पेशवाईची अखेर कशी झाली?

(पुण्यावर चाल करून जाणा-या इंग्रज फौजेत 500 महार सैनिक सामील झाले होते. त्या सैनिकांनी अतुलनीय पराक्रम गाजवला ह्यात शंका नाही. परंतु!.. परंतु दुस-या बाजीरावाची कारकीर्द पुष्कळच खिळखिळी झालेली होती. मराठेशाहीच्या अस्ताला कारणीभूत ठरलेले राजकारण कसे घडले? त्या राजकारणाची साधार हकिगत ज्ञानकोशकार ग. वि. केतकर ह्यांनी दिली आहे. -पेजएडिटर सीमा घोरपडे)

बाजीराव रघुनाथ पेशवे (१७७५ – १८५१) – या पेशव्याचा जन्म धार येथे झाला (७ जानेवारी १७७५). दादासाहेब जिवंत असेपर्यंत बाजीराव उर्फ रावबाजी हा त्यांच्याजवळ असे. दादांच्या पक्षपाती मंडळीने स.१७८४त सवाई रावसाहेबांना काढून रावबाजीला गादीवर बसविण्याची खटपट चालविली, पण ती फुकट गेली. यावेळेपासून नाना फडणविसाच्या मनांत रावबाजीबद्दल तेढ बसली. रावबाजी उंच, गोरा, भाषणाने दुस-यावर छाप पाडणारा, धर्मभोळा, भव्य, उतावळा संशयी व अनिश्चित मनाचा होता. स्वतः लढवय्या व मुत्सद्दी नसल्याने आणि भोवतालची बहुतेक सर्व मंडळी हलकट, नीच, फितुरी असल्याने नाना फडणविसाच्या पश्चात रावबाजीच्या हातून मराठी राज्य निभावणें कठिण गेले, तरीहि त्याने शेवटपर्यंत धडपड केली होती व त्याबद्दल कांही इंग्रज ग्रंथकरांनीहि त्याच्याविषयी स्तुतिपर उद्गगार काढलेले आहेत. सर्व आभाळच फाटल्यावर एकटया रावबाजीचे कांही चालण्यासारखे नव्हते.

त्याला जुन्नरास नेऊन ठेवल्यानंतर रावबाजीने तेथून गुप्तपणे सवाईरावसाहेबांशी पत्रव्यवहार चालवून आपल्याविषयी त्यांचे मत उत्तम बनविले. सवाईरावसाहेब वारल्यावर प्रथम यशोदाबाईंच्या मांडीवर दत्तक देऊन गादी चालविण्याचे दरबा-यांचे ठरले. परंतु बाळोबा पागनीस त्यास कबूल होईना व पुण्याचे लोकहि म्हणू लागले की प्रत्यक्ष वंश (रावबाजी) हयात असतां, दत्तक देऊन का घ्यावा? एवढी बातमी समजतांच रावबाजीने बाळोबास वश करून शिंद्यांस चार लक्षांचा मुलुख व दोन कोट रुपये स्वारीखर्च कबूल करून आपल्यास गादीवर बसविण्याचे कारस्थान केले. परंतु शिंदे येण्यापूर्वीच हें कारस्थान समजल्यावरून नानांनीच पुढाकार घेऊन रावबाजीस पुण्यास आणले (१७९६). परंतु शिंदे जवळ आल्याचे ऐकून नाना साता-याकडे गेले व पागनिसाने रावबाजीला त्याच्या दुटप्पी स्वभावामुळे नजरकैद करून व चिमणाजीअप्पास यशोदाबाईंच्या मांडीवर दत्तक देऊन पेशव्यांच्या गादीवर बसविले. इकडे नानानी प्रख्यात महाडचे राजकारण करून रावबाजीस गादीवर बसविले. (ही सर्व माहीती नाना फडणवीस यांच्या चरित्रांत पहा. ज्ञा. को. वि. १६) रावबाजीस नाना अगर शिंदे यांचे वर्चस्व नको होते त्यामुऴे प्रथम त्याने शिंद्याकडून नानांस कैद करविले (१७९७) व अमृतरावास आपला कारभारी नेमले. पुढे शिंद्याला टाळण्याचा त्याचा विचार होऊन त्याने कवायती पलटणे वाढविण्याचा प्रयत्न केला. हा त्याचा प्रयत्न इंग्रजांना समजला होता (१७९८). शिंद्यास कबूल केलेले दोन कोट रु. देण्यासाठी रावबाजीने सर्जेरावास पुण्यांतून पैसा वसूल करण्यास परवानगी दिली, त्यामुळे त्याने