सहायक माहिती संचालक, महाराष्ट्र शासन

‘मिसिंग’ मतदारराजा!

लवू नाईक, निवृत्त तहसीलदार
लवू नाईक, निवृत्त तहसीलदार

(मतदाराला राजा संबोधण्याची फॅशन अलीकडे रूढ झाली आहे. अलंकारिक अर्थाने ते चुकीचेही नाही. पण मतदारयादीतून मात्र ह्या राजाचे नाव हरवले आहे. असे का घडले ह्याचे कारण देत आहेत निवृत्त तहसीलदार लवू नाईक.  मुंबईतील अंधेरीचे तहसीलदार म्हणून ते निवृत्त झाले. श्री. नाईक ह्यांनी लोकसभेपासून ते तालुका पंचायत समित्यापर्यंत अनेक निवडणुकींत निर्वाचन अधिकारी म्हणून काम केले. त्यांच्या अनुभवावर आधारित हा लेख -सीमा घोरपडे, पेडएडिटर)

भारत हे लोकशाही राज्य आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेनुसार मत देण्याचा हक्क आहे. मतदार हा लोकशाही राज्यव्यवस्थेचा कणा आहे असे म्हटले तरी चालेल! अलीकडे निवडणुकीच्या काळात मतदाराला ‘मतदारराजा’ संबोधण्याची फॅशन रूढ झाली आहे. मतदारानी निवडलेल्या व्यक्तीला राज्य चालविण्याचा हक्क मिळतो. बारकाईने विचार केला तर मतदारांची गणना व त्याची अद्यावत यादी करणे हे महत्वाचे काम आहे. ते जिकीरीचेही आहे. या कामाकडे शासनाने अतिशय गांभीर्याने बघणे आवश्यक आहे. ह्या वेळी राज्यात झालेल्या पालिका, जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. ह्या मिनी विधानसभा निवडणुकाच होत्या असे म्हटले तरी चालेल!
दुर्दैवाने मतदार यादी बनविणे हे दुय्यम प्रतीचे काम आहे अशा दृष्टीने त्या कामाकडे पाहिले जाते. मतदारांच्या यादीत अनेक नावे गायब झाली त्याची अनेक कारणे असावीत. त्यामुळे लाखो मतदार मतदानावाचून वंचित राहिले.
ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेसाठी काल मतदान झाले. त्यावेळी मतदारांना आलेले काही अनुभव विचारात घेण्यासारखे आहेत. मी ज्या सोसायटीत रहातो त्या सोसायटीतील एक रहिवाशी सुमारे 4 वर्षापूर्वी आपली सदनिका विकून गेले. मागील विधानसभेच्या निवडकीच्या वेळेस त्यांच्या कुटुंबातील चारही व्यक्तींची नावे मतदार यादीत होती व त्यानी मतदानही केले होते. मात्र या निवडणूकीसाठी त्यांच्या कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला मतदान करता आले. इतरांची नांवे मतदार यादीत आलेली नाहीत. तसेच माझ्या बाजूच्या सोसायटीतील एका रहिवाशांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले असून त्यांची आई व पत्नीचे नाव मात्र मतदार यादीमध्ये ठेवण्यात आले आहे. ही नावे मतदार यादीतून कशी वगळली जातात? माझ्या सोसायटीतील 18 वर्षे पूर्ण झालेल्या एका मुलाने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विहित मुदतीत अर्ज केला होता. पण त्याचे नाव मतदार यादीत आलेले नाही त्यामुळे त्याला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अनेक जण मतदार यादीतील हे घोळ लक्षात येताच मतदान केंद्राकडे फिरकले ही नाहीत. या अशा घटना का घडत आहेत? आजची सर्व वर्तमानपत्रे उघडून पाहिली मतदारराजाचे नाव मिसिंग असल्याचे आल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घटले अशाच बातम्या वाचावयला मिळाल्या.
एक वेळ शासनाने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मतदार यादी तयार केली की महानगरपालिकांनी दुसरी यादी बनविण्याचे मुळात कारणच काय? मतदार यादी बनविण्याचे अधिकार फक्त जिल्हाधिकारी या एकाच यंत्रणेला असावेत. मतदान केन्द्रानुसार यादीचे भाग करण्याचे कामही हीच यंत्रणा करील. म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी राहील.
जन्म आणि मृत्युनुसार मतदारात वाढ व घट रोजच घडत असते. त्यानुसार मतदार याद्यामध्ये बदल रोजच घडत असतो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडून मतदार यादी अद्यावत् करण्यासाठी अधूनमधून कार्यक्रम आखले जातात. त्यावेळी काही विद्यार्थ्यीही ठराविक कालावधीसाठी रोजंदारीवर घेतले जातात. त्यांच्याकडून मतदारांची गणना करून त्यांच्या याद्या तयार केल्या जातात. यात ब-याच वेळा चुका राहून जातात. याचे कारण रोजंदारीवर नेमलेला कर्मचारीवर्ग कामे करून निघून गेला की, कार्यालयात जो कर्मचारीवर्ग असतो त्यांच्याकडून ही कामे करून घेतली जातात. तो कर्मचारीवर्ग कामाचे स्वरूप बघून हतबल व निरूत्साही होतो. त्यामुळे काम ज्या निष्ठेने पूर्ण करावयाचे असते ती निष्ठा राहात नाही व मग यादीत नावे नाहीत, नांवातील बदल, पत्त्यातील बदल अशाप्रकारच्या घटना घडतात.
ब्रिटिश कालापासून सरकारी कार्यालयात,विशेषतः तहसीलदार कार्यालयात नेमलेला कर्मचारीवृंदाच्या संख्येत वाढ झालेली नाही. लोकसंखेत भरमसाठ वाढ होत असताना शासकीय कार्यालयातील कर्मचारी संख्येत वाढ केली जाणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र उलट सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्याचे कारण देऊन कर्मचारीसंख्येत कपात केली जात आहे. ठाणे तालुक्याचा विचार केला तर सिडकोची निर्मिती होऊन किती वर्षे झाली? नवी मुंबई मुळे लोकसंख्येत किती भर पडली? असे असूनही ठाणे तहसील कार्यालय तालुक्याचा कारभार हाकते आहेच ना? अनेक पक्षांची सरकारे आली आणि गेली. परंतु एकाही राज्यकर्त्याना ठाणे तालुक्याचे वाढलेले काम दिसले नाही. स्वतःचे मानधन वाढवून घेण्याच्या बाबतीत मात्र हे राज्यकर्ते तत्पर दिसले. मानधनवाढवण्यासाठी कधी नव्हे ते विविध राजकीय पक्षांत एकमत होते.
शेवटी एकच म्हणावेसे वाटते, प्रत्येक मतदाराला त्याचा मतदानाचा हक्क केव्हा मिळणार? मतदान हे पवित्र कर्तव्य मानले तर ते बजावण्याची संधी मिळालीच पाहिजे. घटनेने जे दिले ते गलथान सरकारी यंत्रणेने काढून घेतल्यासारखे आहे!
-लवु नाईक
सेवानिवृत्त तहसिलदार

बदलती अर्थव्यवस्था, समाजाचे विघटन आणि मराठी लेखन

सुप्रसि्ध्द पत्रकार सारंग दर्शने
सुप्रसि्ध्द पत्रकार सारंग दर्शने

मुलूखगिरी आणि राजकारण ह्या दोन विषयात      म-हाठी माणसाला गती आहे. त्यामुळे अर्थकारणाला मराठी माणसाच्या जीवनात दुय्यम स्थान आहे. निदान असा सार्वत्रिक समज निश्चित झाला आहे. परंतु  आर्थिक विषयाला गेल्या शतकातील मराठी लेखकांच्या आणि विचारवंतांच्या पहिल्या पिढीने महत्त्व दिले हे अनेकांना माहित नाही. आर्थिक विषयावर लोकहितवादी, कृष्णशास्त्री चिपलोणकर, बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी लिहीलेली पुस्तके भारदस्त स्वरूपाची आहेत. अलीकडे आर्थिक विषयाला मराठी वर्तमानपत्रे स्वतंत्र पानही देऊ लागली आहेत. परंतु कितीतरी वर्षांआधी मराठी लेखकांनी आर्थिक विषयाची गंभीर दखल घेतल्याचे महाराष्ट्र टाईम्सचे सहसंपादक सारंग दर्शने ह्यांनी डोंबिवली येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात केलेल्या भाषणात दाखवून दिले. त्यांच्या भाषणाचा हा गोषवारा-   -सीमा घोरपडे, पेजएडिटर
बदलती अर्थव्यवस्था, समाजाचे विघटन आणि मराठी लेखन हा विषय परिसंवादासाठी ठेवल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार. आजचे मराठी साहित्यविश्व हे प्रामुख्याने अर्थनिरक्षर आहे, असे मला वाटते. अर्थसाक्षरता याचा अर्थ साहित्यिकांनी अर्थशास्त्रज्ञ असणे, असा नाही. मात्र, त्यांची संवेदनशीलता आणि प्रतिभा ही समाजातील सामाजिक आणि आर्थिक घटना, वादळे, घडामोडी, क्रांती टिपणारी असायला हवी. त्यांच्या सर्जनशीलतेवर सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतराचा संस्कार असायला हवा.
हा निकष लावला तर मराठी साहित्यिक मोठ्या प्रमाणात निराशा करतात. `ज्ञानपीठ’सारखा मोठा पुरस्कार तर सोडूनच द्या. पण आजवर मराठी साहित्याला मिळालेले साहित्य अकादमीच पुरस्कार पाहिले तरी हे लक्षात येईल. आजवरच्या पुरस्कारांमध्ये गंगाधर गाडगीळ किंवा रा. भा. पाटणकर यांच्यासारखे मोजके अपवाद सोडले तर एकाही साहित्यिकाने मानवी समाजातील अर्थकारण हेही जीवनाचे महत्त्वाचे अंग असू शकते, याची काही दखलच घेतलेली नाही. मराठी समाजाचे अर्थजीवन हे या लेखकांच्या परिघाच्या बाहेर राहिले आहे. पाटणकरांनाही अकादमी ‘अपूर्ण क्रांती’ या मध्ययुगीन अर्थकारणाचा थोडा विचार करणाऱ्या पुस्तकासाठी मिळाले नाही. किंवा गाडगिळांनाही त्यांच्या आर्थिक लिखाणासाठी मिळाले नाही.
हे असे होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे, साहित्याबद्दलचे मराठी समाजाचे चाकोरीबद्ध आकलन. कथा, कविता, नाटक, कादंबरी यांच्या पलीकडे किंवा आता वजन कमी कसे करावे किंवा एक हजार एक पाककृती यांच्या पलीकडे मराठी समाजाचे साहित्याचे आकलन फारच कमी वेळा जाते. याचाच परिणाम म्हणून आधुनिक मराठी साहित्यात आपल्याला समाजाचे अर्थजीवन मध्यभागी ठेवून लिहिलेला एकही मोठा ग्रंथ आढळणार नाही.
दुसरे एक कारण म्हणजे, एकूणच अर्थव्यवहार आणि अर्थशास्त्र या विषयांकडे पाहण्याची मराठी माणसाची वृत्ती अतिशय संकुचित आहे. ज्येष्ठ उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर म्हणायचे की, पैशाचा विचार म्हणजे मराठी माणसाला जणू पाप वाटतो. त्यांच्या काळात मराठी माणसांनी महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठी बँक काढली. शंतनुराव म्हणाले, आता बँकेची जाहिरात करा. तेव्हा इतर संचालक मंडळी म्हणाली की, ही आपण सेवा करतो आहोत. तेव्हा शंतनुराव म्हणाले, मुळीच नाही. ही केवळ सेवा नाही. सेवा आनुषंगिक आहे. आपण ‘पैसा’ विकतो आहोत आणि ही विक्रीची वस्तू म्हणून आपण त्याची जाहिरात करायलाच हवी. या नैतिक पेचातून बाहेर पडायला संचालक मंडळाला म्हणे बराच वेळ लागला. मराठी माणूस एकूण अर्थसृष्टीकडे कसा पाहतो, याचे हे छोटेसे उदाहरण.
कदाचित दीडशे वर्षांपूर्वी अशी मराठी माणसाची अवस्था इतकी शोचनीय स्थिती नसावी. पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेने 1969 साली, शंभर वर्षांपूर्वी मराठी भाषेत प्रसिद्ध झालेले अर्थशास्त्रविषयक चार दुर्मिळ ग्रंथ जुने मराठी अर्थशास्त्रीय ग्रंथ या नावाने प्रकाशित केले. त्यालाही आता पन्नास वर्षे होत आली. हे ग्रंथ १८४३ ते १८५५ या काळात, म्हणजे मुंबई विद्यापीठाची स्थापना होण्यापूर्वी लिहिले गेले. हे ग्रंथ म्हणजे

1) हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार, याविषयीं विचार …  रामकृष्ण विश्वनाथ
2) लक्ष्मीज्ञानः लोकहितवादी’
3) देशव्यवहारव्यवस्था.. हरि केशवजी पाठारे’ आणि
4) अर्थशास्त्रपरिभाषा. कृष्णशास्त्री चिपळोणकर

या ग्रंथांमध्ये मांडलेल्या अर्थशास्त्रविषयक विचारांचा उगम इंग्लंडात होता, आणि तेथेही हे विचार फार जुने झाले नव्हते. जॉन स्टुअर्ट मिलच्या 1848 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी या जगविख्यात पुस्तकाची सावली यातील दोन मराठी पुस्तकांवर होती. मराठीतील अर्थशास्त्रविषयक लेखनाचा पाया घालण्याचे कार्य हे लेखक किती तत्परतेने करीत होते ते यावरून दिसून येईल. आज हे ग्रंथ अभ्यासले तर, दीडशे वर्षांपूर्वी आपल्या सुशिक्षितांचे अर्थशास्त्रीय विचार कसे होते, याची कल्पना येते. आज असे स्वतंत्र, निदान आधारित किंवा अनुवादित किती लिहिले जात आहे किंवा वाचले जात आहे, याची आपणच कल्पना केलेली बरी.
या चार अनुवादित ग्रंथांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम्स ऑफ रूपी या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल. त्या काळात हा ग्रंथ नावाजला गेला. मात्र, बाबासाहेबांचा हा अर्थशास्त्रीय अभ्यासाचा वारसा मराठी समाजात फारच थोड्या अभ्यासकांनी चालविलेला दिसतो. तशी पुस्तके तर हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीही नाहीत. महराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींनी तर अर्थशास्त्री डॉ. आंबेडकर हे फारच कमी विचारांत घेतले आहेत. मग त्यांची परंपरा पुढे चालवून अर्थ-सामाजिक लेखन होणे तर दूरच!
काल अक्षयकुमार काळे यांनी अध्यक्षीय भाषणांत इतिहासात रमणाऱ्या किनखापी साहित्याचा समाचार घेतला होता. तो योग्यच होता. इतिहासाचा आजच्या वर्तमानाशी अनुबंध जोडायचा असता तर हरयाणात स्थिरावलेल्या रोड मराठी या पानिपतनंतर तेथेच वाढलेल्या मराठी समाजाच्या जगण्यावर अनेक प्रकारची पुस्तके आली असती किंवा, अहमदशहा अब्दालीने कैद करून ज्या मराठ्यांना अफगाणिस्तानात नेले, त्यांच्या आजच्या वंशजांची, त्यांच्या समाजशास्त्रीय स्थितीगतीची किती लेखकांना आठवण झाली? त्यातही शिवशाही किंवा पेशवाईवर पुस्तके लिहायची ती केवळ शौर्य रसात किंवा अधुनमधून शृंगाररसात लेखणी बुडवून. पेशवेदप्तर किंवा इतर कागदपत्रे धुंडाळून त्या काळातील अर्थव्यवहार कसे होते किंवा सामान्य माणसाचे सामाजिक, आर्थिक जीवन कसे होते, याची काहीच दखल घ्यायची नाही. अपवाद मी मघाशी उल्लेख केलेल्या रा. भा. पाटणकारांच्या अपूर्ण क्रांती किंवा अशा मोजक्या पुस्तकांचा.
इतक्या दूरच्या काळातले जाऊदेत! भारतात आणि महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांत दोन घटनाक्रम बरोबरीने होत आहेत. १९९१ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांचा आरंभ करणारा अर्थसंकल्प मांडला. भारतीय लोकजीवनात एक भलीबुरी क्रांती करणारी ही घटना होती. त्यानंतर, काही काळांतच विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वेग वाढला. त्यानंतर हे लोण मराठवाड्यात गेले. तिथून उत्तर महाराष्ट्रात आणि नंतर दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रातही काही प्रमाणात आले. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात किंवा समाजात एकाच व्यवसायातील लोकांनी इतक्या कमी काळात इतक्या प्रचंड संख्येने आत्महत्या केल्याचे उदाहरण नाही. हा एका अर्थाने आपण समाज म्हणून करीत असलेला `वंशसंहार’ आहे. गेले पाव शतक चालू असणाऱ्या या ट्रॅजेडीकडे मराठी समाज आणि मराठी साहित्य कसे पाहात आहे? मराठी मालिका कसे पाहात आहेत? मराठी नाटके, मराठी सिनेमे कसे पाहात आहेत? या सगळ्यामागची अर्थशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय शोकांतिका आमच्या लेखकांना कळते आहे का? इंद्रजित भालेराव किंवा इतर काही अपवाद असतील. ते या वेदनेला काही आवाज देत असतील. पण, या साऱ्या शोकांतिकेचे मूळ आमच्या देशाने जो अर्थविचार आपलासा केला आणि त्याची हडेलहप्पीने अंमलबजावणी केली, त्यात आहे. अर्थकारण हे असे विराट मानवी शोकांतिकेला जन्म देऊ शकते. पण आमच्या साहित्याला याचे पुरेसे भान नाही. हे भान काही प्रमाणात दिसले ते मुंबईच्या गिरणी संपानंतर झालेल्या वाताहतीचे चित्रण करताना. पण हे चित्रणही बहुश: तुकडेबाज, जगड्व्याळ कारस्थानाचा आवाका नसलेले आणि जागतिक अर्थकारणाचे फारसे आकलन नसणारे आहे. कामगारवर्गाच्या दुःखाची पलीकडची बाजू या लेखकांना कळलेली नाही. कोकणातील जैतापूर अणुप्रकल्पावरच्या लिखाणाचेही तेच. त्यातही, अर्थशास्त्रीय आकलन कमी आणि एखादी बाजू लावून धरण्याची धडपड जास्त!
मराठी शेतकऱ्यांचा संहार ही जितकी मोठी समाजशास्त्रीय शोकांतिका आहे, तितकीच मोठी ती अर्थशास्त्रीय शोकांतिकाही आहे. पण ती आमच्या लेखकांना फुटकळ लेखनापलीकडे पेलता आलेली नाही. ना यावर काही मोठे संशोधनात्मक लेखन मराठीत झाले, ना साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेईल, अशी कोणती कलाकृती जन्माला आली. दुर्दैवाने, शेतकरी संघटनेची ताकद कमी होत जाणे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत जाणे, या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रात एकाचवेळी घडलेल्या दिसतील. पण शेतकरी संघटना बहरात असताना आणि नंतरही शरद जोशी हे एकमेव मराठी लेखक मला आठवतात की ज्यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेचा, त्यामागील अर्थशास्त्रीय कारस्थानांचा, यातून विस्कटून जाणाऱ्या समाजव्यवस्थेचा आपल्या लेखणीतून सतत वेध घेतला. तोही अत्यंत सोप्या मराठी भाषेतून. शरद जोशी यांच्या साऱ्या भूमिका कदाचित पटणार नाहीत. त्यांचे राजकारण पटणार नाही. मात्र, शरद जोशी हे मराठी वाङ्मयातील एक सोन्याचे नाणे होते. आपण मराठी समाज त्यांना मराठी लेखक म्हणून किती मानतो? शरद जोशी यांना आपल्या साहित्य व्यवहारांत आपण त्यांच्या तीस-चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत असे कितीसे स्थान दिले?
या परिसंवादाच्या विषयात ‘समाजाचे विघटन’ असा एक शब्दप्रयोग आहे. हे विघटन कसे होते? त्याचे बळी कोण असतात? त्याला जबाबदार कोण असतात आणि आपण बळी जात आहोत, हे बळी जाणाऱ्या समाजाला कळत तरी असते का? आणि समजले तर ते काय करीत असतात? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या साऱ्या प्रश्नांना एक चौकट देईल, अशी एक ताजी पाहणी मी आपल्याला सांगतो. ‘ऑक्सफॅम’ या संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, केवळ भारतातील नव्हे तर साऱ्या जगातील विषमता पुन्हा एकदा वेगाने वाढू लागली आहे. केवळ एक टक्क्यांहून कमी लोकांच्या म्हणजे, जगातील सहा लाख जणांच्या हातात जगातील २० टक्क्यांहून अधिक संपत्ती केंद्रित झाली आहे. १९९० पासून उदारीकरण सुरू झाल्यानंतर संपत्तीची निर्मिती झाली. रोजगार वाढले. मात्र, जगात आणि भारतात गेल्या तीन दशकांत विषमता इतकी प्रचंड वाढली की, ही विषमता पुरती घालवू नका. पण निदान १९९० च्या पातळीपर्यंत तरी आणून ठेवा आणि हे काम पुढच्या दहा वर्षांत तरी करा, असे आवाहन जगातील अर्थशास्त्रज्ञांना करावे लागते आहे. पूर्वी समानतेचा आग्रह धरला की, वाटप काय गरिबीचे कारायचे आहे का? असा कुत्सित सवाल केला जायचा. संपत्तीची आधी निर्मिती तर होऊदे, असा त्यामागचा आग्रह असायचा. तो योग्यही होता. पण आता जी संपत्ती निर्माण झाली आहे, तिच्या वाटपाचे काय, हा प्रश्न आज कुणी विचारते आहे का? आमचे लेखक ज्या वेदनांची वर्णने आपल्या कथाकादंबऱ्यांमध्ये करतात, आमचे कवी जे दुःख त्यांच्या कवितांमधून मांडतात, त्या साऱ्या लेखनाचे या जगातल्या विषमतेशी काही नाते आहे की नाही? ते आम्हाला जोडता येणार आहे का? की आमचे दुःख आणि वेदना नुसते ‘शब्द बापुडे केवळ वारा..’ अशा वरवरच्या स्तरावर राहणार आहे? या वेदनेला आणि दुःखाला भव्य पट मिळायचा असेल आणि मुख्य म्हणजे त्यांतून काही सर्जन व्हायचे असेल तर जगाच्या या स्थितीचे मराठी सारस्वताला भान हवे. ते आज आहे का?
सारंग दर्शने
(सहसंपादक, महाराष्ट्र टाइम्स)

