विचारस्वातंत्र्याचा जाहीरनामा

मुग्धा कर्णिक
मुग्धा कर्णिक

(नशिक येथे गेल्या आठवड्यात विवेकजागरच्या मंचावर मुग्धा कर्णिक ह्यांचे विचारस्वातंत्र्य ह्या विषयावर भाषण झाले. त्यांचे हे भाषण म्हणजे विचारस्वातंत्र्यावर मुक्त चिंतनच! विचारस्वातंत्र्याचा जाहीरनामाच!! मुग्धा कर्णिक ह्या मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण विभागात संचालकपदावर कार्यरत आहेत. नवशक्ती दैनिकात पत्रकारितेस सुरूवात करताना  लेखनवाचनाशी त्यांची जुळलेली बांधीलकी आजही कायम आहे.                                                          -सीमा घोरपडे पेज एडिटर)

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या स्मृतीनिमित्त विवेकविचारांच्या या जागरात सहभागी होता आले याचा मला अभिमान वाटतो. जानेवारी महिन्यात आता रोहित वेमुलाच्या स्मृतीचाही जागर आहे. ज्या लोकशाही प्रणालीने आपल्याला इथवर पूर्वीच्या मानाने बरेच बरे दिवस दाखवले तिचे पडते दिवस आता आले आहेत असं म्हणायला हरकत नाही.
आणि म्हणूनच लोकशाही देशांपुढील आव्हाने हा विषय निवडून मी आज बोलणार आहे. काही वैयक्तिक अडचणींमुळे मी भाषणानंतर फार वेळ इथे थांबू शकणार नाही. प्रश्नोत्तरे, चर्चा याला वेळेचे बंधन चालत नाही. पण मला आज ते पाळणे भाग आहे. त्यामुळे मी सर्व उपस्थितांना नम्र विनंती करेन की या विषयावरील चर्चा, प्रश्नोत्तरे अखंड सुरू रहावी. आज संध्याकाळपुरती ती मर्यादित असू नयेत. आज संध्याकाळी मी गेल्यानंतर खंड न पडता ती चर्चा आपण सर्वांनी पुढे न्यावी ही माझी विनंती आहे. विवेक, नास्तिकत्व या कळीच्या प्रश्नांवर सार्वजनिक व्यासपीठांवर चर्चा घडवून आणणारा हा नाशिकचा विवेकसमुदाय लोकशाहीपुढील आव्हानांवरही विचारमंथन करत राहील याची मला खात्री आहे.
लोकशाही कशी यावर अनेक तिरकस विनोद सांगितले जातात. ती कशी वाईट आहे, निरुपयोगी आहे वगैरे उपहास केला जातो. पण सत्य हेच आहे की लोकशाही ही शासनप्रणाली विविध शासनप्रणालींमधली त्यातल्या त्यात कमी वाईट म्हणून आधुनिक जगात स्वीकारली गेली. बहुसंख्येच्या निर्णयानुसार सत्तेवर सरकारे येतात. कधी त्यांचे सरळ बहुमत होते कधी नाही. कधी शासन बरे चालते कधी अत्यंत वाईट. पण यातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो की लोकशाही प्रणालीमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याचा सर्वात कमी संकोच होतो. बहुसंख्येचे सरकार चालले तरीही अल्पसंख्यांचे हक्क शाबूत ठेवले जातात.
कुणाही वेगळ्या विचाराच्या व्यक्तीला, संघटनेला बंदी, मुस्कटदाबी सहन करावी लागत नाही हे लोकशाही तत्वाचे आद्य कर्तव्य असते. विरोधी पक्षाला योग्य तो सन्मान याचाच अर्थ विरोधी विचाराला योग्य तो सन्मान हे तत्व आदर्श लोकशाहीत जपले जाते. आपण गावपातळीवरची लोकशाही, राज्यांतर्गत लोकशाही राजकारण याबद्दल सहजच खूप चर्चा करतो. जिथे अनेकदा लोकशाही मूल्ये धोक्यात आलेलीच असतात. पण आज अशी वेळ आली आहे की जगातील लोकशाही तत्वांचा खून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून जागतिक आणि त्या संदर्भात देशपातळीवरच्या लोकशाहीपुढील आव्हानांची चर्चा करायला हवी.
आज जग एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. गेल्या दोनशेचाळीस वर्षांपासून ज्या लोकशाहीकडे जग पाहात आले त्या अमेरिकेतील या वर्षीच्या निवडणुकीने लोकशाही उमेदवाराच्या निकषांचे सारे आडाखेच बदलून टाकले. स्त्रियांबद्दल वाईट बोलणारा, वर्णद्वेष न लपवणारा, इतर धर्मांचा द्वेष उघड करणारा आणि हे करताना उलटसुलट कोलांट्या मारत खरे काय खोटे काय याची भ्रांत जनमानसात तयार करत त्याचा फायदा उचलणारा डॉनल्ड ट्रम्प हा इसम अमेरिकेत निवडून आला. एका हत्याकांडाच्या जबाबदारीचा दोष ट्रम्पकडे नाही एवढीच त्याची उजवी बाजू.
मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्याला अडीच वर्षे लोटली. ट्रम्प अजून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यायचे बाकी आहेत. अजूनही अध्यक्षपदी आरूढ झालेले नसतानाही त्याने औध्दत्याची जी आतषबाजी सुरू केली आहे ती पाहाता भारताचे पंतप्रधान मोदी कधीमधि सौम्यच वाटावेत. पण गेल्या अडीच वर्षांत मोदी, त्यांचा पक्ष, त्यांचा संघ यांनी ज्या प्रकारे प्रचाराची धुमश्चक्री सुरू ठेवली आहे ती पाहाता वाटावे की हे अजूनही निवडणूक मोडमध्येच आहे. निवडणुकींत विविध पक्ष युध्दपातळीवर कामे करतात. पण यांचे तर युध्द सातत्याने सुरू राहिले आहे. यांची प्रचार सेना अजूनही कोणत्याही इश्यूवर एकदिलाने विरोधकांवर तुटून पडते आहे. सत्य-असत्याची सरमिसळ त्यांना अजिबात वर्ज्य नाही. अलिकडेच प्रसिध्द झालेले स्वाती चतुर्वेदी यांचे आय अम अ ट्रोल- हे भाजपच्या डिजिटल सैन्याच्या गुप्त जगाची झलक दाखवणारे पुस्तक अवश्य वाचा. अर्धवट राजकीय जाण असलेले तंत्रज्ञान अवगत असलेले लोक नोकरीधंद्याला लावून त्यांना विरोधकांना सतावण्याचे, अपमानित करण्याचे, तेजोभंग करण्याचे काम लावून दिले आहे भाजपने. ही बाजारबुणग्यांची फौज… नव्या युगातील नव्या मनूचे शेंदाड शिपाई आहेत हे. त्यांना वठणीवर आणण्याचे काम, या सैन्याला आणि त्यांच्या डिझाइनला पुरे पडणे हे लोकशाहीचे रक्षण करू पाहाणाऱ्या सर्वांचे काम होणार आहे. जणू या धोरणाचाच अंगिकार करून तिकडे ट्रम्प आणि त्यांची ब्राईटबार्टवाली सेना जोरात कामाला लागली आहे. कसलाही विधीनिषेध न बाळगता विरोधकांबद्दल वाट्टेल ते लिहिणे, बोलणे, गलिच्छपणा करणे याला ट्रम्पची केवळ साथच नव्हे तर त्याचा क्रियाशील सहभाग आहे.
मोदी स्वतःही अनेक बेमुर्वत भाषेत लिहिणाऱ्या बोलणाऱ्या लोकांचे ट्विटर हॅन्डल्स फॉलो करीत असतात हे पुराव्यांसह उघड झाले आहे. त्यातील बेशरम धमक्यांवरून त्यांनी आपल्या निष्ठावंत झोंडसैन्याला कधीही रोखलेले नाही, टोकलेले नाही. उलट त्यांना बोलावून घेऊन त्यांचे आदरसत्कार वगैरे करणे सुरू केले आहे.
फरक एक जाणवला- की ट्रम्प हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले असूनही ते लोकशाहीला किती घातक ठरू शकतात याचे समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि राज्यशास्त्रीय विश्लेषण करण्यास अमेरिकन बुध्दीवंतांनी वेळ न दवडता, फार शिस्तबद्ध सुरुवात केली आहे. अनेक वैचारिक व्यासपीठे देशपातळीवर एकत्र येऊन विचार मांडत आहेत.
अमेरिकेत लोकशाही रुजलेली असण्याचे हे द्योतक आहे.
आपल्याकडील चित्र तेवढेसे आश्वासक नाही. विरोधी पक्षैक्याचा बोजवारा सुरूच आहे. आपण सर्व मोदी विरोधकांनी, फॅशिस्ट विचारसरणीला अनुलक्षून, त्यांच्या धर्मवादी विचारकेंद्रावरून त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या निर्णयांतील फसवाफसवी, जुमले वगैरे वरून विरोध केला, रेवडी उडवली. पण जो मुख्य मुद्दा त्याकडे काहीसे वैचारिक दुर्लक्ष झाले हे मान्यच करावे लागेल. मोदी हे अगदी निखळ लोकशाही प्रक्रियेतूनच निवडून आले आहेत. त्यांनी भलेही धर्माधारे बहुसंख्य मागास विचारांच्या लोकांना आपल्याकडे वळवून घेतले. जाहिरातबाजीवर प्रचंड काळा पैसा खर्च करून लोकांची दिशाभूल करून स्वतःला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रस्थापित केले. इतर पक्षांच्या नेतृत्वावर अश्लाघ्य आरोप करून, खालच्या पातळीवरची टीका करून लोकांना रिझवत मूर्ख बनवले. फोटोशॉप उद्योगांनी स्वतःला मोठे करणे आणि त्याच पद्धतीने जिवंत किंवा मेलेल्या इतर नेत्यांना बदनाम करणे हेही त्यांनी केले. कदाचित सिद्ध न होण्याजोगे उद्योग त्यांच्या फौजेने निवडणुकांतही केले असतील- पण तरीही जी काही लोकशाही निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पाडूनच मोदी बहुमताने निवडून आले आणि विजयी झाले आहेत.
लोकशाही निवडणूक प्रक्रियेचा वापर करून लोकशाहीचे शत्रू निवडून येऊ शकतात हे आजवर अनेकदा सिध्द झाले आहे. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या वर्षांत, पूर्वीच्या राजवटींतही लोकशाहीबद्दल यत्किंचितही आदर नसलेले राजे, जमीनदार वगैरे प्रकारांतले उमेदवार निवडून येत राहिले आहेत. त्यात बाहुबळ, धमक्या, भय यांचा वापर उघड होता. त्यातील काहींनी, किंवा त्यांच्या वारसदारांनीही अशाच मार्गांनी पिढ्यानपिढ्या सत्ता मिळवली. कालांतरानंतर थोडीफार लोकशाही तत्वे त्यांच्या किंवा लोकांच्या मनात मुलाम्यापुरती का होईना चढली असतील की नाही शंकाच आहे.
पण सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे तर मोदी आणि त्यांचा पक्ष हा मुळातच लोकशाही प्रक्रियाविरोधी आहे हा मुद्दा विश्लेषणाच्या पातळीवर फारसा पुढे आलेला नाही. राजकीय विरोधकांचे मुख्य विवेचन म्हणून अजिबातच पुढे आलेला नाही.तसा तर हा मुद्दा रिपब्लिकन पक्षाबाबत अमेरिकेच्या डेमॉक्रॅट पक्षानेही पुढे आणलेला नाही. पण तात्विक, वैचारिक विरोधकांच्या लेखनातूनही ते विवेचन भारतात फारसे पुढे आलेले नाही. अमेरिकेत ते सुरू झाले आहे. आणि असे निर्भय लेखन, भाषण, मांडणी या बाबतीत आपण त्यांचे मॉडेल घ्यायला हवे.