पुण्यांतील लोकांचा फार छळ केला (घाटगे पहा). त्यामुळे रावबाजी चिडून त्याने अमृतरावाच्या साहाय्याने शिंद्यास पकडण्याचा बेत केला परंतु आयत्या वेळी त्याचा धीर न होऊन उलट त्याने दौलतरावास अमृतरावाबद्दल सावध केले (नाना फडवणीस पहा). रावबाजीने प्रथम आपण होऊनच सातारकर राजास स्वतंत्रता देऊन नानांचा हस्तक आपटे यास कैद करविले होते. त्यामुळे सातारकर, कोल्हापूरकर आणि दौलतराव एक होऊन त्यांनी दंगा माजविला, शिवाय रावबाजीच्या सैन्यानेहि पगारासाठी दंगा केला. तेव्हा परशुरामभाऊ व नानांची विश्वासु मंडळी यांना रावबाजीने सोडले व भाऊकडून १० लक्ष रु. दंड घेण्याचे ठरविले. भाऊने सातारकराचा दंगा मोडला. इकडे शिंद्यांच्या बायांचे प्रकरण उद्भवले होते, त्याला आंतून रावबाजीची फूस होती ­­(१७९८). अखेर दौलतरावाने नानांस मोकळे केले. (नाना फडणवीस पहा) त्याने सर्वत्र स्थिरस्थावर केले. याच वेळी इंग्रजांनी तैनाती फौजेचा डाव पेशव्यांवर टाकला, पण नानानी तो धुडकावून दिला. रावबाजीने शिंद्यास मुद्दाम पुण्यास ठेवून घेतले याचे कारण त्याला नानांची भीति वाटत होती. पुन्हां एकदां नानानां पकडण्याची खटपट रावबाजीने केली त्यामुळे नानांनी आपले कारभारातील लक्ष बरेचसे कमी केले. रावबाजीने ठरल्याप्रमाणे टिप्पूवरील इंग्रजांच्या शेवटल्या स्वारीत मदत केली नाही त्यामुळे मराठयांना टिप्पूच्या राज्याची वाटणी मिळाली नाही. या वेळी पुन्हा कोल्हापूरकराने व शिंद्याच्या बायांनी त्रास दिल्यावरून परशुरामभाऊंस त्यांच्यावर धाडले, परंतु ते या मोहिमेत गारद झाले. त्यावर भाऊचा पुत्र आप्पा याने कोल्हापूरकराची चांगलीच खोड मोडली, ते राज्य हस्तगत होण्याची वेळ आली इतक्यांत इकडे नानांस देवाज्ञा झाली (मार्च १८००), त्यामुळे पुन्हा सर्वत्र बेबंदशाही माजली. रावबाजीने नानांची सर्व संपत्ति व जहागीर जप्त केली व नानांच्या पक्षाच्या मंडळीस कैद केले. आणि दौलतरावास भाऊंची जहागिरी लुटण्यास परवानगी दिली. याच सुमारास धोंडया वाघाचे पारिपत्य करण्यासाठी इंग्रजी सैन्य पेशव्यांच्या राज्यांतून गेल्याचे दौलतरावास पसंत पडले नाही, त्याबद्दल त्याने पेशव्यांस दोष दिला. होळकराने इंग्रज लोकांच्या चिथावणीवरून शिंद्याच्या प्रांतांत दंगल उडविल्या कारणाने शिंदे तिकडे जाण्यास तातडीने निघाला. फौजबंद शिंदे जोपर्यंत पुण्यांत आहे, तोपर्यंत रावबाजी आपल्या तडाख्यांत सांपडत नाही हे जाणूनच इंग्रजांनी होळकरास चिथावणी दिली होती. त्याप्रमाणे शिंदे तिकडे निघून गेला. यांनतर रावबाजीने ज्या ज्या घराण्यांनी राघोबादादास व स्वतःस त्रास दिला होता त्यांचा नाश करण्याचा उद्योग आरंभिला, त्यांत रास्ते घराणे प्रमुख होते (१८०१). यशंवतराव होळकराचे मनहि रावबाजीविरुध्द होते त्यामुळे इकडे विटोजी होळकर दंगल करीत असता पकडला गेल्याने रावबाजीने बाळाजी कुंजीरच्या सल्ल्याने त्यास हत्तीच्या पायी दिले. त्याचा परिणाम वाईट होऊन यशवंतराव होळकराचे व रावबाजीचे वैर जुंपले. यावेळी यशवंतराव जर आपल्यास २५ लक्षांचीं नजर