विचारस्वातंत्र्याचा जाहीरनामा

मुग्धा कर्णिक
मुग्धा कर्णिक

(नशिक येथे गेल्या आठवड्यात विवेकजागरच्या मंचावर मुग्धा कर्णिक ह्यांचे विचारस्वातंत्र्य ह्या विषयावर भाषण झाले. त्यांचे हे भाषण म्हणजे विचारस्वातंत्र्यावर मुक्त चिंतनच! विचारस्वातंत्र्याचा जाहीरनामाच!! मुग्धा कर्णिक ह्या मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण विभागात संचालकपदावर कार्यरत आहेत. नवशक्ती दैनिकात पत्रकारितेस सुरूवात करताना  लेखनवाचनाशी त्यांची जुळलेली बांधीलकी आजही कायम आहे.                                                          -सीमा घोरपडे पेज एडिटर)

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या स्मृतीनिमित्त विवेकविचारांच्या या जागरात सहभागी होता आले याचा मला अभिमान वाटतो. जानेवारी महिन्यात आता रोहित वेमुलाच्या स्मृतीचाही जागर आहे. ज्या लोकशाही प्रणालीने आपल्याला इथवर पूर्वीच्या मानाने बरेच बरे दिवस दाखवले तिचे पडते दिवस आता आले आहेत असं म्हणायला हरकत नाही.
आणि म्हणूनच लोकशाही देशांपुढील आव्हाने हा विषय निवडून मी आज बोलणार आहे. काही वैयक्तिक अडचणींमुळे मी भाषणानंतर फार वेळ इथे थांबू शकणार नाही. प्रश्नोत्तरे, चर्चा याला वेळेचे बंधन चालत नाही. पण मला आज ते पाळणे भाग आहे. त्यामुळे मी सर्व उपस्थितांना नम्र विनंती करेन की या विषयावरील चर्चा, प्रश्नोत्तरे अखंड सुरू रहावी. आज संध्याकाळपुरती ती मर्यादित असू नयेत. आज संध्याकाळी मी गेल्यानंतर खंड न पडता ती चर्चा आपण सर्वांनी पुढे न्यावी ही माझी विनंती आहे. विवेक, नास्तिकत्व या कळीच्या प्रश्नांवर सार्वजनिक व्यासपीठांवर चर्चा घडवून आणणारा हा नाशिकचा विवेकसमुदाय लोकशाहीपुढील आव्हानांवरही विचारमंथन करत राहील याची मला खात्री आहे.
लोकशाही कशी यावर अनेक तिरकस विनोद सांगितले जातात. ती कशी वाईट आहे, निरुपयोगी आहे वगैरे उपहास केला जातो. पण सत्य हेच आहे की लोकशाही ही शासनप्रणाली विविध शासनप्रणालींमधली त्यातल्या त्यात कमी वाईट म्हणून आधुनिक जगात स्वीकारली गेली. बहुसंख्येच्या निर्णयानुसार सत्तेवर सरकारे येतात. कधी त्यांचे सरळ बहुमत होते कधी नाही. कधी शासन बरे चालते कधी अत्यंत वाईट. पण यातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो की लोकशाही प्रणालीमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याचा सर्वात कमी संकोच होतो. बहुसंख्येचे सरकार चालले तरीही अल्पसंख्यांचे हक्क शाबूत ठेवले जातात.
कुणाही वेगळ्या विचाराच्या व्यक्तीला, संघटनेला बंदी, मुस्कटदाबी सहन करावी लागत नाही हे लोकशाही तत्वाचे आद्य कर्तव्य असते. विरोधी पक्षाला योग्य तो सन्मान याचाच अर्थ विरोधी विचाराला योग्य तो सन्मान हे तत्व आदर्श लोकशाहीत जपले जाते. आपण गावपातळीवरची लोकशाही, राज्यांतर्गत लोकशाही राजकारण याबद्दल सहजच खूप चर्चा करतो. जिथे अनेकदा लोकशाही मूल्ये धोक्यात आलेलीच असतात. पण आज अशी वेळ आली आहे की जगातील लोकशाही तत्वांचा खून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून जागतिक आणि त्या संदर्भात देशपातळीवरच्या लोकशाहीपुढील आव्हानांची चर्चा करायला हवी.
आज जग एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. गेल्या दोनशेचाळीस वर्षांपासून ज्या लोकशाहीकडे जग पाहात आले त्या अमेरिकेतील या वर्षीच्या निवडणुकीने लोकशाही उमेदवाराच्या निकषांचे सारे आडाखेच बदलून टाकले. स्त्रियांबद्दल वाईट बोलणारा, वर्णद्वेष न लपवणारा, इतर धर्मांचा द्वेष उघड करणारा आणि हे करताना उलटसुलट कोलांट्या मारत खरे काय खोटे काय याची भ्रांत जनमानसात तयार करत त्याचा फायदा उचलणारा डॉनल्ड ट्रम्प हा इसम अमेरिकेत निवडून आला. एका हत्याकांडाच्या जबाबदारीचा दोष ट्रम्पकडे नाही एवढीच त्याची उजवी बाजू.
मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्याला अडीच वर्षे लोटली. ट्रम्प अजून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यायचे बाकी आहेत. अजूनही अध्यक्षपदी आरूढ झालेले नसतानाही त्याने औध्दत्याची जी आतषबाजी सुरू केली आहे ती पाहाता भारताचे पंतप्रधान मोदी कधीमधि सौम्यच वाटावेत. पण गेल्या अडीच वर्षांत मोदी, त्यांचा पक्ष, त्यांचा संघ यांनी ज्या प्रकारे प्रचाराची धुमश्चक्री सुरू ठेवली आहे ती पाहाता वाटावे की हे अजूनही निवडणूक मोडमध्येच आहे. निवडणुकींत विविध पक्ष युध्दपातळीवर कामे करतात. पण यांचे तर युध्द सातत्याने सुरू राहिले आहे. यांची प्रचार सेना अजूनही कोणत्याही इश्यूवर एकदिलाने विरोधकांवर तुटून पडते आहे. सत्य-असत्याची सरमिसळ त्यांना अजिबात वर्ज्य नाही. अलिकडेच प्रसिध्द झालेले स्वाती चतुर्वेदी यांचे आय अम अ ट्रोल- हे भाजपच्या डिजिटल सैन्याच्या गुप्त जगाची झलक दाखवणारे पुस्तक अवश्य वाचा. अर्धवट राजकीय जाण असलेले तंत्रज्ञान अवगत असलेले लोक नोकरीधंद्याला लावून त्यांना विरोधकांना सतावण्याचे, अपमानित करण्याचे, तेजोभंग करण्याचे काम लावून दिले आहे भाजपने. ही बाजारबुणग्यांची फौज… नव्या युगातील नव्या मनूचे शेंदाड शिपाई आहेत हे. त्यांना वठणीवर आणण्याचे काम, या सैन्याला आणि त्यांच्या डिझाइनला पुरे पडणे हे लोकशाहीचे रक्षण करू पाहाणाऱ्या सर्वांचे काम होणार आहे. जणू या धोरणाचाच अंगिकार करून तिकडे ट्रम्प आणि त्यांची ब्राईटबार्टवाली सेना जोरात कामाला लागली आहे. कसलाही विधीनिषेध न बाळगता विरोधकांबद्दल वाट्टेल ते लिहिणे, बोलणे, गलिच्छपणा करणे याला ट्रम्पची केवळ साथच नव्हे तर त्याचा क्रियाशील सहभाग आहे.
मोदी स्वतःही अनेक बेमुर्वत भाषेत लिहिणाऱ्या बोलणाऱ्या लोकांचे ट्विटर हॅन्डल्स फॉलो करीत असतात हे पुराव्यांसह उघड झाले आहे. त्यातील बेशरम धमक्यांवरून त्यांनी आपल्या निष्ठावंत झोंडसैन्याला कधीही रोखलेले नाही, टोकलेले नाही. उलट त्यांना बोलावून घेऊन त्यांचे आदरसत्कार वगैरे करणे सुरू केले आहे.
फरक एक जाणवला- की ट्रम्प हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले असूनही ते लोकशाहीला किती घातक ठरू शकतात याचे समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि राज्यशास्त्रीय विश्लेषण करण्यास अमेरिकन बुध्दीवंतांनी वेळ न दवडता, फार शिस्तबद्ध सुरुवात केली आहे. अनेक वैचारिक व्यासपीठे देशपातळीवर एकत्र येऊन विचार मांडत आहेत.
अमेरिकेत लोकशाही रुजलेली असण्याचे हे द्योतक आहे.
आपल्याकडील चित्र तेवढेसे आश्वासक नाही. विरोधी पक्षैक्याचा बोजवारा सुरूच आहे. आपण सर्व मोदी विरोधकांनी, फॅशिस्ट विचारसरणीला अनुलक्षून, त्यांच्या धर्मवादी विचारकेंद्रावरून त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या निर्णयांतील फसवाफसवी, जुमले वगैरे वरून विरोध केला, रेवडी उडवली. पण जो मुख्य मुद्दा त्याकडे काहीसे वैचारिक दुर्लक्ष झाले हे मान्यच करावे लागेल. मोदी हे अगदी निखळ लोकशाही प्रक्रियेतूनच निवडून आले आहेत. त्यांनी भलेही धर्माधारे बहुसंख्य मागास विचारांच्या लोकांना आपल्याकडे वळवून घेतले. जाहिरातबाजीवर प्रचंड काळा पैसा खर्च करून लोकांची दिशाभूल करून स्वतःला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रस्थापित केले. इतर पक्षांच्या नेतृत्वावर अश्लाघ्य आरोप करून, खालच्या पातळीवरची टीका करून लोकांना रिझवत मूर्ख बनवले. फोटोशॉप उद्योगांनी स्वतःला मोठे करणे आणि त्याच पद्धतीने जिवंत किंवा मेलेल्या इतर नेत्यांना बदनाम करणे हेही त्यांनी केले. कदाचित सिद्ध न होण्याजोगे उद्योग त्यांच्या फौजेने निवडणुकांतही केले असतील- पण तरीही जी काही लोकशाही निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पाडूनच मोदी बहुमताने निवडून आले आणि विजयी झाले आहेत.
लोकशाही निवडणूक प्रक्रियेचा वापर करून लोकशाहीचे शत्रू निवडून येऊ शकतात हे आजवर अनेकदा सिध्द झाले आहे. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या वर्षांत, पूर्वीच्या राजवटींतही लोकशाहीबद्दल यत्किंचितही आदर नसलेले राजे, जमीनदार वगैरे प्रकारांतले उमेदवार निवडून येत राहिले आहेत. त्यात बाहुबळ, धमक्या, भय यांचा वापर उघड होता. त्यातील काहींनी, किंवा त्यांच्या वारसदारांनीही अशाच मार्गांनी पिढ्यानपिढ्या सत्ता मिळवली. कालांतरानंतर थोडीफार लोकशाही तत्वे त्यांच्या किंवा लोकांच्या मनात मुलाम्यापुरती का होईना चढली असतील की नाही शंकाच आहे.
पण सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे तर मोदी आणि त्यांचा पक्ष हा मुळातच लोकशाही प्रक्रियाविरोधी आहे हा मुद्दा विश्लेषणाच्या पातळीवर फारसा पुढे आलेला नाही. राजकीय विरोधकांचे मुख्य विवेचन म्हणून अजिबातच पुढे आलेला नाही.तसा तर हा मुद्दा रिपब्लिकन पक्षाबाबत अमेरिकेच्या डेमॉक्रॅट पक्षानेही पुढे आणलेला नाही. पण तात्विक, वैचारिक विरोधकांच्या लेखनातूनही ते विवेचन भारतात फारसे पुढे आलेले नाही. अमेरिकेत ते सुरू झाले आहे. आणि असे निर्भय लेखन, भाषण, मांडणी या बाबतीत आपण त्यांचे मॉडेल घ्यायला हवे.