एखाद्या ठिकाणी जमून नारेबाजी करणे, आंदोलन करणे यात संख्या पुरेशी दिसली नाही तर हेतू पराभूत होतो. पण वैचारिक लेखन, भाषण, चर्चा, सोशल मिडियातील घणाघात यामुळे टिकाऊ परिणाम दिसू लागतात. मोदींचे २००२मधले उद्योग ‘क्लीनचिट’द्वारे पावन झाले कारण त्यांनी कुठेही स्वतःला प्रत्यक्ष समोर येऊ दिले नव्हतेच. पण एका मोठ्या राज्यात लोकशाहीधर्माचे (जुन्याच मानसिकतेतून आलेले त्यांचे ज्येष्ठ नेते त्याला राजधर्म म्हणतात) पालन न करणारा नेता देशाच्या नेतेपदी निवडणूक प्रक्रियेने बसू शकला यात लोकशाही तंत्राचा विजय आहे. पण याच विजयात लोकशाही तत्वांच्या अंतिम पराभवाची बीजे आहेत. ती बीजे कधीही अंकुरणार नाहीत याची काळजी घेणे हे लोकशाहीपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्याच नव्हे तर जगातल्या सर्व लोकशाही प्रणालींपुढे हेच आव्हान आहे.
हे का होऊ शकले, मोदी किंवा ट्रम्पच्या विजयाबाबत हा प्रश्न मोठा महत्त्वाचा आहे. यात समाजाचे प्रतिबिंब आहेच. पण समाजाच्या एकंदर आकलनक्षमतेच्या संदर्भात कितीही काथ्याकूट केला तरीही या दोन व्यक्तींनी ज्या शक्यता समोर उभ्या केल्या आहेत त्या शक्यतांचा पराभव करण्याची, त्यादृष्टीने विचार आणि कृती होण्याची गरज आजच्याइतकी कधीच नव्हती.
पुरोगामी, स्वतंत्र विचारसरणीच्या व्यक्तींना लोकशाही मूल्य हेच सर्वात जवळचे शासनमूल्य आहे. शासन या आवश्यक कृतीयंत्रणेची गरज काही केल्या मोडीत काढता येत नाही. सर्व बऱ्यावाईट शक्यतांसह शासनयंत्रणा स्वीकारावी लागते- तेव्हा निदान व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होऊ नये म्हणून बहुपर्यायी लोकशाही व्यवस्थाच स्वीकारावी लागते. एकव्यक्तीकेंद्री, एकधर्मकेंद्री किंवा एक विचारसरणीकेंद्री शासनव्यवस्था हा व्यक्तींनी बनलेल्या समाजासाठी शाप ठरतो. कारण त्यात दुसऱ्या विचाराला स्थान असणार नाही याचीच काळजी घेतली जाते.
भारत हे तुलनेने नवजात राष्ट्र असले तरीही या राष्ट्राच्या संस्थापकांनी बहुपक्षीय लोकशाही प्रणाली स्वीकारली. वैचारिक विरोध असला तरीही विचार वेगळा असण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी ही प्रणाली व्यक्तीस्वातंत्र्य, समाजाची मोकळी घडण यासाठी उपकारकच आहे. ते तसे नसून भारतीय समाज हा एका शासकाच्या हाताखालीच रहाण्याच्या लायकीचा आहे, प्राचीन भारतीय धर्मसंस्कृतीच्या वर्चस्वाखालीच रहाण्याच्या लायकीचा आहे असे या देशातील एकमेकाला धरून रहाणाऱ्या आणि गोळवलकरी-हिटलरी मूल्यव्यवस्था मानणाऱ्या वर्गाच्या गळी बालपणापासून उतरवले गेले आहे. हिंदू-वर्चस्ववादी अशी ही विचारसरणी मुळातच लोकशाही विरोधी आहे- अगदी थेट इस्लाम वर्चस्ववादासारखीच. हिंदू वर्चस्ववादी, इस्लामी वर्चस्ववादी, ख्रिस्ती वर्चस्ववादी- थोडक्यात धर्मवर्चस्ववादी, श्वेतवर्ण वर्चस्ववादी, वर्ग वर्चस्ववादी अशा कुठल्याही वर्चस्ववादी विचारसरणीच्या गाभ्यांतील विष अगदी असेच जीवघेणे आहे. व्यक्तीस्वातंत्र्य नष्ट करणे, विचारांचे मुक्तपण नष्ट करणे आणि साच्यातून बाहेर पडलेल्या मनुष्यप्राण्यांच्या झुंडींच्या मदतीने वर्चस्व कायम करत जाणे ही या सर्व वर्चस्ववादी प्रणालींची कार्यपद्धती असावीच लागते.
युरोप धर्मवर्चस्वाच्या, वर्णवर्चस्वाच्या विळख्यात सापडला होता, त्यांनी बऱ्याच अंशी तो तोडला, अमेरिकेनेही हा विळखा बऱ्याच अंशी तोडला होता. भारतातील आणि इतर अनेक देशांतील विचारवंतांच्या घुसळणीतून कुठलाही वर्चस्ववाद झुगारून देऊन लोकशाही प्रणाली स्वीकारल्या गेल्या. हिटलर, मुसोलिनी, स्तालिन नंतर पुन्हा तशाच पोलादी पकडींत जीव गुदमरण्याची वेळ जगातील बव्हंश राष्ट्रांनी स्वतःवर येऊ दिली नाही. माओच्या चीनने मात्र या पकडीतच जगणे पसंत केले. द.कोरिया, कांबोडिया, अरब देश, आफ्रिकेतील काही देश येथेही धर्मवर्चस्व किंवा व्यक्तिवर्चस्वाच्या रगाड्याखाली व्यक्ती अजूनही भरडल्या जात आहेत. तेथे व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार दडपून टाकला गेला आहे. विचार करणे, सत्य जाणणे हा अखेर मानवजातीचा मानबिंदू आहे. पोटभर अन्न-वस्त्र-निवारा मिळाला की माणूस त्याकडे वळतोच. कदाचित् म्हणूनच एका मोठ्या जनसंख्येला नागवण्याचा विचार हुकूमशहा करतात.
जेथे जेथे लोकशाही प्रणाली रुजली तेथे तेथे कोणत्याही विचारसरणीचा शारीर निःपात करणे हे लोकशाही विचाराच्या तत्वातच बसत नव्हते. कू क्लक्स क्लॅनसारख्या अतीव अतिरेकी, विकृत संघटनेवर बंदी येऊ शकली, उघडपणे निओनाझी म्हणवून घेणारांना गप्प बसवणे सोपे होते- पण वरवर सुसंस्कृत, इतिहासातील आपल्या स्थानाचे दाखले देत उघड वर्चस्ववादाची नव्हे पण आपल्याच कथित योग्यतेची खात्री हळुहळू पटवून देणाऱ्या संघटनांना बंदी करणे हे मुळातच लोकशाही तत्वांना धरून नाही.