देईल तर त्यास आपण होळकरशाहीची सरदारकी देऊं असे रावबाजीने जाहीर केले. तिकडे यशवंतरावानें शिंद्याचा पराभव केल्याने त्याने पुण्याहून सर्जेराव घाटग्यास मदतीस बोलविले. या घाटग्यानें पुण्यास लुटण्याचा धुमाकूळ घातला होता व पैशासाठी तो रावबाजीस तगादेहि लावीत होता. तो उत्तरेकडे गेला, परंतु होळकराच्या माने वगैरे सरदारांनी पेशव्यांच्या मुलुखांत धुमाकूळ सुरू केला (१८०२) व थोडयाच दिवसांनी खुद्द यशवंतरावहि पुण्याच्या रोखे आला आणि त्याने पेशवे याचा पुण्यास पराभव केला. यशवंतरावास पुण्यास अमृतराव पेशवे याने बोलावून आणले होते. कारण त्याचे व रावबाजीचे वांकडे आले होते. यावेऴी बाऴोजी कुंजर व चिंतोपंत देशमुख हे कारभारी होते (१८०२ ऑक्टो). रावबाजी पुण्याहून निघून सिंहगडास गेला व तेथून त्याने इंग्रजांकडे मदत मागितली, इतक्यांत होळकराची फौज मागे आल्याने रायगड, सुवर्णदुर्ग वगैरे मार्गाने वसईस तो इंग्रजांकडे येऊन दाखल झाला. तेथे मराठी राज्याची सत्ता ज्यामुळे इंग्रजांच्या हाती सर्वस्वी गेली तो तह रावबाजीने नाइलाजाने इंग्रजांशी केला (डिसेंबर). लागलीच त्यास पश्चाताप होऊन तो मोडण्याचा प्रयत्नहि त्याने सुरू केला. शिंदे व भोसले यांनां त्याने आपल्या मदतीस (होळकराविरुध्द) बोलाविले. इकडे अमृतरावाचे व होळकराचे पुढे पटेना म्हणून होळकरांने पुणे जाळून व लुटून सात कोटींची रक्कम गोळा करून उत्तरेचा रस्ता धरला आणि रावबाजी इंग्रजांच्या मदतीने पुण्यास येऊन पुन्हां गादीवर बसले (१८०३ मे.) त्यामुऴे शिंदे व भोसले यांनां राग आला व त्यांनी होऴकरासहि आपणांस मिऴण्याबद्दल विनविले, पण त्याने ते ऐकले नाही. तेव्हा शिंदे व भोसले यांनीच इंग्रजांविरुध्द लढाईची तयारी चालविली. वसईचा तह ठरविण्यापूर्वी आपला सल्ला रावबाजीने घ्यावयास पाहिजे होता असे त्यांचे म्हणणे होते. इंग्रज सर्व मराठी साम्राज्य काबीज करीत आहेत हे आतां या सरदारांच्या लक्षांत आले व त्यांनी त्याविरुध्द प्रतिकार सुरू केला. परंतु आतां उशीर झाला होता व इंग्रजहि सावध होऊन त्यांनी आपली तयारी जारीने केली होती. आसई येथे इंग्रजांची व या सरदारांची लढाई होऊन सरदार मागे हटले. या लढार्इंत पेशव्यांचे सैन्य इंग्रजांतर्फे लढत होते. परंतु रावबाजीची आंतून सरदारांना मदत होती, बाळोजी कुंजर शिंद्याच्या छावणीत होता (आगष्ट), शिंदे व भोसले यांनी पुढे इंग्रजांशी स्वतंत्र तह केले त्यांत मिळालेला मुलूख इंग्रजांनीच घेतला, फक्त अहमदनगरचा किल्ला पेशव्यांस दिला, व तुम्ही मदत करण्यांत कुचराई केली असा त्यांच्यावर आरोप ठेविला (डिंसेबर). याच वेळी पेशव्यांच्या राज्यांतील बंडाळी मोडण्याच्या निमित्तावर खुद्द पुण्यास इंग्रजांनी आपले बरेच सैन्य ठेविले. तिकडे होळकराने इंग्रजांशी लढाई केली, ती दीड वर्ष चालून, अखेरीस इंग्रजांनां होळकराचा घेतलेला सर्व प्रांत त्यास परत द्यावा लागला. यावेळी रावबाजीने व शिंद्याने होळकरास प्रत्यक्ष मदत केली नाही, मात्र आंतून त्याची सहानुभूति होती (१८०५ नोव्हेंबर).

