‘सच्चा डेरा’ कसा झाला?

(डॉ. अमित शिंदे हे स्त्रीरोगतज्ज्ञ असून लैंगिक शिक्षणावर ते व्याख्याने देतात. अनेक नियतकालिकात ते नियमितपणे लेख लिहीतात.  सच्चा बाबाच्या प्रमुखाला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर डे-याचे खरे स्वरूप उघड झाले. असे ‘सच्चे डेरे’ भारतात कितीतरी क्षेत्रात असतील! अशा डे-यावर प्रकाश टाकत आहेत डॉ.  अमित शिंदे.  -सीमा घोरपडे, पेज एडिटर)

बाबा राम रहीम ‘इन्सान’ हे नाव अन्वर्थक आहे. हा ‘माणूस’ स्वप्रेमी आहे. डेरा सच्चा सौदाचे बहुसंख्य अनुयायी  प्रामुख्याने मागास जातींमधून आलेले आहेत. ‘मस्ताना’ बलुचचिस्तानी नावाच्या अवलियाने या डे-याची स्थापना केली. जातीभेद निर्मूलन, सर्वधर्मसमभाव, समाजकार्य या गोष्टींमुळे हा डेरा समाजातील शोषितांना आपलासा वाटत गेला. त्याचे अनुयायी वाढत गेले. मार्क्सचे ‘धर्म ही अफूची गोळी’ हे वाक्य अनेकांना माहित असते. पण त्याच परिच्छेदात “धर्म हा शोषितांचा हुंकार असतो, ह्रदयहीन जगाचे ह्रदय असते, आत्मा हीन जगाचा आत्मा असतो.” हेही नमूद केले आहे हे अनेकांना माहित नसते. डेराच्या अनुयायांना डेरा का प्राणापेक्षा प्रिय वाटतो याचे उत्तर यात आहे. जो दिलासा त्यांना जातीव्यवस्थेने नाकारला तो त्यांना डे-याने दिला. ‘मस्ताना बलुचिस्तानी’ यांच्या मृत्युनंतर बाबा राम राहीम हा डे-याचा तिसरा वारसदार. डे-याच्या पूर्व पुण्याईच्या बिळावरील हा ऐतखाऊ नागोबा. भोळेभाबडे भाविक त्याच्याकडे मस्ताना बलुचिस्तानी यांचा वारसदार म्हणूनच पाहत आहे. पण हळू हळू डे-याचे रुपांतर एककल्ली साम्राज्यात होत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. सात आठ वर्षांपूर्वी डेरा अनुयायी आणि अकाल तख्त यांच्यात संघर्ष झाला. आरोप होता ईशनिंदेचा. बाबा राम रहीमने गुरु गोविंद सिंग यांच्या वेशात स्वतःची प्रतिमा छापल्याचा अकालींना राग आला होता. या प्रकरणात लक्षात आले की डे-याला होणारा सगळा विरोध प्रामाणिक नाहीये. जातीयवादाची किनार देखील या वादाला आहे. थोडक्यात डे-याच्या अनुयायांमधील आक्रमकतेला अशी पार्श्वभूमी आहे.

अनेकदा वंचित चुकीच्या माणसाला आपला प्रेषित समजतात. शोषितांच्या नावाने सुरु झालेली चळवळ हळूहळू शोषणाचे साधन बनते. धर्माच्या, पक्षाच्या, संघटनेच्या ताब्यात सर्वसामान्य लोकं आपली विचारशक्ती;  ताकद देतात आणि त्याचे ठेकेदार या ताकदीचा वापर त्यांचेच शोषण करण्यासाठी वापरतात. धार्मिक नेता हा धार्मिक संघटनेचे प्रतिकचिन्ह असतो. आपली ब्रॅन्ड इमेज तो इतकी ‘लार्जर द्यान लाईफ’ बनवतो की त्या प्रतिमेच्या तो स्वतःच प्रेमात पडतो. रामरहीम असा नार्सिसीस्ट आहे. ते रंगीबेरंगी कपडे ते सबकुछ  रामरहीम असलेले सिनेमे, तो झगमगाट यातून एक ईश्वरी अवतार प्रगट होतो. मग आजूबाजूच्या लोकांचे सर्वस्व नियंत्रित करण्याच्या राक्षशी शक्तीची त्याला चाटक लागते. हे ‘काही लोकांचे देव’ प्रचंड चार्मिंग असतात. ते आपल्या भक्तांची काळजी घेतात, विचारपूस करतात, मग हळूहळू त्यांच्या आयुष्याची इतकी पकड घेतात की त्यांचा श्वास गुदमरून जावा. त्यांच्या मोकाट सुटलेल्या कल्पनाशक्तीला मग धुमारे फुटू लागतात. काहींना वाटते आपण कृष्ण आहोंत तर काहींना वाटते आपण मुक्तिदाते. समोरची व्यक्ती वरवर विरोध करत असली तरी मनातून स्वर्गीय सुख उपभोगते आहे याची त्यांना खात्री असते. आपण तिच्यावर कृपा करत आहोत अशी त्यांची धारणा असते. अर्थातच हे वास्तव नसते केवळ फँन्टसी असते. आपण ज्या दैवी समर्पणाची अपेक्षा केली होती त्याची पूर्ती आपला भक्त करू शकत नाही हे लक्षात आल्यावर शोध सुरु होतो तो नव्या भक्ताचा. भक्त हा शब्द आता भक्ष असा वाचावा.

ही कथा एकट्या रामरहीमची नाही तर आसाराम, नित्यानंदासह अनेकांची हीच कथा आहे. नव्हे सेक्रेटरीचे शोषण करणाऱ्या बॉसची, कार्याकर्तीचे शोषण करणाऱ्या मंत्र्याची, अभिनेत्रीची परीक्षा घेणाऱ्या निर्मात्याची हीच कथा आहे. नीट बघितले तर गावागावात रामरहीम सापडतील.

डॉ. अमित शिंदे