आज अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षसुध्दा तसा श्वेतवर्ण वर्चस्ववादाच्या तोंडात असूनही त्या वर्चस्ववादी विचाराभोवती घट्ट विणलेला नाही. काही कप्पे अजूनही मोकळे आहेत. पण भारतात मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- त्यातून निघालेला जनसंघोत्पन्न भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या अगदी सर्वात किरकोळ अशा शिंतोड्यांसारख्या संघटना- त्यात राम सेनै आहे, बजरंग दल आहे, अपर्णा रामतीर्थकरांचा बँडबाजा आहे- यांची वीण मात्र एकमेकांशी घट्ट आहे. बालपणापासून मने वर्चस्ववादी भूमिकेत जखडून टाकणे, प्राचीन हिंदू धर्माच्या महतीचा मध आणि इतर धर्मांच्या द्वेषाचे विष असे एकत्र मात्रेत चाटवत आपली बाळे वाढवणे हे यांना पालकत्वाचा गाभा वाटते. पुढे अशिक्षित -अविचारीही- जनसामान्यांतील देवधर्मप्रेमाचा फायदा घेत आपली प्यादी पुढे रेटणे हे या विचारधारेने गेली नव्वद वर्षे करत नेले. इतर धर्मांच्या कट्टर संघटनाही हेच करत असतात. लोकशाही भूमिका असलेल्या विचारी लोकांच्या मनात त्यांचा पार बीमोड करावा असे येणे शक्यच नव्हते. म्हणूनच ते वाढू शकले. आणि आता संधी मिळताच ते लोकशाही ध्वस्त करून धर्मवर्चस्ववादी हुकूमशहाच्या प्रस्थापनेच्या प्रयत्नाला लागले आहेत. लोकशाही मार्गाने लोकशाहीची हत्या करणे जरूर संभवते. तो संभव टाळण्यासाठी केवळ जिवट विचारच उपयोगी आहेत.
एकदा का यांची सत्ता स्थिरावते आहे हे दिसले की सत्ताकांक्षी पक्षांतले अनेक बेडूक इथून तिथे उड्या मारतील, संधाने बांधतील. स्वातंत्र्याचा मार्ग सोडणे, निष्ठा सोडणे सर्वात सोपे असते असल्यांसाठी.
त्यांच्या विषाला उतारा देण्यात भारतीय स्वतंत्रताप्रेमी विचारवंत आणि त्यांच्या अनुयायित्वाने वाढलेले पक्ष अथवा संघटना अपयशी ठरल्या असे आज दिसत आहे. असे का झाले याचा त्यांनीच विचार करावा असा एक शहाजोगपणाचा सल्ला आजकाल नेहमीच देण्यात येतो. त्यात देखत प्रतिगामी विचारांच्या लोकांबरोबरच कुठल्याच राजकीय प्रणालींची नीट माहिती नसलेले लोकही भाबडेपणाने सूर मिसळतात. प्रतिगामी शक्तींच्या लोकशाहीप्रणित विजयाने बावचळून गेलेले अनेक लोकही हा प्रश्न गांभीर्याने स्वतःला विचारू लागले आहेत.
मी इथे स्पष्ट म्हणू इच्छिते की हा प्रश्न विचारण्याची गरज नाही. हा प्रश्न पडून घेण्याची गरज नाही. कारण याची उत्तरे वेगळीच आहेत. जगातले अनेक लोक फार कमी वाचन करतात. या देशातले तर फारच कमी. बहुसंख्यांचे इतिहासाचे, त्यातील महत्त्वांच्या घटनांसंबंधीचे ज्ञान फार तुटपुंजे असते. अनेकदा तर ते केवळ आपल्या परिवाराच्या माहितीच्या चौकटीबाहेर जातच नाही. उदाहरणार्थ- वडील म्हणाले गांधी नादान होते, नेहरू ऐय्याश होते की तीच खात्री निष्ठेने पुढे नेली जाते. संघाची लोकं हलकट असे बाबा म्हणाले की ते तसेच मान्य केले जाते. वास्तव नेमके कसे ते तपासून घेतले जात नाही. त्याबद्दलचे वाचन केले जात नाही. शहरांतही वाचनाचे प्रमाण अत्यल्प आणि दर्जा सुमार. तर गावगाड्यात अडकलेल्यांची कथा काय सांगावी.
धार्मिक परंपरांच्या लचांडात आपतः अडकलेली बहुसंख्या या गरीब देशात पोटापाण्याच्या रोजच्या व्यवहारांत इतकी बेदम अडकलेली आहे की डोक्याला ताप देणारे कोणतेही नवे विचार त्यांना झेपत नाहीत. आठदहा माणसांच्या घरात एक विचार करू पाहणारा माणूस असला तरीही त्याला कुटुंबसंस्थेचा जोरा जेंजारून टाकू शकतो. ही नको इतकी निर्ढावलेली कुटुंबसंस्थाही लोकशाही मूल्यसंवर्धनाला मारक आहे हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही.
परंपरेने या देशाच्या जवळपास पन्नास किंवा पंचेचाळीस टक्के जनतेला म्हणजे स्त्रियांना लोकशाही व्यक्तीस्वातंत्र्याची मूल्ये ही मृगजळासमान आहेत. शहरांतही जे पूर्णतः साध्य होऊ शकलेले नाही ते विचारस्वातंत्र्य ग्रामीण स्त्रियांना अपवादानेच मिळते. व्यक्तिस्वातंत्र्याची मूल्येच मुळात न रुजलेला समाज व्यक्तीकेंद्री प्रभावक्षेत्रात न आला तरच नवल. काँग्रेस पक्षात घराणेशाही चालली याला कारण या समाजातून आलेल्या त्यांच्या अनुयायांची तीच जखडलेली मानसिकता आहे. मातृदेवी संकल्पनेच्या प्रभावामुळे नेतृत्वक्षमता असलेल्या काही स्त्रियांना इथे सत्ता मिळाली असली म्हणजे स्त्रीस्वातंत्र्याचे सार्वत्रीकरण झालेले नाही हे उघड आहे. अशा स्त्रियांत लगोलग दुर्गा वगैरे देवीरुपे पाहिली जातात. सर्वसामान्य स्त्रीने मात्र असले काहीही करायचे नसते. त्यामुळे हा एक मोठा वर्ग जाणीवपूर्वक मठ्ठ राहील असेच समाज वागतो.