एखाद्या ठिकाणी जमून नारेबाजी करणे, आंदोलन करणे यात संख्या पुरेशी दिसली नाही तर हेतू पराभूत होतो. पण वैचारिक लेखन, भाषण, चर्चा, सोशल मिडियातील घणाघात यामुळे टिकाऊ परिणाम दिसू लागतात. मोदींचे २००२मधले उद्योग ‘क्लीनचिट’द्वारे पावन झाले कारण त्यांनी कुठेही स्वतःला प्रत्यक्ष समोर येऊ दिले नव्हतेच. पण एका मोठ्या राज्यात लोकशाहीधर्माचे (जुन्याच मानसिकतेतून आलेले त्यांचे ज्येष्ठ नेते त्याला राजधर्म म्हणतात) पालन न करणारा नेता देशाच्या नेतेपदी निवडणूक प्रक्रियेने बसू शकला यात लोकशाही तंत्राचा विजय आहे. पण याच विजयात लोकशाही तत्वांच्या अंतिम पराभवाची बीजे आहेत. ती बीजे कधीही अंकुरणार नाहीत याची काळजी घेणे हे लोकशाहीपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्याच नव्हे तर जगातल्या सर्व लोकशाही प्रणालींपुढे हेच आव्हान आहे.
हे का होऊ शकले, मोदी किंवा ट्रम्पच्या विजयाबाबत हा प्रश्न मोठा महत्त्वाचा आहे. यात समाजाचे प्रतिबिंब आहेच. पण समाजाच्या एकंदर आकलनक्षमतेच्या संदर्भात कितीही काथ्याकूट केला तरीही या दोन व्यक्तींनी ज्या शक्यता समोर उभ्या केल्या आहेत त्या शक्यतांचा पराभव करण्याची, त्यादृष्टीने विचार आणि कृती होण्याची गरज आजच्याइतकी कधीच नव्हती.
पुरोगामी, स्वतंत्र विचारसरणीच्या व्यक्तींना लोकशाही मूल्य हेच सर्वात जवळचे शासनमूल्य आहे. शासन या आवश्यक कृतीयंत्रणेची गरज काही केल्या मोडीत काढता येत नाही. सर्व बऱ्यावाईट शक्यतांसह शासनयंत्रणा स्वीकारावी लागते- तेव्हा निदान व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होऊ नये म्हणून बहुपर्यायी लोकशाही व्यवस्थाच स्वीकारावी लागते. एकव्यक्तीकेंद्री, एकधर्मकेंद्री किंवा एक विचारसरणीकेंद्री शासनव्यवस्था हा व्यक्तींनी बनलेल्या समाजासाठी शाप ठरतो. कारण त्यात दुसऱ्या विचाराला स्थान असणार नाही याचीच काळजी घेतली जाते.
भारत हे तुलनेने नवजात राष्ट्र असले तरीही या राष्ट्राच्या संस्थापकांनी बहुपक्षीय लोकशाही प्रणाली स्वीकारली. वैचारिक विरोध असला तरीही विचार वेगळा असण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी ही प्रणाली व्यक्तीस्वातंत्र्य, समाजाची मोकळी घडण यासाठी उपकारकच आहे. ते तसे नसून भारतीय समाज हा एका शासकाच्या हाताखालीच रहाण्याच्या लायकीचा आहे, प्राचीन भारतीय धर्मसंस्कृतीच्या वर्चस्वाखालीच रहाण्याच्या लायकीचा आहे असे या देशातील एकमेकाला धरून रहाणाऱ्या आणि गोळवलकरी-हिटलरी मूल्यव्यवस्था मानणाऱ्या वर्गाच्या गळी बालपणापासून उतरवले गेले आहे. हिंदू-वर्चस्ववादी अशी ही विचारसरणी मुळातच लोकशाही विरोधी आहे- अगदी थेट इस्लाम वर्चस्ववादासारखीच. हिंदू वर्चस्ववादी, इस्लामी वर्चस्ववादी, ख्रिस्ती वर्चस्ववादी- थोडक्यात धर्मवर्चस्ववादी, श्वेतवर्ण वर्चस्ववादी, वर्ग वर्चस्ववादी अशा कुठल्याही वर्चस्ववादी विचारसरणीच्या गाभ्यांतील विष अगदी असेच जीवघेणे आहे. व्यक्तीस्वातंत्र्य नष्ट करणे, विचारांचे मुक्तपण नष्ट करणे आणि साच्यातून बाहेर पडलेल्या मनुष्यप्राण्यांच्या झुंडींच्या मदतीने वर्चस्व कायम करत जाणे ही या सर्व वर्चस्ववादी प्रणालींची कार्यपद्धती असावीच लागते.
युरोप धर्मवर्चस्वाच्या, वर्णवर्चस्वाच्या विळख्यात सापडला होता, त्यांनी बऱ्याच अंशी तो तोडला, अमेरिकेनेही हा विळखा बऱ्याच अंशी तोडला होता. भारतातील आणि इतर अनेक देशांतील विचारवंतांच्या घुसळणीतून कुठलाही वर्चस्ववाद झुगारून देऊन लोकशाही प्रणाली स्वीकारल्या गेल्या. हिटलर, मुसोलिनी, स्तालिन नंतर पुन्हा तशाच पोलादी पकडींत जीव गुदमरण्याची वेळ जगातील बव्हंश राष्ट्रांनी स्वतःवर येऊ दिली नाही. माओच्या चीनने मात्र या पकडीतच जगणे पसंत केले. द.कोरिया, कांबोडिया, अरब देश, आफ्रिकेतील काही देश येथेही धर्मवर्चस्व किंवा व्यक्तिवर्चस्वाच्या रगाड्याखाली व्यक्ती अजूनही भरडल्या जात आहेत. तेथे व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार दडपून टाकला गेला आहे. विचार करणे, सत्य जाणणे हा अखेर मानवजातीचा मानबिंदू आहे. पोटभर अन्न-वस्त्र-निवारा मिळाला की माणूस त्याकडे वळतोच. कदाचित् म्हणूनच एका मोठ्या जनसंख्येला नागवण्याचा विचार हुकूमशहा करतात.
जेथे जेथे लोकशाही प्रणाली रुजली तेथे तेथे कोणत्याही विचारसरणीचा शारीर निःपात करणे हे लोकशाही विचाराच्या तत्वातच बसत नव्हते. कू क्लक्स क्लॅनसारख्या अतीव अतिरेकी, विकृत संघटनेवर बंदी येऊ शकली, उघडपणे निओनाझी म्हणवून घेणारांना गप्प बसवणे सोपे होते- पण वरवर सुसंस्कृत, इतिहासातील आपल्या स्थानाचे दाखले देत उघड वर्चस्ववादाची नव्हे पण आपल्याच कथित योग्यतेची खात्री हळुहळू पटवून देणाऱ्या संघटनांना बंदी करणे हे मुळातच लोकशाही तत्वांना धरून नाही.
आज अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षसुध्दा तसा श्वेतवर्ण वर्चस्ववादाच्या तोंडात असूनही त्या वर्चस्ववादी विचाराभोवती घट्ट विणलेला नाही. काही कप्पे अजूनही मोकळे आहेत. पण भारतात मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- त्यातून निघालेला जनसंघोत्पन्न भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या अगदी सर्वात किरकोळ अशा शिंतोड्यांसारख्या संघटना- त्यात राम सेनै आहे, बजरंग दल आहे, अपर्णा रामतीर्थकरांचा बँडबाजा आहे- यांची वीण मात्र एकमेकांशी घट्ट आहे. बालपणापासून मने वर्चस्ववादी भूमिकेत जखडून टाकणे, प्राचीन हिंदू धर्माच्या महतीचा मध आणि इतर धर्मांच्या द्वेषाचे विष असे एकत्र मात्रेत चाटवत आपली बाळे वाढवणे हे यांना पालकत्वाचा गाभा वाटते. पुढे अशिक्षित -अविचारीही- जनसामान्यांतील देवधर्मप्रेमाचा फायदा घेत आपली प्यादी पुढे रेटणे हे या विचारधारेने गेली नव्वद वर्षे करत नेले. इतर धर्मांच्या कट्टर संघटनाही हेच करत असतात. लोकशाही भूमिका असलेल्या विचारी लोकांच्या मनात त्यांचा पार बीमोड करावा असे येणे शक्यच नव्हते. म्हणूनच ते वाढू शकले. आणि आता संधी मिळताच ते लोकशाही ध्वस्त करून धर्मवर्चस्ववादी हुकूमशहाच्या प्रस्थापनेच्या प्रयत्नाला लागले आहेत. लोकशाही मार्गाने लोकशाहीची हत्या करणे जरूर संभवते. तो संभव टाळण्यासाठी केवळ जिवट विचारच उपयोगी आहेत.
एकदा का यांची सत्ता स्थिरावते आहे हे दिसले की सत्ताकांक्षी पक्षांतले अनेक बेडूक इथून तिथे उड्या मारतील, संधाने बांधतील. स्वातंत्र्याचा मार्ग सोडणे, निष्ठा सोडणे सर्वात सोपे असते असल्यांसाठी.
त्यांच्या विषाला उतारा देण्यात भारतीय स्वतंत्रताप्रेमी विचारवंत आणि त्यांच्या अनुयायित्वाने वाढलेले पक्ष अथवा संघटना अपयशी ठरल्या असे आज दिसत आहे. असे का झाले याचा त्यांनीच विचार करावा असा एक शहाजोगपणाचा सल्ला आजकाल नेहमीच देण्यात येतो. त्यात देखत प्रतिगामी विचारांच्या लोकांबरोबरच कुठल्याच राजकीय प्रणालींची नीट माहिती नसलेले लोकही भाबडेपणाने सूर मिसळतात. प्रतिगामी शक्तींच्या लोकशाहीप्रणित विजयाने बावचळून गेलेले अनेक लोकही हा प्रश्न गांभीर्याने स्वतःला विचारू लागले आहेत.
मी इथे स्पष्ट म्हणू इच्छिते की हा प्रश्न विचारण्याची गरज नाही. हा प्रश्न पडून घेण्याची गरज नाही. कारण याची उत्तरे वेगळीच आहेत. जगातले अनेक लोक फार कमी वाचन करतात. या देशातले तर फारच कमी. बहुसंख्यांचे इतिहासाचे, त्यातील महत्त्वांच्या घटनांसंबंधीचे ज्ञान फार तुटपुंजे असते. अनेकदा तर ते केवळ आपल्या परिवाराच्या माहितीच्या चौकटीबाहेर जातच नाही. उदाहरणार्थ- वडील म्हणाले गांधी नादान होते, नेहरू ऐय्याश होते की तीच खात्री निष्ठेने पुढे नेली जाते. संघाची लोकं हलकट असे बाबा म्हणाले की ते तसेच मान्य केले जाते. वास्तव नेमके कसे ते तपासून घेतले जात नाही. त्याबद्दलचे वाचन केले जात नाही. शहरांतही वाचनाचे प्रमाण अत्यल्प आणि दर्जा सुमार. तर गावगाड्यात अडकलेल्यांची कथा काय सांगावी.
धार्मिक परंपरांच्या लचांडात आपतः अडकलेली बहुसंख्या या गरीब देशात पोटापाण्याच्या रोजच्या व्यवहारांत इतकी बेदम अडकलेली आहे की डोक्याला ताप देणारे कोणतेही नवे विचार त्यांना झेपत नाहीत. आठदहा माणसांच्या घरात एक विचार करू पाहणारा माणूस असला तरीही त्याला कुटुंबसंस्थेचा जोरा जेंजारून टाकू शकतो. ही नको इतकी निर्ढावलेली कुटुंबसंस्थाही लोकशाही मूल्यसंवर्धनाला मारक आहे हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही.