यावेळी मराठी साम्राज्यवृक्षाच्या सर्व फांद्या तुटून गेल्या होत्या. सालबाईच्या तहाने (१८८३) इंग्रजांनी पेशव्यांचा शिंद्यावरील धनीपणा उडविला होता, मॉनिंग्टनने तैनाती फौजेच्या जोरावर हेंच धोरण पुढे रेटले, पेशव्याने तर आपला पुष्कळच प्रांत आतापर्यंत इंग्रजांना दिला होता, त्याचा परराष्ट्रीय संबंध इंग्रजांच्या हाती होता व तोहि यावेळी त्यांच्याच जोरावर गादीवर स्थिर झाला होता. याचवेळी शिंदे, होळकर, भोसले व गायकवाड यांनी पेशव्यांना एकीकडे सारून स्वतःच इंग्राजांशी तह केले, मराठयांचा प्रतिस्पर्धी मोंगल पातशहा व निजाम हे यापूर्वीच इंग्रजांच्या कबज्यांत गेले होते. याप्रमाणे साधारण ५।६ वर्षांच्या अवधींत पेशवे व त्यांचे सरदार आपल्याच गैरमुत्सद्दीपणाने परतंत्र बनून गेले. आतां त्यांनां आपल्या चुक्या दिसून आल्या, परंतु आता उशीर होऊन गेला.

रावबाजी मुत्सद्दी नव्हता तरी कारस्थाने मात्र पुष्कळ करी, शिवाय ”ज्याच्यावर त्याचा पूर्ण भरवसा बसेल असा यावेळी एकहि माणूस त्याच्याजवळ नव्हता” असे खुद्द डफच म्हणतो. बहुतेक सरदार लोक नाकर्ते, लालचावलेले व कोत्या बुध्दीचे होते. त्यामुळे पेशवा भांबावून जाई व त्याच्या हातून एकहि मसलत पुरी होत नसे. तरी पण डफ म्हणतो की, ”जेव्हां जेव्हां वेळ येई तेव्हा बाजीराव महाराष्ट्रांतील सर्व संस्थानिकांवर व जहागिरदारांवर आपला ताबा आहे हे प्रतिपादन करण्यास केव्हाहि माघार घेत नसे.” इंग्रजांची फौज पुण्यास होती तरीहि एकदा हुजरतने बंडाळी केली, ती इंग्रजांनी खंडेराव रास्त्याच्या हातून नाहीशी केली. इंग्रजानी जवळ जवळ आपल्या हातांत हा कारभार घेतला तरीहि राज्याची स्थिति दिवसेंदिवस वाईट होत चालली. भिल्लांचे बंड (१८०४), मान्याची लूट (१८०५), चतुरंसिंगाचे बंड वगैरे गोष्टी घडल्यानंतर पेशव्यानें प्रतिनिधीस बंदीत टाकून बापू गोखल्यास त्याची बहुतेक जहागीर दिली (१८०७).