अशा परिस्थितीत काँग्रेसपक्षापेक्षा अधिक गडगडून बोलणारा नेता आणि त्याचा पक्ष अनेक लोकांनी आपलासा केला यात विचारवंतांचा पराभव वगैरे काहीही नाही. या एका जुनाट समाजामध्ये अचानक उगवून आलेल्या लोकशाही तत्वांचे आयुष्य पुरेसे खतपाणी न मिळाल्यामुळे कोमेजले आहे इतकेच.
तरीही या समाजाने व्यक्तीस्वातंत्र्याची चव चाखलेली आहे. मोदींच्या स्वमग्न-स्वप्रेमी व्यक्तिमत्वाने फार मोठा उत्पात करायला सुरुवात केली तर हा समाज काय करेल हे अजून पाहायचे आहे.
संघाच्या साच्यात घडलेले किंवा सावलीत बसलेले अनेक लोक रामराज्य- कल्याणकारी राजा म्हणजेच कल्याणकारी हुकूमशहा योग्य असे उघड बोलतात. सध्या त्यांच्यासाठी मोदी हेच त्या पदाचे योग्य उमेदवार आहेत. बायकोला वाऱ्यावर सोडणारा माणूस- देशासाठी घरदार सोडणारा संवेदनाशील देशभक्त ठरवला त्यांनी. सूडासाठी राज्य पेटू दिलेला सामान्य वकूबाचा नेता पुरंधर ठरवला त्यांनी. आणि प्रचारासाठी कामी लागलेल्या वानरसेनेने- ट्रोलसेनेने भरपूर पूल बांधले त्याने पादाक्रांत करावे म्हणून. इतिहासाची मोडतोड करून वाट्टेल ते बोलणारा मुळात अर्धशिक्षित मनुष्य विश्वविजेता ठरवायला वेळ नाही लागला त्यांना.
आणि अलिकडचा हा पाचशे नि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा महामूर्खतेचा निर्णय मोदींनी केवळ स्वतःची व्यक्तिशः ताकद सिद्ध करण्यासाठीच देशाच्या माथी लादला. सगळे बडे मर्जीवाले सुरक्षित झाले होते. पक्षाला तोशीस लागणार नव्हती. पण हा प्रयोग होता- माझ्या थापांना लोक किती प्रमाणात बळी पडतात, किती निमूट सारे सोसतात हे पाहण्याचा. तो त्यांनी पाहून घेतला आहे. हा हुकूमशाही पद्धतीचाच निर्णय आहे. केवळ गोडगोड वाटावीत, आणि कुणीच आक्षेप घेऊ धजणार नाही अशा उद्दिष्टांचे ढोल बडवून त्यांनी जनतेला पुरते हवालदिल केले. अडचणीतील माणसे आणखी अडचण नको म्हणून आला दिवस ढकलत रहातात, बोलत नाहीत- याचा हा वस्तुपाठ ठरला आहे.
मा. मनमोहनसिंग यांनी काय किंवा इतरही विरोधकांनी उद्दिष्टे चांगली पण कार्यवाही वाईट अशी टीका केली. पण या मागचे खरे उद्दिष्ट कथित उद्दिष्टांपैकी एकही नसून- मैं झुकाता हूँ देश झुकता है एवढेच सिध्द करण्याचे होते- आणि ते निंद्य आहे. भिरकावून देण्याच्या लायकीचे आहे.
मोदींचे व्यक्तिमत्व एका अकुशल हुकूमशहाचे आहे हे या घटनेवरून पूर्णपणे स्पष्ट होते. या अकुशल, असंस्कृत हुकूमशहाला आपल्या लोकशाही तत्वांनीच मानेवर बसवून घेतले आहे. बरं- मग पुढे?
आता याला प्रखर विरोध करणे एवढेच स्वातंत्र्यप्रेमी विचारांच्या थोड्या लोकांच्या हाती आहे. २०१९मध्ये पुन्हा एकदा हा गुलामवादी विचार जिंकू शकतो. पण तरीही जी थांबत नाही तीच विचारांची- विचारांच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. जोवर लोकशाही रचना पूर्णपणे नष्ट करत नाही तोवर जोरात आणि नष्ट केल्यास भूमिगत असा हा विरोधाचा लढा चालला पाहिजे. विरोधी राजकीय पक्ष वेगळे, आणि विचारशील स्वतंत्र व्यक्ती वेगळ्या.
भारतीय संस्कृती ही आमचीसुध्दा आहे. त्यातील बरे ते ठेवून हीण ते फेकून देऊन तिचा प्रवाह खळाळता ठेवणारे आम्ही विचारी लोक. आम्ही तुम्हा साऱ्या बिळातल्या ढोलबडव्यांपेक्षा अधिक संस्कृतीप्रेमी आहोत. तुमच्या देशभक्तीच्या फडतूस कल्पना फुंकतो आम्ही.
समाजाला बंदिस्त करून गुलाम बनवण्याच्या असल्या स्वप्नांना आम्ही विचारांनी विरोध करत राहू. त्यांच्या थापाभूलथापा उघड्या पाडत राहू. त्यांच्या आज्ञांना भिणार नाही. ज्या काही संस्था व्यक्तीस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य जपतात त्यांचे रक्षण करू. तरूण मुलांना विचारस्वातंत्र्याचे मोल पटवून देणारी पुस्तके वाचायला लावू- किती पुस्तके बॅन करतील ते? आमची निर्भयता त्यांना अखेर मोडून पाडेल. आमचा सत्यावरचा ठाम विश्वास त्यांना पराभूत करेल. त्यांच्या गोंडस सुभाषितांतून, घोषणांतून, नैतिकतेच्या फोलपटांतून त्यांना आरपार पाहातो आहोत आम्ही. त्यांची ओळख पटवण्यात तेच मदत करणार आहेत- आम्ही फक्त त्यावरचा उदबत्त्यांच्या धुराचा पडदा फेडून टाकू.