परंपरेने या देशाच्या जवळपास पन्नास किंवा पंचेचाळीस टक्के जनतेला म्हणजे स्त्रियांना लोकशाही व्यक्तीस्वातंत्र्याची मूल्ये ही मृगजळासमान आहेत. शहरांतही जे पूर्णतः साध्य होऊ शकलेले नाही ते विचारस्वातंत्र्य ग्रामीण स्त्रियांना अपवादानेच मिळते. व्यक्तिस्वातंत्र्याची मूल्येच मुळात न रुजलेला समाज व्यक्तीकेंद्री प्रभावक्षेत्रात न आला तरच नवल. काँग्रेस पक्षात घराणेशाही चालली याला कारण या समाजातून आलेल्या त्यांच्या अनुयायांची तीच जखडलेली मानसिकता आहे. मातृदेवी संकल्पनेच्या प्रभावामुळे नेतृत्वक्षमता असलेल्या काही स्त्रियांना इथे सत्ता मिळाली असली म्हणजे स्त्रीस्वातंत्र्याचे सार्वत्रीकरण झालेले नाही हे उघड आहे. अशा स्त्रियांत लगोलग दुर्गा वगैरे देवीरुपे पाहिली जातात. सर्वसामान्य स्त्रीने मात्र असले काहीही करायचे नसते. त्यामुळे हा एक मोठा वर्ग जाणीवपूर्वक मठ्ठ राहील असेच समाज वागतो.
अशा परिस्थितीत काँग्रेसपक्षापेक्षा अधिक गडगडून बोलणारा नेता आणि त्याचा पक्ष अनेक लोकांनी आपलासा केला यात विचारवंतांचा पराभव वगैरे काहीही नाही. या एका जुनाट समाजामध्ये अचानक उगवून आलेल्या लोकशाही तत्वांचे आयुष्य पुरेसे खतपाणी न मिळाल्यामुळे कोमेजले आहे इतकेच.
तरीही या समाजाने व्यक्तीस्वातंत्र्याची चव चाखलेली आहे. मोदींच्या स्वमग्न-स्वप्रेमी व्यक्तिमत्वाने फार मोठा उत्पात करायला सुरुवात केली तर हा समाज काय करेल हे अजून पाहायचे आहे.
संघाच्या साच्यात घडलेले किंवा सावलीत बसलेले अनेक लोक रामराज्य- कल्याणकारी राजा म्हणजेच कल्याणकारी हुकूमशहा योग्य असे उघड बोलतात. सध्या त्यांच्यासाठी मोदी हेच त्या पदाचे योग्य उमेदवार आहेत. बायकोला वाऱ्यावर सोडणारा माणूस- देशासाठी घरदार सोडणारा संवेदनाशील देशभक्त ठरवला त्यांनी. सूडासाठी राज्य पेटू दिलेला सामान्य वकूबाचा नेता पुरंधर ठरवला त्यांनी. आणि प्रचारासाठी कामी लागलेल्या वानरसेनेने- ट्रोलसेनेने भरपूर पूल बांधले त्याने पादाक्रांत करावे म्हणून. इतिहासाची मोडतोड करून वाट्टेल ते बोलणारा मुळात अर्धशिक्षित मनुष्य विश्वविजेता ठरवायला वेळ नाही लागला त्यांना.
आणि अलिकडचा हा पाचशे नि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा महामूर्खतेचा निर्णय मोदींनी केवळ स्वतःची व्यक्तिशः ताकद सिद्ध करण्यासाठीच देशाच्या माथी लादला. सगळे बडे मर्जीवाले सुरक्षित झाले होते. पक्षाला तोशीस लागणार नव्हती. पण हा प्रयोग होता- माझ्या थापांना लोक किती प्रमाणात बळी पडतात, किती निमूट सारे सोसतात हे पाहण्याचा. तो त्यांनी पाहून घेतला आहे. हा हुकूमशाही पद्धतीचाच निर्णय आहे. केवळ गोडगोड वाटावीत, आणि कुणीच आक्षेप घेऊ धजणार नाही अशा उद्दिष्टांचे ढोल बडवून त्यांनी जनतेला पुरते हवालदिल केले. अडचणीतील माणसे आणखी अडचण नको म्हणून आला दिवस ढकलत रहातात, बोलत नाहीत- याचा हा वस्तुपाठ ठरला आहे.
मा. मनमोहनसिंग यांनी काय किंवा इतरही विरोधकांनी उद्दिष्टे चांगली पण कार्यवाही वाईट अशी टीका केली. पण या मागचे खरे उद्दिष्ट कथित उद्दिष्टांपैकी एकही नसून- मैं झुकाता हूँ देश झुकता है एवढेच सिध्द करण्याचे होते- आणि ते निंद्य आहे. भिरकावून देण्याच्या लायकीचे आहे.
मोदींचे व्यक्तिमत्व एका अकुशल हुकूमशहाचे आहे हे या घटनेवरून पूर्णपणे स्पष्ट होते. या अकुशल, असंस्कृत हुकूमशहाला आपल्या लोकशाही तत्वांनीच मानेवर बसवून घेतले आहे. बरं- मग पुढे?
आता याला प्रखर विरोध करणे एवढेच स्वातंत्र्यप्रेमी विचारांच्या थोड्या लोकांच्या हाती आहे. २०१९मध्ये पुन्हा एकदा हा गुलामवादी विचार जिंकू शकतो. पण तरीही जी थांबत नाही तीच विचारांची- विचारांच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. जोवर लोकशाही रचना पूर्णपणे नष्ट करत नाही तोवर जोरात आणि नष्ट केल्यास भूमिगत असा हा विरोधाचा लढा चालला पाहिजे. विरोधी राजकीय पक्ष वेगळे, आणि विचारशील स्वतंत्र व्यक्ती वेगळ्या.
भारतीय संस्कृती ही आमचीसुध्दा आहे. त्यातील बरे ते ठेवून हीण ते फेकून देऊन तिचा प्रवाह खळाळता ठेवणारे आम्ही विचारी लोक. आम्ही तुम्हा साऱ्या बिळातल्या ढोलबडव्यांपेक्षा अधिक संस्कृतीप्रेमी आहोत. तुमच्या देशभक्तीच्या फडतूस कल्पना फुंकतो आम्ही.
समाजाला बंदिस्त करून गुलाम बनवण्याच्या असल्या स्वप्नांना आम्ही विचारांनी विरोध करत राहू. त्यांच्या थापाभूलथापा उघड्या पाडत राहू. त्यांच्या आज्ञांना भिणार नाही. ज्या काही संस्था व्यक्तीस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य जपतात त्यांचे रक्षण करू. तरूण मुलांना विचारस्वातंत्र्याचे मोल पटवून देणारी पुस्तके वाचायला लावू- किती पुस्तके बॅन करतील ते? आमची निर्भयता त्यांना अखेर मोडून पाडेल. आमचा सत्यावरचा ठाम विश्वास त्यांना पराभूत करेल. त्यांच्या गोंडस सुभाषितांतून, घोषणांतून, नैतिकतेच्या फोलपटांतून त्यांना आरपार पाहातो आहोत आम्ही. त्यांची ओळख पटवण्यात तेच मदत करणार आहेत- आम्ही फक्त त्यावरचा उदबत्त्यांच्या धुराचा पडदा फेडून टाकू.
त्या देशात श्वेतवर्णवर्चस्ववादाविरुध्द, त्या देशात इस्लामी वर्चस्ववादाविरुध्द, त्या देशात टोळीवर्चस्ववादाविरुध्द आमचेच वैचारिक सहोदर लढणार आहेत. आम्ही इथे हिंदू वर्चस्ववादाचे पडघम वाजू लागताच थोडे उशीरा का होईना जागे झालो आहोत. आम्ही मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या कवायती सैन्याशी, बुध्दीमान गोबेल्सशी कुठल्याही सत्तालोभाशिवाय, अप्रामाणिक धनलोभाशिवाय लढणार आहोत.
आज ज्या पद्धतीने मोदींची प्रचारी सेना, पाठिराखे पक्षीय लागेबांधे नसलेल्या विचारवंतांचा अधिक्षेप करतात, त्यांना फुरोगामी, लुळेपांगळे, सिक्युलर वगैरे अभिधाने देतात, त्यांना पैसा पोहोचलाय का विचारतात त्यावरून त्यांना अशा स्वतंत्र वृत्तीच्या विचारवंतांची भयंकर भीती वाटते आहे हे स्पष्ट होते. अधिक्षेपाचे शस्त्र वापरण्याची त्यांच्यावर वेळ आली हे या भीतीचेच लक्षण आहे. नाकारू देत कितीही.
त्यांचे हे शब्द-अपशब्द गौरवपत्रासारखे मिरवावेत. विचारांच्या पातळीवर ते नेहमीच पराभूत होते. नेहमीच रहातील. सत्याच्या पातळीवर ते नेहमीच पांगळे होते. नेहमीच रहातील. त्यामुळे या धुळवडीकडे सरळ दुर्लक्ष करून विचारस्वातंत्र्य प्रिय असलेल्या सर्व विवेकी लोकांनी आपली कठीण अशी झुंज सुरूच ठेवली पाहिजे. ज्या देशात लोकांना ‘यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भविति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य संभवामि युगे युगे’ यासारखे महाकाव्यातले काव्यात्म वचन एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या स्वरुपात अजूनही खरे वाटते तिथल्या विचारांच्या ग्लानीची भीती वाटण्यासारखीच परिस्थिती आहे. इथे अजूनही लोक एका विचाराला देवाचे रूप देतात आणि मग विचार विसरून जातात. जन्म नि मरण यांच्या सोयरसुतकाच्या अविरत सोहळ्यांत नव्या विचाराचे स्पर्श बुध्दीला हलवून सोडूच शकत नाहीत. विचारांच्या ग्लानीवर उत्तर देतो तो प्रत्येक युगातला नवा विवेकी विचार आणि त्यातून निर्माण झालेली कृती  हे पटवणे कठीण आहे. पण ते पटवले पाहिजे. प्राप्त परिस्थितीशी लढायला उद्युक्त करणारा विवेकवाद आताच्या या मोदीशहासंघरूप संकटाशी झुंजवावा लागेल. धरून चालू त्यांचा पगडा अजून काही काळ कायम राहील. पण अखेर सत्य बाहेर येतेच. आजच त्यांच्या पक्षातील, संघातीलही अनेकांना त्यांचे खरे रूप अलिकडच्या नोटनिर्णयानंतर जाणवले आहे. त्यांच्या स्वभावविकृतीच्या कथा हळुहळू त्यांच्याच आतल्या गोटांतून प्रसृत होऊ लागल्या आहेत. स्वतःवर खूष असलेल्या, राक्षसी महत्त्वाकांक्षी असलेल्या, बोलक्या माणसाचा करिश्मा- रोजच्या पोटापाण्याच्या मागे असलेल्या साध्याभोळ्या लोकांना भुलवतोच याची आपण राज्याराज्यांत अनेक उदाहरणे पाहिली आहेत. मोदी हे त्या सर्वांचे मेरूमणि म्हणायचे. आणि ज्या संघटनेतून त्यांना द्वेषाचे आणि स्वयंश्रेष्ठत्वाचे बाळकडू मिळाले ती संघटना लोकशाहीविरोधी असल्यामुळे त्यांचा धोका फार मोठा आहे. उद्या त्यांचे उजवे हात अमित शहा त्यांची जागा घेऊन आले तर तेही तितकेच धोकादायक ठरतील. या संघटनेच्या विचाराला- अविचाराला थाराच मिळू नये हे साध्य करायचे तर ती झुंज शतकभराची असेल. किंवा अधिक. आत्ताच पुरोगामी का अयशस्वी ठरतात याचे मूल्यमापन करा, ते कधीच जिंकणार नाहीत वगैरे टीकेचा भाग हा त्यांच्या खिजवण्याच्या धोरणाचा भाग आहे. त्याला बळी पडून पराभूत मानसिकता आपण स्वीकारता कामा नये. पल्ला बराच मोठा आहे.
कारण आपला देश, आपले लोक आहेत हे असे आहेत…
देश सोडता येत नसेल, लोक सोडता येत नसतील तर- देशातील लोकांच्या डोक्यांच्या घड्यांवर पाणी ओतत रहाण्यावाचून दुसरा काय पर्याय आहे?
तेच करत राहू या.
मी मांडलेल्या या विवेचनाचे बरेच मोठे श्रेय येल विद्यापीठातील इतिहासाचे, होलोकॉस्ट इतिहासाचे प्राध्यापक टिमथी स्नायडर यांना आहे. त्यांच्या विश्लेषणांतून या विवेचनाला दिशा मिळाली आहे. प्रा. टिमथी स्नायडर यांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी काय करायला हवे या विचाराचे वीस मुद्दे मांडले आहेत. ते मी माझ्या भाषणाच्या अंती, इथे आपल्या सर्वांसाठी तसेच्या तसे देत आहे. हे मुद्दे ऐकत असताना आपल्याकडल्या उदाहरणांचा मी उल्लेख केला नाही तरीही तुम्हाला ती उदाहरणे नक्की आठवतील याची खात्रीच आहे मला.