क्लोज हा पुण्यास रेसिडेंट असेपर्यंत साधारण वरील प्रकार घडून आले. त्याच्या हाताखाली खुश्रूशेट मोदी होता. त्याचे पेशव्यांशी संधान होते. पुढे क्लोज जाऊन एलफिन्स्टन आला (१८११). हा मोठा खोल मुत्सद्दी होता. त्याने सर्व कारभार आपल्या हातांत घेतला. खुश्रू वगैरे देशी लोकांच्या तंत्राने चालण्याचे रहित केले. पेंढा-यांचा उपद्रव राज्यांत फार झाल्याने पेशव्याने आपल्या जहागिरदारांनां फौजा पाठविण्यांस आज्ञा केली. परंतु याच जहागीरदारांचा बराचसा प्रांत पेशव्याने जप्त केला होता, शिवाय परभारे इंग्रजांनी त्यांनां आपल्या पंखाखाली घेतले होते म्हणून त्यांनी पेशव्यांच्या हुकुमाकडे दुर्लक्ष केले. याचा फायदा घेऊन खुश्रूने (एलफिन्स्टनच्या अंतस्थ सूचनेवरून) पेशव्यांस इंग्रजी फौज ठेवण्यास सांगून, फोर्डच्या हाताखाली, जिच्यांत इंग्रजांच्या ताब्यांतीलच लोक जास्त होते अशी एक मोठी पलटण तयार करविली. इंग्रजांशी लढण्याचा प्रसंग आल्यास ही फौज आयती इंग्रजांनांच उपयोगी पडेल ही गोष्ट पेशव्यांच्या लक्षांत आली नसावी. यावेळी सातारकर चतुरसिंगाने फार धुमाकूळ घातल्याने त्रिंबकजी डेंगळयाने त्याला पकडून कैदेत ठेविले, तेव्हां त्याचा एक तोतया निघाला (१८१२). यावेळी सदाशिवराव माणकेश्वर हा पेशव्यांचा दिवाण होता. हा मूळचा हरिदास, त्यामुळे राजकारणांत कच्चा होता. याच्यावर एलफिन्स्टननें मोदीच्या साहाय्याने शह बसविला. मोदीचा व याचा कर्नाटकच्या सुभेदारीमुळे वाद माजला होता. यावेळी आपली फौज वाढवून (कारण पेशव्यांजवळ सारे अडीच हजार घोडदळ व तीन हजार पायदळ होते) पुन्हां एकदा सर्व सरदारांच्या साहाय्याने इंग्रजांशी लढाई द्यावी असे पेशव्याने मनांत ठरवून पेंढा-याच्या निमित्ताने फौज वाढविण्यास सुरूवात केली व शिंदे, होळकर, भोसले वगैरशी गुप्त तह केले. यावेळी त्रिंबकजी डेंगळे हा पेशव्यांचा मुख्य सलजगार बनला (१८१५). या सुमारास पेशवाई राज्याचा वसूल १ कोट १० लक्षांचा होता, मामलती मक्त्याने देण्यांत येऊं लागल्याने अंदाधुंदी माजली.

इतक्यांत गायकवाडांची भानगड निघाली. गायकवाड अद्यापीहि नांवाचा पेशव्यांचा चाकरच होता, त्याच्याकडील बाकी वसूल करणे व गुजराथचा पुढील इजारा देणे या भानगडी पेशवे व गायकवाड यांच्यांत चालावयाच्या होत्या. त्यांत इंग्रजांचा अर्थाअर्थी संबंध नव्हता, परंतु त्यांच्या जोखमदारीवर गंगाधरशास्त्री पुण्यास आला. बरीच वाटाघाट होऊन अखेरीस फलप्राप्ती न होता बडोद्याच्याच एका पक्षाकडून गंगाधरशास्त्रयाचा खून पंढरपुरास झाला (गायकवाड, ज्ञा. को. १२ पहा). त्याचा आळ इंग्रजांनी त्रिंबकजीवर घेऊन त्यास सैन्याच्या जोरावर ताब्यांत घेतले (१८१५). परंतु त्रिंबकजी त्याला ठेवलेल्या ठाण्याच्या तुरुंगांतून पळाला व पुन्हा गुप्तपणे पेशव्यास येऊन मिळाला (१८१६). या सुमारास माणकेश्वर, मोरदीक्षित व चिमणाजीपंत हे पेशव्यांचे सल्लागार होते. त्रिंबकजीने बरीच फौज जमवून फुलगांवी पेशव्यांचीं गुप्त भेट घेऊन बेत ठरविले, परंतु एलफिन्स्टन यास ही माहिती लागून त्याने या त्रिंबकजीच्या फौजेचा पराभव केला, तसेच तिच्या मदतीस नाशीककडे जी दुसरी फौज गोळा झाली होती तिचाहि (या दोन फौजांची भेट होण्यापूर्वी) इंग्रजांनी पराभव केला. पेशव्यांचे