त्या देशात श्वेतवर्णवर्चस्ववादाविरुध्द, त्या देशात इस्लामी वर्चस्ववादाविरुध्द, त्या देशात टोळीवर्चस्ववादाविरुध्द आमचेच वैचारिक सहोदर लढणार आहेत. आम्ही इथे हिंदू वर्चस्ववादाचे पडघम वाजू लागताच थोडे उशीरा का होईना जागे झालो आहोत. आम्ही मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या कवायती सैन्याशी, बुध्दीमान गोबेल्सशी कुठल्याही सत्तालोभाशिवाय, अप्रामाणिक धनलोभाशिवाय लढणार आहोत.
आज ज्या पद्धतीने मोदींची प्रचारी सेना, पाठिराखे पक्षीय लागेबांधे नसलेल्या विचारवंतांचा अधिक्षेप करतात, त्यांना फुरोगामी, लुळेपांगळे, सिक्युलर वगैरे अभिधाने देतात, त्यांना पैसा पोहोचलाय का विचारतात त्यावरून त्यांना अशा स्वतंत्र वृत्तीच्या विचारवंतांची भयंकर भीती वाटते आहे हे स्पष्ट होते. अधिक्षेपाचे शस्त्र वापरण्याची त्यांच्यावर वेळ आली हे या भीतीचेच लक्षण आहे. नाकारू देत कितीही.
त्यांचे हे शब्द-अपशब्द गौरवपत्रासारखे मिरवावेत. विचारांच्या पातळीवर ते नेहमीच पराभूत होते. नेहमीच रहातील. सत्याच्या पातळीवर ते नेहमीच पांगळे होते. नेहमीच रहातील. त्यामुळे या धुळवडीकडे सरळ दुर्लक्ष करून विचारस्वातंत्र्य प्रिय असलेल्या सर्व विवेकी लोकांनी आपली कठीण अशी झुंज सुरूच ठेवली पाहिजे. ज्या देशात लोकांना ‘यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भविति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य संभवामि युगे युगे’ यासारखे महाकाव्यातले काव्यात्म वचन एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या स्वरुपात अजूनही खरे वाटते तिथल्या विचारांच्या ग्लानीची भीती वाटण्यासारखीच परिस्थिती आहे. इथे अजूनही लोक एका विचाराला देवाचे रूप देतात आणि मग विचार विसरून जातात. जन्म नि मरण यांच्या सोयरसुतकाच्या अविरत सोहळ्यांत नव्या विचाराचे स्पर्श बुध्दीला हलवून सोडूच शकत नाहीत. विचारांच्या ग्लानीवर उत्तर देतो तो प्रत्येक युगातला नवा विवेकी विचार आणि त्यातून निर्माण झालेली कृती  हे पटवणे कठीण आहे. पण ते पटवले पाहिजे. प्राप्त परिस्थितीशी लढायला उद्युक्त करणारा विवेकवाद आताच्या या मोदीशहासंघरूप संकटाशी झुंजवावा लागेल. धरून चालू त्यांचा पगडा अजून काही काळ कायम राहील. पण अखेर सत्य बाहेर येतेच. आजच त्यांच्या पक्षातील, संघातीलही अनेकांना त्यांचे खरे रूप अलिकडच्या नोटनिर्णयानंतर जाणवले आहे. त्यांच्या स्वभावविकृतीच्या कथा हळुहळू त्यांच्याच आतल्या गोटांतून प्रसृत होऊ लागल्या आहेत. स्वतःवर खूष असलेल्या, राक्षसी महत्त्वाकांक्षी असलेल्या, बोलक्या माणसाचा करिश्मा- रोजच्या पोटापाण्याच्या मागे असलेल्या साध्याभोळ्या लोकांना भुलवतोच याची आपण राज्याराज्यांत अनेक उदाहरणे पाहिली आहेत. मोदी हे त्या सर्वांचे मेरूमणि म्हणायचे. आणि ज्या संघटनेतून त्यांना द्वेषाचे आणि स्वयंश्रेष्ठत्वाचे बाळकडू मिळाले ती संघटना लोकशाहीविरोधी असल्यामुळे त्यांचा धोका फार मोठा आहे. उद्या त्यांचे उजवे हात अमित शहा त्यांची जागा घेऊन आले तर तेही तितकेच धोकादायक ठरतील. या संघटनेच्या विचाराला- अविचाराला थाराच मिळू नये हे साध्य करायचे तर ती झुंज शतकभराची असेल. किंवा अधिक. आत्ताच पुरोगामी का अयशस्वी ठरतात याचे मूल्यमापन करा, ते कधीच जिंकणार नाहीत वगैरे टीकेचा भाग हा त्यांच्या खिजवण्याच्या धोरणाचा भाग आहे. त्याला बळी पडून पराभूत मानसिकता आपण स्वीकारता कामा नये. पल्ला बराच मोठा आहे.
कारण आपला देश, आपले लोक आहेत हे असे आहेत…
देश सोडता येत नसेल, लोक सोडता येत नसतील तर- देशातील लोकांच्या डोक्यांच्या घड्यांवर पाणी ओतत रहाण्यावाचून दुसरा काय पर्याय आहे?
तेच करत राहू या.
मी मांडलेल्या या विवेचनाचे बरेच मोठे श्रेय येल विद्यापीठातील इतिहासाचे, होलोकॉस्ट इतिहासाचे प्राध्यापक टिमथी स्नायडर यांना आहे. त्यांच्या विश्लेषणांतून या विवेचनाला दिशा मिळाली आहे. प्रा. टिमथी स्नायडर यांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी काय करायला हवे या विचाराचे वीस मुद्दे मांडले आहेत. ते मी माझ्या भाषणाच्या अंती, इथे आपल्या सर्वांसाठी तसेच्या तसे देत आहे. हे मुद्दे ऐकत असताना आपल्याकडल्या उदाहरणांचा मी उल्लेख केला नाही तरीही तुम्हाला ती उदाहरणे नक्की आठवतील याची खात्रीच आहे मला.