1- गरज नसताना अगोदरच माना तुकवू नका. बऱ्याचशा अधिकारशहांना जी सत्ताशक्ती मिळते ती लोक स्वतःहून देऊ करत असतात. असल्या कठीण काळात तर अनेक व्यक्ती शासनाला आपण कसं वागलेलं रुचेल याचा विचार करून आधीच तसे वर्तन करू लागतात. तसं करू नका. त्यांना अपेक्षित असलेला आज्ञाधारकपणा आधीच देऊ केलात तर अधिकारशहांना लोकांना आज्ञांकित करण्यातील शक्यता ध्यानी येतात. आणि त्यांची आपल्या स्वातंत्र्यावरील जुलमी पकड घट्ट होत जाते.
2- संस्थेचे रक्षण करा.
न्यायालये, माध्यमे, किंवा वृत्तपत्रे यांचा मागोवा घेत रहा. कुठल्याही संस्थेला आपली मानत असाल तर तिच्यासाठी काही कृती करावी लागेल. संस्था कधीच स्वतःच स्वतःला संरक्षित करू शकत नसतात. त्यांना सुरुवातीपासून विचारसामर्थ्याचे पाठबळ नसेल तर त्या झरझर गडगडत जातात.
3- राष्ट्रनेते आणि पुढारी जर नकारात्मक उदाहरणे घालून देत अशतील तर आपण आपले काम अधिकच न्यायबुध्दीने करणे महत्त्वाचे ठरते. कायद्याचे राज्य मोडीत काढणे वकिलांशिवाय शक्य होत नाही, आणि दिखाऊ खटले चालवणे न्यायाधीशांशिवाय शक्य होत नाही.
4- राजकारण्यांची भाषणे ऐकताना काही शब्दांकडे सावधपणे लक्ष असू द्या.
दहशतवाद, अतिरेकी या शब्दांचा वापर वाढू लागला की सावध व्हा. अपवादात्मक परिस्थिती किंवा आणिबाणीची परिस्थिती या कल्पना मोठ्या धोकेबाज असतात. देशभक्तीच्या फसव्या शब्दयोजनांबद्दल मनात संतापच असायला हवा.
5- कल्पनेपलिकडची अवांच्छित परिस्थिती उद्भवली तर शांत रहा.
दहशतवादी हल्ला झाला असेल, तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की अनेकदा सगळे अधिकारशहा अशा घटनांची फार वाट पाहात असतात. त्यातून त्यांच्या शक्तीचे एकत्रीकरण होत रहायला मदतच होणार असते. राइशटॅगच्या आगीची आठवण ठेवा. असल्या प्रकारची आपत्ती सत्तेचा तोल ढळवायला, विरोधकांना नामोहरम करायला उपकारक ठरते. हिटलरी पाठ्यपुस्तकातला फार महत्त्वाचा धडा आहे तो. त्याला बळी पडू नका.
6- भाषेचा सुज्ञ वापर करा.
सगळेजण एकसाथ जे वाक्प्रचार वापरत आहेत ते वापरणं टाळा. स्वतःची वैचारिक बोली स्वतः घडवा. दुसरे लोक जे बोलत आहेत तेच तुम्ही मांडणार असलात तरीही. झोपण्यापूर्वी इंटरनेट वापरू नका. आपली गॅजेट्स दुसरीकडे चार्जिंगला लावा. आणि वाचा. काय वाचणार? वाक्लाव हॅवेलचे द पॉवर ऑफ द पॉवरलेस, जॉर्ज ऑर्वेलचं १९८४, स्झेस्लॉ मिलोझचे द कॅप्टिव माइन्ड, आल्पर्ट काम्यूचे द रिबेल, हॅना आरेन्डचे द ओरिजिन्स ऑफ टोटॅलिटेरियनिझम, किंवा पीटर पोमेरान्त्सेवचे नथिंग इज ट्रू अँड एव्रीथिंग इज पॉसिबल.
7- वेगळे उठून दिसा.
कुणीतरी असायलाच हवं वेगळं. उक्तीने आणि कृतीने सर्वांसारखंच असणं सोपं असतं. काहीतरी वेगळं करणं थोडं विचित्र, अस्वस्थ करणारं वाटेल. पण थोडं अस्वस्थ झाल्याविना मुक्ती मिळणार नसते. ज्या क्षणी तुम्ही उदाहरण घालून देता, जैसे थेचे गारूड भंग पावते. आणि मग इतर अनेक तुमच्या सोबत चालू लागतात.
8- सत्यावर विश्वास ठेवा.
वास्तव नाकारणे म्हणजे स्वातंत्र्यच नाकारणे. काहीच सत्य नसेल तर मग सत्तेवर कुणी टीकाच करू शकणार नाही, कारण तसं करायला काही पायाच उरत नाही. काहीच सत्य नसेल तर मग सगळाचा देखावा. आंधळं करून सोडणाऱ्या झगझगाटावर कुणीतरी भरपूर पैसा खर्च करत असतं हे कधीही विसरायचं नाही.
9- शोध घेत रहा.
घटनांचे अर्थ स्वतः लावायचा प्रयत्न करा. दीर्घ लेख वाचण्यासाठी वेळ काढा. शोधपत्रकारिता करणाऱ्या प्रिंट मिडियाला आर्थिक पाठबळ द्या. तुमच्या डोळ्यासमोरच्या चकचकत्या पडद्यावरच्या अनेक गोष्टी तुमचे नुकसान करण्यासाठीच तिथे चमकत असतात हे समजून घ्या. विदेशी प्रचाराचा शोध घेणाऱ्या साइट्सबद्दल वाचा.
10- थोडं सक्रीय राजकारण
सत्ताधाऱ्यांना तुम्ही खुर्चीत बसूनबसून थुलथुले व्हावे, तुमच्या भावना पडद्यावरच्या चकचकाटात विरळ विरंजित व्हाव्यात असेच वाटत असते. बाहेर पडा त्यातून. जरा अनोळखी लोकांत, अनोळखी जागी फिरा. नवे मित्र जोडा आणि त्यांच्यासोबत चार पावले चाला.
11- डोळ्याशी डोळा भिडवा, बोला.
हे केवळ विनम्रता दाखवण्यासाठी नव्हे. आपल्या परिसराशी जोडून घेण्यासाठी करावे लागेल. अनावश्यक सामाजिक भिंती पाडण्यासाठी, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही, हे समजण्यासाठी हे करावे लागेल. आपल्याला इतर सर्वांना तुच्छ लेखण्याच्या काळात जगण्याची वेळ आली तर आपल्या रोजच्या जगण्यात डोकावणाऱ्या मनोभूमिकांशी ओळख हवीच.
12- जगात जे घडतं आहे त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल
स्वस्तिके किंवा अशाच द्वेषचिन्हांकडे डोळे उघडून पहा. नजर फिरवून काहीच साध्य होणार नाही. या चिन्हांपासून स्वतःला दूर ठेवा आणि इतरांना तेच उदाहरण घालून द्या.
13- एकपक्षीय राष्ट्राच्या कल्पनेला विरोध करा
ज्याज्या पक्षांनी आजवर एकछत्री सत्ता काबीज केली ते कधीतरी काही काळापूर्वी वेगळे होते. आपल्या विरोधकांना मोडून काढण्यासाठी त्यांनी एखादा ऐतिहासिक क्षण वापरून घेतला. असे होऊ नये म्हणून सर्व निवडणुकांत सहभागी होऊन मतदान करा.
14- चांगल्या कामांना आर्थिक मदत करा
चांगले काम करणारी एखादी संस्था शोधून तिला नियमित मदत करा. यामुळे आपण नागरी समाजाचा एक भाग आहोत आणि स्वतंत्र निवड करू सकतो हे भान जागे राहील.
15- खाजगी अवकाश सांभाळा
हलकटपणे वागणारे सत्ताधारी तुमच्याबद्दलची माहिती वापरून तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. आपला काँप्युटर वेळोवेळी मालवेअरमुक्त करा. इमेल्स म्हणजे खुल्या आकाशावर लिहिण्यासारखेच आहे. इंटरनेटवरील पर्यायी मार्ग वापरून संपर्क करा. किंवा सरळ नेट कमीच वापरा. व्यक्तिगत निरोप व्यक्तिशः प्रत्यक्षच द्यायची सुरुवात करा. कायद्याशी संबंधित काहीही प्रकरणे असतील तर ती लवकरात लवकर निपटून टाका. अधिकारशहांचे राज्य अखेर ब्लॅकमेलवर चालते. कुठल्या हुकाला तुम्हाला टांगायचं त्याचा शोध घेत असते. फार जास्त हूक्स ठेवू नका.
16- इतर देशांकडून शिका. विदेशांत आपले मित्र असू द्या. नवे विदेशी मित्र अवश्य जोडा. इथल्या अडचणींतून एक सार्वत्रिक दिशा दिसते आहे. कुठल्याच देशाला एकेकट्याने उत्तरे मिळणार नाहीत. तुमच्याकडे आणि तुमच्या कुटुंबियांकडे पासपोर्ट्स असतीलच असं पहा.
17- अर्धलष्करीदलांकडे लक्ष असू द्या
व्यवस्थेच्या विरोधात असल्याचं बोबंलून सांगणारे लोक जेव्हा गणवेष धारण करून, मशाली पेटवून कवायती करू लागतात, एखाद्या नेत्याचं चित्र फडकवत फिरतात तेव्हा अखेर जवळ आली असं समजा. नेत्याचे निमलष्करी अनुयायी आणि अधिकृत पोलीस किंवा लष्कर मिसळू लागतात तेव्हा खेळ संपला असंच समजायचं आहे.
18- शस्त्र धारण करण्यापूर्वी विचार करा
सार्वजनिक सेवेचा भाग म्हणून तुमच्याकडे शस्त्र असेल तर देव तुमचं भलं करो आणि तुमचं रक्षण करो. पण भूतकाळात पोलीस आणि शिपाई यांनी केलेली दुष्कृत्ये आठवा. नकार देण्याची मानसिक तयारी ठेवा. याचा अर्थ समजत नसेल तर एखादे होलोकॉस्ट म्यूझियम अवश्य पहा आणि कर्तव्यातील नैतिकता पालनाच्या प्रशिक्षणाबद्दल थोडेसे जाणून घ्या.
19- धैर्यवान रहाण्याचा यत्न करा
आपल्यापैकी कुणीच स्वातंत्र्यासाठी मरायला तयार नसेल तर आपण सारेच स्वातंत्र्याविना मरून जाऊ.
20- देशभक्त असा
नवा अध्यक्ष देशभक्त नाही. अमेरिका काय आहे याचे भान येणाऱ्या पिढ्यांना असावे म्हणून चांगले उदाहरण आपणच घालून द्यायला हवे. त्यांना त्याची फार गरज भासेल.
टिमथी स्नायडर यांनी जणू एक रोडमॅप दिला आहे. जो अमेरिकेलाच नव्हे तर लोकशाही प्रेमी भारतदेशालाही मार्गदर्शक ठरणार आहे.
या देशात लोकशाहीप्रणाली रुजण्यासाठी कारणीभूत ठरलेले गांधी, नेहरू, आंबेडकर असे तत्ववेत्ते नेतृत्व वावरून गेले. त्यांनी या लोकशाहीला जे दिले ते असे सहजी पराभूत होणारे नाही. संतति पित्याच्या विचारांचा पराभव करताना पाहतो आपण. पण खऱ्या चिरंतन मूल्यविचाराचा पराभव फार काळ टिकत नाही.
आपल्या हृदयातली विवेकाची ज्वाळा सतत जळत ठेवण्याची भाषा आपण सर्वांनी शिकायला हवी. भीती ही अत्यंत भीतीदायक गोष्ट आहे हे एकदा स्वच्छपणे कळले की त्यावर मात करायला वेळ लागत नाही.
आपल्या विचारांचे फळ चुटकीसरशी किंवा एकाददुसऱ्या निवडणुकीसरशी नाही मिळणार कदाचित्. पण तरीही हाच विचार खरा आहे. आपली देशभक्ती खरी आहेच आणि आपले मानववंशावरले प्रेम असे कुंपणांत बांधले जाणारे नाही याचे भान असलेल्या अनेकांसमोर मला माझे विचार मांडायची संधी दिलीत याबद्दल मी संघटकांचे मनःपूर्वक आभार मानते.
सत्याचा विजय असो.
स्वातंत्र्याचा विजय असो…
जय हिंद!