सर्व गुप्त बेत एलफिन्स्टन यास समजत त्यामुळे त्यास ही गोष्ट घडविता आली (१८१७). याप्रमाणे इंग्रज व मराठे यांत उघड युध्द सुरू होऊन त्यांचे दरबारी दळणवळणहि बंद झाले. एलफिस्टनने पुण्यास ठेवलेल्या कुमकी सैन्यास व इतर ठिकाणच्या (नगर, कलकत्ता) सैन्यासहि तयार राहण्यास सुचविले. गर्व्हनर जनरलने डेंगळे हाती आल्यास युध्द बंद करावे असे एलफिस्टन यास गुप्तपणे कळविले होते. पण एलफिन्स्टनने पुण्यसहि वेढा दिला (मे), शेवटी सिंहगड, पुरंदर आणि रायगड हे रावबाजीपासून हस्तगत करून मग वेढा उठविला. त्रिंबकजीस पकडण्यासाठी पेशव्यांनी बक्षिसे लावली तरी तो सापडेना, तेव्हा इंग्रजांनी पुढील अटी पेशव्यांवर लादल्या. आणि शिंदे, होळकर व भोसले हे आपल्या मदतीस येण्याचे लक्षण न दिसल्याने पेशव्यांनी त्या कबूल केल्या. इतर संस्थानिकाशी पत्रव्यवहार इंग्रजांच्या परवानगीने करणे, त्यांचे वकील वगैरे न ठेवणे, तुंगभद्रा-नर्मदा-दोआबशिवाय सर्व राज्य इंग्रजांस देणे, गुजराथचा इजारा गायकवाडास देणे, तैनाती फौजेसाठी कर्नाटक, उत्तरकोकण, अहमदाबाद वगैरे ३४ लक्षांचा प्रांत व नगरचा किल्ला इंग्रजांस कायमचा देणे, इत्यादी अठरा कलमे होती. या तहाने पेशवे हे इंग्रजांचे एक जहागीरदार बनले (मे). याबद्दल पेशव्यांस वाईट वाटून त्यानी बापू गोखल्याकडून पुन्हा फौजेची तयारी करविली, मात्र पावसाळा जवळ आल्याने प्रत्यक्ष चढाईचे धोरण स्वीकारले नाही. चिंतामणराव पटवर्धन, धुळप (आरमाराचा अधिपति), भोसले, मीरखान पेंढारी व होळकर हे पेशव्यांस सामील झाले. शिंद्याने इंग्रजांशी ग्वाल्हेरचा १२ कलमी तह करून (नोव्हेबर १८१७) तो मराठामंडळातून फुटला. पेंढा-यांच्या नाशाच्या सबबीवर पेशव्यांनीं फौज वाढविली. गारपिरावर इंग्रजांनी आपल्या बचावासाठी फौजांची छावणीच ठोकली होती, तेथे पेशव्यांची फौज उतरली. त्यावेळी त्यानी वेळ फुकट घालविल्याने मुंबईची इंग्रजी फौज येऊन पुण्याच्या फौजेस मिळाली. तरीहि बापू गोखल्याने तयारी करून इंगजांवर चढाई केली. गणेशखिंडीजवळ लढाई होऊन दोघांची बरोबरी झाली (५ नोव्हेंबर १८१७). पण मराठी फौज विनाकारणच मागे हटली. त्याचवेळी चढाई करून पुढे जाती तर इंग्रजांचा पराभव झाला असता. स्मिथ हा दुसरी फौज घेऊन घोडनदीहून पुण्याकडे येत होता, त्यास अडविण्यास नारोपंत आपटे गेला, परंतु त्याच्याने तिला थोपविणे झाले नाही. पुढे १२ दिवसांनी पुन्हा येरवाडयास मराठयांचे व इंग्रजांचे युध्द झाले. त्यांत मराठयांकडील अरबांनी व बापू गोखल्यांनी शिकस्त केली, परंतु पेशव्यांनी इंग्रजांस फितूर झालेल्या मराठी सरदाराच्या सल्ल्यावरून बापूस परत बोलविले व आपण सासवडकडे निघून गेले. अर्थात त्यांच्या रक्षणार्थ बापू तिकडे गेले व दुस-या दिवशी शनवार वाडयावर युनिअन जॅक लागले. बापूस जर श्रीमंत परत बोलाविते ना, तर इंग्रजांचा ताबा इतक्या लवकर बसताना. राजधानीजवळ केव्हाहि शत्रूशी युध्द सुरू करू नये असा युध्दशास्त्रांतील सर्वसाधारण नियम असतो, शत्रूच्या मुलुखांत युध्द खेळावे, परंतु तो येथे मोडला गेला पुण्याच्या रयतेने तर आधीच पळ काढला व निव्वळ शेपाऊणशे शिपायांच्या साहाय्याने व बाळाजी नातूच्या फितूरीने भगव्या झेंडयाच्या ठिकाणी लाल बावटा फडकला (१७ नोव्हेंबर).