1- गरज नसताना अगोदरच माना तुकवू नका. बऱ्याचशा अधिकारशहांना जी सत्ताशक्ती मिळते ती लोक स्वतःहून देऊ करत असतात. असल्या कठीण काळात तर अनेक व्यक्ती शासनाला आपण कसं वागलेलं रुचेल याचा विचार करून आधीच तसे वर्तन करू लागतात. तसं करू नका. त्यांना अपेक्षित असलेला आज्ञाधारकपणा आधीच देऊ केलात तर अधिकारशहांना लोकांना आज्ञांकित करण्यातील शक्यता ध्यानी येतात. आणि त्यांची आपल्या स्वातंत्र्यावरील जुलमी पकड घट्ट होत जाते.
2- संस्थेचे रक्षण करा.
न्यायालये, माध्यमे, किंवा वृत्तपत्रे यांचा मागोवा घेत रहा. कुठल्याही संस्थेला आपली मानत असाल तर तिच्यासाठी काही कृती करावी लागेल. संस्था कधीच स्वतःच स्वतःला संरक्षित करू शकत नसतात. त्यांना सुरुवातीपासून विचारसामर्थ्याचे पाठबळ नसेल तर त्या झरझर गडगडत जातात.
3- राष्ट्रनेते आणि पुढारी जर नकारात्मक उदाहरणे घालून देत अशतील तर आपण आपले काम अधिकच न्यायबुध्दीने करणे महत्त्वाचे ठरते. कायद्याचे राज्य मोडीत काढणे वकिलांशिवाय शक्य होत नाही, आणि दिखाऊ खटले चालवणे न्यायाधीशांशिवाय शक्य होत नाही.
4- राजकारण्यांची भाषणे ऐकताना काही शब्दांकडे सावधपणे लक्ष असू द्या.
दहशतवाद, अतिरेकी या शब्दांचा वापर वाढू लागला की सावध व्हा. अपवादात्मक परिस्थिती किंवा आणिबाणीची परिस्थिती या कल्पना मोठ्या धोकेबाज असतात. देशभक्तीच्या फसव्या शब्दयोजनांबद्दल मनात संतापच असायला हवा.
5- कल्पनेपलिकडची अवांच्छित परिस्थिती उद्भवली तर शांत रहा.
दहशतवादी हल्ला झाला असेल, तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की अनेकदा सगळे अधिकारशहा अशा घटनांची फार वाट पाहात असतात. त्यातून त्यांच्या शक्तीचे एकत्रीकरण होत रहायला मदतच होणार असते. राइशटॅगच्या आगीची आठवण ठेवा. असल्या प्रकारची आपत्ती सत्तेचा तोल ढळवायला, विरोधकांना नामोहरम करायला उपकारक ठरते. हिटलरी पाठ्यपुस्तकातला फार महत्त्वाचा धडा आहे तो. त्याला बळी पडू नका.
6- भाषेचा सुज्ञ वापर करा.
सगळेजण एकसाथ जे वाक्प्रचार वापरत आहेत ते वापरणं टाळा. स्वतःची वैचारिक बोली स्वतः घडवा. दुसरे लोक जे बोलत आहेत तेच तुम्ही मांडणार असलात तरीही. झोपण्यापूर्वी इंटरनेट वापरू नका. आपली गॅजेट्स दुसरीकडे चार्जिंगला लावा. आणि वाचा. काय वाचणार? वाक्लाव हॅवेलचे द पॉवर ऑफ द पॉवरलेस, जॉर्ज ऑर्वेलचं १९८४, स्झेस्लॉ मिलोझचे द कॅप्टिव माइन्ड, आल्पर्ट काम्यूचे द रिबेल, हॅना आरेन्डचे द ओरिजिन्स ऑफ टोटॅलिटेरियनिझम, किंवा पीटर पोमेरान्त्सेवचे नथिंग इज ट्रू अँड एव्रीथिंग इज पॉसिबल.
7- वेगळे उठून दिसा.
कुणीतरी असायलाच हवं वेगळं. उक्तीने आणि कृतीने सर्वांसारखंच असणं सोपं असतं. काहीतरी वेगळं करणं थोडं विचित्र, अस्वस्थ करणारं वाटेल. पण थोडं अस्वस्थ झाल्याविना मुक्ती मिळणार नसते. ज्या क्षणी तुम्ही उदाहरण घालून देता, जैसे थेचे गारूड भंग पावते. आणि मग इतर अनेक तुमच्या सोबत चालू लागतात.
8- सत्यावर विश्वास ठेवा.
वास्तव नाकारणे म्हणजे स्वातंत्र्यच नाकारणे. काहीच सत्य नसेल तर मग सत्तेवर कुणी टीकाच करू शकणार नाही, कारण तसं करायला काही पायाच उरत नाही. काहीच सत्य नसेल तर मग सगळाचा देखावा. आंधळं करून सोडणाऱ्या झगझगाटावर कुणीतरी भरपूर पैसा खर्च करत असतं हे कधीही विसरायचं नाही.
9- शोध घेत रहा.
घटनांचे अर्थ स्वतः लावायचा प्रयत्न करा. दीर्घ लेख वाचण्यासाठी वेळ काढा. शोधपत्रकारिता करणाऱ्या प्रिंट मिडियाला आर्थिक पाठबळ द्या. तुमच्या डोळ्यासमोरच्या चकचकत्या पडद्यावरच्या अनेक गोष्टी तुमचे नुकसान करण्यासाठीच तिथे चमकत असतात हे समजून घ्या. विदेशी प्रचाराचा शोध घेणाऱ्या साइट्सबद्दल वाचा.
10- थोडं सक्रीय राजकारण
सत्ताधाऱ्यांना तुम्ही खुर्चीत बसूनबसून थुलथुले व्हावे, तुमच्या भावना पडद्यावरच्या चकचकाटात विरळ विरंजित व्हाव्यात असेच वाटत असते. बाहेर पडा त्यातून. जरा अनोळखी लोकांत, अनोळखी जागी फिरा. नवे मित्र जोडा आणि त्यांच्यासोबत चार पावले चाला.
11- डोळ्याशी डोळा भिडवा, बोला.