मराठा गडी यशाचा धनी!

महाराष्ट्रात अठरापगड जाती असल्या तरी मराठा ही जात सर्वश्रेष्ठ असल्याचे महाराष्ट्रात झालेल्या जातीविषयक संशोधनात सिद्ध झाले आहे. अनेका संशोधकांच्या मते, मराठा हा शब्द ‘महा’ म्हणजे मोठा आणि ‘रथी’ म्हणजे योद्धा ह्या दोन संस्कृत शब्दांच्या समासाने तयार झाला आहे. त्याचेच अपभ्रंश रूप म्हणजे मराठा! महाराष्ट्र हा शब्द भांडारकरांच्या मते, ‘महा रट्ट’ ह्या शब्दाचे संस्कृत रूप आहे. कारण महाराष्ट्रात मराठ्यांची सत्ता होती. मराठा आणि रजपूत हे दोन्ही मूळचे क्षत्रिय असून आपण दोन्ही एकच असल्याचा दावा मराठा मंडळी करत असतात. शिवाजीमहाराजांचा मूळ वंश राजपुतानातील सिसोदिया आहे, असाही दावा संशोधकांनी केला आहे. मराठा जातीत अस्सल अथवा कुलीन मराठे आणि त्याशिवाय इतर मराठे असे दोन स्पष्ट भेद आहेत. ह्याखेरीज लेकावळे, अक्करमासे किंवा शिंदे असे त्यांच्यात कनिष्ट मानले गेलेले भेद आहेत. 96 कुळी मराठ्यांची यादी तर प्रसिद्ध असून त्यांच्यात आडनावविशिष्ट चालीरीती आणि देवकही निश्चित ठरलेली आहेत. देवके आणि घरातल्या चालीरीती लग्ऩ जुळवताना देवके आणि चालीरीतीवरून मराठा कुलीन आहे की नाही हे जाणकारांना ओळखता येते. नुसत्या आडनावावरून जात ओळखता येत नाही.
शिवाजीमहाराजांना स्वतःचे राज्य स्थापन करण्याची प्रेरणा रामवरदायिनी तुळजा भवानीपासून झाली. अर्थात आईच्या प्रोत्साहनामुळे बालवयातच त्यांनी पराक्रम गाजवला. त्यांनी स्थापन केलेले राज्य बाळाजी विश्वनाथ आणि थोरले बाजीराव ह्या दोघांनी वाढवले. शाहू आणि ताराराणी ह्यांच्यात राज्यगादीवरून भांडण सुरू झाले तरी मोगलाप्रमाणे कत्तल करण्याचा प्रकार घडला नाही. पेशव्यांनी दोन्ही गादीत सलोखा कायम ठेवण्चाचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात त्यांना ब-यापैकी यशही मिळाले. राज्यस्थापनेची वा राज्य चालवण्याची प्रेरणा ही मराठा समाजात उपजत आहे. कोल्हापूर संस्थानाने ब्रिटिशांचे मांडलिकत्व पत्करले तरी राज्यात समता आणि स्वातंत्र्य टिकवण्याचा शाहूमहाराजांनी आटोकाट प्रयत्न केला. प्रजेच्या सुखाची काळजी घेण्याच्या बाबतीत शाहूमहाराजांकडून हलगर्जीपणा झाला नाही. म्हणूनच त्यांच्याबद्दल लोक आजही आदराने बोलतात.
मराठा समाज वैदिक संस्कृतीचा भोक्ता आहे. वैदिक संस्कृतीशी मराठा समाजाची नाळ जुळण्याचे कारण सप्तसिंधूत वास्तव्य करणा-या आर्यांच्या टोळ्यांपैकी काही जणांनी ज्ञान मार्गाची कास धरली. त्या काळात ज्ञान म्हणजे प्रातिभ ज्ञान असेच मानले गेले. वेदातील ऋचा लिहीणारे तेच पुढे ऋषी म्हणून ओळखले गेले. ज्ञानमार्गाने जाणा-या ह्या वर्गातून पुढे ब्राह्मणवर्ग उदयास आला. आर्यांपैकी काहींनी संस्कृती आणि देशाच्या संरक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले. तेच पुढे क्षत्रिय म्हणून ओळखले गेले. राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रात आर्यांच्या टोळ्या उतरल्या. स्वतःला सूर्यवंशीय म्हणवून घेण्यात मराठा मंडळी अभिमान बाळगतात. ह्यावरूनच वैदिक संस्कृतीशी मराठावर्गाची  असलेली नाळ स्पष्ट होते. मराठा गडी यशाचा धनी ह्यावर मराठावर्गाचा आजही भर आहे.
शाहूमहाराजांच्या काळात ब्राह्मण आणि मराठा ह्यांच्यात वाद उद्भवण्याचे कारण ही पौराणिक पौरोहित्यास कसून विरोध केला. आपल्या खासगीत असलेल्या पुरोहिताने वैदिक पौरोहित्य करावे अशी स्पष्ट भूमिका शाहूमहाराजांनी घेतली. दुर्दैवाने त्यांच्या भूमिकेस ब्राह्मणवर्गाने विरोध गेला. पुढे त्यांच्यातील  ही तेढ वाढतच गेली हा इतिहास सगळ्यांना माहित आहे.
सीमा घोरपडे,पेजएडिटर