हे केवळ विनम्रता दाखवण्यासाठी नव्हे. आपल्या परिसराशी जोडून घेण्यासाठी करावे लागेल. अनावश्यक सामाजिक भिंती पाडण्यासाठी, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही, हे समजण्यासाठी हे करावे लागेल. आपल्याला इतर सर्वांना तुच्छ लेखण्याच्या काळात जगण्याची वेळ आली तर आपल्या रोजच्या जगण्यात डोकावणाऱ्या मनोभूमिकांशी ओळख हवीच.
12- जगात जे घडतं आहे त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल
स्वस्तिके किंवा अशाच द्वेषचिन्हांकडे डोळे उघडून पहा. नजर फिरवून काहीच साध्य होणार नाही. या चिन्हांपासून स्वतःला दूर ठेवा आणि इतरांना तेच उदाहरण घालून द्या.
13- एकपक्षीय राष्ट्राच्या कल्पनेला विरोध करा
ज्याज्या पक्षांनी आजवर एकछत्री सत्ता काबीज केली ते कधीतरी काही काळापूर्वी वेगळे होते. आपल्या विरोधकांना मोडून काढण्यासाठी त्यांनी एखादा ऐतिहासिक क्षण वापरून घेतला. असे होऊ नये म्हणून सर्व निवडणुकांत सहभागी होऊन मतदान करा.
14- चांगल्या कामांना आर्थिक मदत करा
चांगले काम करणारी एखादी संस्था शोधून तिला नियमित मदत करा. यामुळे आपण नागरी समाजाचा एक भाग आहोत आणि स्वतंत्र निवड करू सकतो हे भान जागे राहील.
15- खाजगी अवकाश सांभाळा
हलकटपणे वागणारे सत्ताधारी तुमच्याबद्दलची माहिती वापरून तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. आपला काँप्युटर वेळोवेळी मालवेअरमुक्त करा. इमेल्स म्हणजे खुल्या आकाशावर लिहिण्यासारखेच आहे. इंटरनेटवरील पर्यायी मार्ग वापरून संपर्क करा. किंवा सरळ नेट कमीच वापरा. व्यक्तिगत निरोप व्यक्तिशः प्रत्यक्षच द्यायची सुरुवात करा. कायद्याशी संबंधित काहीही प्रकरणे असतील तर ती लवकरात लवकर निपटून टाका. अधिकारशहांचे राज्य अखेर ब्लॅकमेलवर चालते. कुठल्या हुकाला तुम्हाला टांगायचं त्याचा शोध घेत असते. फार जास्त हूक्स ठेवू नका.
16- इतर देशांकडून शिका. विदेशांत आपले मित्र असू द्या. नवे विदेशी मित्र अवश्य जोडा. इथल्या अडचणींतून एक सार्वत्रिक दिशा दिसते आहे. कुठल्याच देशाला एकेकट्याने उत्तरे मिळणार नाहीत. तुमच्याकडे आणि तुमच्या कुटुंबियांकडे पासपोर्ट्स असतीलच असं पहा.
17- अर्धलष्करीदलांकडे लक्ष असू द्या
व्यवस्थेच्या विरोधात असल्याचं बोबंलून सांगणारे लोक जेव्हा गणवेष धारण करून, मशाली पेटवून कवायती करू लागतात, एखाद्या नेत्याचं चित्र फडकवत फिरतात तेव्हा अखेर जवळ आली असं समजा. नेत्याचे निमलष्करी अनुयायी आणि अधिकृत पोलीस किंवा लष्कर मिसळू लागतात तेव्हा खेळ संपला असंच समजायचं आहे.
18- शस्त्र धारण करण्यापूर्वी विचार करा
सार्वजनिक सेवेचा भाग म्हणून तुमच्याकडे शस्त्र असेल तर देव तुमचं भलं करो आणि तुमचं रक्षण करो. पण भूतकाळात पोलीस आणि शिपाई यांनी केलेली दुष्कृत्ये आठवा. नकार देण्याची मानसिक तयारी ठेवा. याचा अर्थ समजत नसेल तर एखादे होलोकॉस्ट म्यूझियम अवश्य पहा आणि कर्तव्यातील नैतिकता पालनाच्या प्रशिक्षणाबद्दल थोडेसे जाणून घ्या.
19- धैर्यवान रहाण्याचा यत्न करा
आपल्यापैकी कुणीच स्वातंत्र्यासाठी मरायला तयार नसेल तर आपण सारेच स्वातंत्र्याविना मरून जाऊ.
20- देशभक्त असा
नवा अध्यक्ष देशभक्त नाही. अमेरिका काय आहे याचे भान येणाऱ्या पिढ्यांना असावे म्हणून चांगले उदाहरण आपणच घालून द्यायला हवे. त्यांना त्याची फार गरज भासेल.
टिमथी स्नायडर यांनी जणू एक रोडमॅप दिला आहे. जो अमेरिकेलाच नव्हे तर लोकशाही प्रेमी भारतदेशालाही मार्गदर्शक ठरणार आहे.
या देशात लोकशाहीप्रणाली रुजण्यासाठी कारणीभूत ठरलेले गांधी, नेहरू, आंबेडकर असे तत्ववेत्ते नेतृत्व वावरून गेले. त्यांनी या लोकशाहीला जे दिले ते असे सहजी पराभूत होणारे नाही. संतति पित्याच्या विचारांचा पराभव करताना पाहतो आपण. पण खऱ्या चिरंतन मूल्यविचाराचा पराभव फार काळ टिकत नाही.
आपल्या हृदयातली विवेकाची ज्वाळा सतत जळत ठेवण्याची भाषा आपण सर्वांनी शिकायला हवी. भीती ही अत्यंत भीतीदायक गोष्ट आहे हे एकदा स्वच्छपणे कळले की त्यावर मात करायला वेळ लागत नाही.
आपल्या विचारांचे फळ चुटकीसरशी किंवा एकाददुसऱ्या निवडणुकीसरशी नाही मिळणार कदाचित्. पण तरीही हाच विचार खरा आहे. आपली देशभक्ती खरी आहेच आणि आपले मानववंशावरले प्रेम असे कुंपणांत बांधले जाणारे नाही याचे भान असलेल्या अनेकांसमोर मला माझे विचार मांडायची संधी दिलीत याबद्दल मी संघटकांचे मनःपूर्वक आभार मानते.
सत्याचा विजय असो.
स्वातंत्र्याचा विजय असो…
जय हिंद!