( हा लेख ज्ञानकोश, संस्कृतीकोश ह्यासारख्या ग्रंथात व्यक्त झालेल्या विद्वानांच्या मतावर आधारित आहे.)

टिळकांचीच चतुःसूत्रीच गांधींनी पुढे चालवली!

(नामदार गोपालकृष्ण गोखले ह्यांना महात्मा गांधींनी जरी राजकारणाचे गुरू मानले तरी गांधीजींचा स्वातंत्र्य लढा हुबहूब टिळकांच्या स्वराज्याच्या लढ्यासारखाच होता. गांधीजींचे राजकारणही प्रसंगानुसार जहाल होत गेले. त्यात दक्षिण आफ्रिकेत दिलेल्या लढ्याच्या अनुभवांची भर पडली होती. केव्हा ते सत्याग्रह मागे घेतील आणि केव्हा ते केव्हा ते उपोषण सुरू करतील ह्याबद्दल कोणालाच काही सांगता येत नव्हते!   -पेजएडिटर सीमा घोरपडे)

1818 साली मराठशाही नष्ट झाल्यापासून, गेल्या दिडशे वर्षात, महाराष्ट्रामध्ये जी निरनिराळ्या प्रकारची वैचारिक आंदोलने होऊन गेली, त्याचे धावते समालोचन, शिवाजी विद्यापीठाच्या या टिळक व्याख्यानमालेत, मी करणार आहे. दिडशे वर्षांच्या या कालावधीत अखिल भरतखंडात धर्मपुरुष, समाजसुधारक, तत्वचिंतक, राजकारणी, वैज्ञानिक, साहित्यकार इत्यादी निरनिराळ्या क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती अनेक होऊन गेल्या, व त्यांनी आपआपल्या परीने, त्याच्या प्रगतीला हातभारही लावला. बाळ गंगाधर टिळक हे नुसते नेतेच नव्हते, तर धर्म, समाज, तत्वजिज्ञासा, विज्ञान, इतिहास, साहित्य विषयांतही त्यांनी आपल्या बुद्धीचा आणि कर्तुत्वाचा प्रभाव प्रकट केला. 1920 साली त्यांचे देहावसान झाल्यावर, त्यांच्याशी तुल्य असे मोहनदास करमचंद गांधी आणि भीमराव आंबेडकर हे जे दोन महापुरुष उदयाला आले, त्यांच्याही कर्तृत्वाचा ठसा भरतखंडाच्या आधुनिक इतिहासावर उमटला. आपल्या या पुरातन देशाची संस्कृती आणि संचित ही दोन्ही अनादी आहे. जितकी अनादी, तितकीच संकिर्णही! कारण, सगळ्या जगातले वांशिक आणि वैचारिक प्रवाह, चालू घटकेपर्यंत, त्यात सारखे संमीलीत होत आलेले आहेत. नाना प्रकारच्या स्थित्यंतरातून शतकानुशतके विकसित आणि संमीलित होत आलेल्या या संस्कृतीचा आणि संचिताचा जो महान वारसा आपल्याला लाभलेला आहे, तो वारसा आधुनिक कालातील या आमुलाग्र बदललेल्या परिस्थितीनुसार, योग्य त्या सुधारणा करुन, पुढे चालवण्याचा अनेक कार्यकर्त्यांनी केला, त्यात टिळक, गांधी आणि आंबेडकर हे काही बाबतीत, अग्रणी आणि अतुल ठरतात.
कोणताही महापुरुष हा भूतकालाचा वारसा घेऊन पुढे येतो, आपल्या भोवतालच्या वर्तमान परिस्थितीला अनुरुप असा आकार देऊन स्वतःचे जीवितकार्य पार पाडतो, व अशा रीतीने स्वतः सुधृत आणि समृद्ध केलेला तो वारसा भावी कालाच्या स्वाधीन करुन निघून जातो. काल आणि कर्तृत्व यांचा यांचा असा परस्परानुबंध असल्याचे इतिहासात दृष्टीस पडते. म्हणून, या दिडशे वर्षांच्या या कालातील टिळक ही मध्यवर्ती व्यक्ति आहे.
1825 पासून 1875 पर्यंत जी आंदोलने महाराष्ट्रात झाली, त्यांचा वारसा घेऊन टिळक, न्यू इंग्लिश स्कूल आणि ‘केसरी- मराठा’ वृत्तपत्रे यांचे प्रवर्तक म्हणून लोकांपुढे आले,  व 1882 पासून 1920 पर्यंत त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचा आणि त्याचबरोबर भरतखंडाचाही इतिहास घडवला. या मधल्या कालखंडात गीतेवरील भाष्यापासून तो स्वराज्याच्या लढ्यापर्यंत जे नानाविध उपक्रम त्यांनी केले, त्यांचा वारसा नंतर 1920 पासून 1948 पर्यंत गांधीनी चालविला, महात्माजींचे पट्टशिष्य आचार्य काकासाहेब कालेलकर यांनी टिळकांच्या निधनाचा त्यांच्या मनावर झालेल्या परिणामाची अशी आठवण नमूद केलेली आहे की, “तोपर्यंत बापूजींनी ‘स्वराज्य’ हा शब्द उच्चारला नव्हता. पण, टिळकांच्या निधनाच्या दिवशी ते म्हणाले लोकमान्य गेल्यामुळे स्वराज्याचा झेंडा खाली पडता कामा नये”.  आणि त्यांनी ताबोडतोब लोकमान्यांचे स्मारक म्हणून, लोकमान्य स्वराज्य फंड सुरु केला”. 1904 सालापासुन स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही जी चतुःसुत्री, स्वतःच्या नव्या राष्ट्रीय पक्षाचा लढाऊ कार्यक्रम म्हणून,  टिळकांनी जनतेपुढे ठेवलेली होती, या चतुःसूत्रीचाच अंगीकार म्हणून स्वराजाचा लढा अखेर गांधीनी यशस्वी केला. इतकेच नव्हे तर 1916 मधे लखनौ येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात, टिळकांनी,  बॅ. जिना यांच्या सहकारितेने, कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यांत जो करार घडवून आणला, तेच सूत्र हाती घेऊन गांधीनी हिंदु-मुस्लीम ऐक्य घडवून आणण्यासाठी शेवटपर्यत भगीरथ प्रयत्न केले, अशा रितीने, टिळकांचे विभूतीमत्व हे या दीड शतकाच्या कालावधीत मध्यवर्ती असल्यामुळे, त्याच्या अनुषंगाने या काळातील आंदोलनाचा परामर्श घेणे योग्य होईल, असे मला वाटते.

ग. त्र्यं. माडखोलकर

सांब सदाशिव पाऊस दे

( पाऊस सुरू झाल्याने महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले संकट तूर्त तरी टळल्यासारखे वाटते. पण पावसानंतर धान्य पिकेल का? आणि पिकले तर ते स्वस्त मिळेल का? उशिरा का होईना, पर्जन्यराजा बरसला. तो ला निनोच्या कृपेने बरसला की इंद्राच्या कृपेने बरसला ह्या वादात जाण्याचे कारण नाही!.. मुळ मुद्दा असा की पाऊस पाडण्यासाठी देशातल्या आणि जगातल्या सरकारांना अजून तरी काही करता आलेले नाही. )
हवामानात बदल घडवून आणण्याचे प्रयोग अमेरिका आणि रशियात करण्यात आले. भारतातही कृत्रिम उपायाने पाऊस पाडण्याचे प्रयोग झाले. अजूनही ह्या प्रयोगांना म्हणावे तसे यश आलेले नाही हे वास्तव शिल्लक आहेच. बरे, पाऊस पडला तरी धान्य, भाज्या, फळे स्वस्त मिळण्याची आशा नाहीच. शहरी भागातली कृत्रिम टंचाई आपण समजू शकतो. परंतु ज्या गावात हे सारे पिकते तेथेही ते स्वस्त मिळू शकत नाही. कारण, शेतक-यांना द्यावा लागणारा पैसा गावक-यांच्या हातात नाही. जुन्या काळात पर्जन्यराजाची आराधना करण्याचे कल्पक मार्ग गावोगावी अवलंबले जात असत. देवाला पाण्यात कोंडणे हा एक लोकप्रिय मार्ग देशभरात अवलंबला जायचा. पेजएडिटर सीमा घोरपडे सादर करीत आहे अशीच एक गोष्ट सुप्रसिध्द लेखक साने गुरूजी ह्यांच्या ‘श्यामची आई’ पुस्तकातली! गावच्या ह्या गोष्टीतला नायक आहे गाव आणि साने गुरूजी स्वतः!
ह्या गोष्टीतली मागणी मजेशीर आहेः “सांब सदाशिव पाऊस दे शेते भाते पिकू दे
पैशाने पायली विकू दे” )
सांब सदाशिव पाऊस दे
त्या वर्षी पाणी पडे ना, पीक वाढेना. अवर्षणाची चिन्हे दिसू लागली. अवर्षण जावे व वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पध्दत आहे. गावात शंकराचे देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवावयाचे. सारा गाभारा पाण्याने भरून टाकावयाचा. भटजी रूद्र म्हणत असतात. काही लोक पाण्याचे हांडे भरभरून आणीत असतात व ओतीत असतात. सात दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा. सात दिवसच नाही, तर पाऊस पडेपर्यत. गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो, त्याची यादी होत असे व त्यांना ते वेळ वाटून देत. तसेच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावीत.
शंकरच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या -त्या ऋषीच्या- डोळ्यांसमोर सर्व ब्रह्मांड आहे, असे वाटते. भराभर सारी सृष्टी त्याच्या डोळ्यांसमोरून जात आहे, असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या सा-या गरजा त्याच्या डोळ्यांसमोर आलेल्या आहे, असे वाटते. तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे असे वाटते. माझ्या वडिलांना रूद्र येत असे. त्यांची पाळी रात्री बारानंतर येत असे.
आई मला म्हणाली, “ जा जा रे तू देवळात. पाणी आणावयास नाही का लागत, जा.”
“ मला नाही उचलणार ते हंडे. केवढाले हंडे व घागरी! ” मी म्हटले.
“ अरे आपली लहान कळशी घेऊन जा. नाही तर, तांब्या नेलास तरी चालेल. विहीरीतून एकेक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा. गणपतीच्या विहीरीवर उतरावयाचेही सोपे आहे. सरळ पायठण्या आहेत. जा, तो तांब्या घेऊन जा. ” आई म्हणाली.
“ एवढासा तांब्य ग काय घेऊन जायचे? तू म्हणशील झारी नाही तर पंचपात्रीच घेऊऩ जा. लोक हसतील तेथे! ” मी नाखुशीने म्हटले.
“ श्याम कोणी हसणार नाही. उलट, तू मोठी घागर उचलू लागलास, तर मात्र लोक हसतील. आपल्या शक्तीबाहेर काम करू पाहणे तेही वाईट; परंतु आपल्याला जेवढे काम करता येईल, तेही न करणे व आळशासारखा बसणे तेही वाईट. हे सा-या गावाचे काम आहे. तुला रूद्र म्हणात येत नाही, तर नुसते पाणी घाल. या कामात तुझा भाग तू उचल. प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. कामचुकारपणा वाईट.”
शेवटी मी उठलो. लहानशी कळशी देवळात गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती. शंकराला कोंडीत होती, पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते. पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती. मी त्यांच्यात मिळलो. मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले, “ श्याम, आज आलास वाटते? तू इंग्रजी शिकतोस, म्हणून लाज वाटत होती वाटते? ” मी काही बोललो नाही. लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती. वेदातला नव्हे हो, संस्कृतही नव्हेत, हो. त्यांचे मंत्र मराठीत होते.
सांब सदाशिव पाऊस दे
शेते भाते पिकू दे
पैशाने पायली विकू दे
हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेतेभाते पिकोत. स्वस्ताई होवो, असे देवाजवळ ती मुले मागत होती. मला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रूद्र येत नव्हता व हे बालमंत्र म्हणावयासही लाज वाटत होती. परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली. मी मोठमोठ्याने “सांबसदाशिव पाऊस दे” म्हणू लागलो; मीही त्या मुलांत मिसळून गेलो. त्यांच्याबरोबर नाचू लागलो.
सामुदायिक कामात आपणांसही जे करता येईल ते आपण निरलसपणे केले पाहिजे. त्यात लाज कशी बाळगायची? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे. हत्तीने हत्तीप्रमाणे.
साने गुरुजी
(‘श्यामची आई’ ह्या मराठीतील 1935 साली प्रसिध्द झालेल्या उत्कृष्ट पुस्तकातून)