यानंतर पुष्कळ दिवस (२२ नोव्हेंबर – २० फेब्रुवारी १८१८) पेशव्यानी गनिमी लढाई चालवून इंग्रजांस दमविले, याबद्दल तत्कालीन इंग्रज अधिका-यांनीहि त्यांची प्रशंसा केली आहे. माहुली, कोपरगांव (येथे सातारकर महाराजांस पेशव्यांनी आपल्याबरोबर घेतले) नारायणगाव, (येथे डेंगळे उघडपणे पेशव्यांच्या लष्करांत आला), वाडें, फुलगाव, रावाडी, पाडळी गोकाक, मिरज, सातारा इकडे श्रीमंत गेले. मागे स्मिथ, एलफिन्स्टन, बेल वगैरे इंग्रज सारखा पाठलाग करीत होते. यावेळी सातारकर महाराजांनी फितुरी करून एलफिन्स्टनशी बोलणे चालविले व त्यानेहि तुम्ही पेशव्यांच्या लष्करच्या मागे रहात जा, सवड सांपडताच तुम्हास सोडवून साता-यास गादीवर बसवू असे आश्वासन दिले. मध्यंतरी इंग्रजांनी सातारा घेऊन पेशव्यांच्या विरुध्द जाहीरनामा काढला की, बाजीरावसाहेब राज्याचे उपयोगी नाहीत, याजकरिता त्यास बिलकुल राज्यांतून काढून कंपणी सरकारातून (मराठी राज्याचा) मुलुक व किल्ले काबीज करून अंमल करावा” (फेब्रु १८१८). नंतर स्मिथ हा पेशव्यांच्या मागे लागला व एलफिन्स्टन वगैरे दुसरी टोळी किल्ले घेण्यास गेली. इकडे श्रीमंत सोलापूर-टेंबुर्णीवरून गोपाळाच्या अष्टीस आले. स्मिथने तांतडी करून येथे त्यानां गांठले. येथे आप्पा देसाई निपाणकराने फितुरी केली. बापूने श्रीमंतांस पुढे जाण्यास सांगितले असता आप्पाने आपण इंग्रजाशी लढतो. असे सांगून श्रीमंतास ठेवून घेतले व स्मिथ चालून आला तेव्हा ”झाडयाचे निमित्त करून” आप्पा पसार झाला. अशा अडचणीत पेशवे वैतागून ते बापूस टाकून बोलले. हया तिरीमिरीत बापूनी त्यानां शेवटचा नमस्कार करून स्मिथवर चालून गेले. घनघोर युध्द होऊन बापूनी स्मिथची तीन वेळ फळी फोडून अखेर आपला प्राण स्वामीकार्यी अर्पण केला (२० फेब्रु). ठरल्याप्रमाणे येथे सातारकर राजे इंग्रजांच्या गोटात जाऊन दाखल झाले (प्रतापसिंह छत्रपति व गोखले बापू, ज्ञा.को.वि.१७ व १२ पहा). इकडे एलफिन्स्टननें सिंहगड, पुरंदर वगैरे किल्ले घेऊन प्रतापसिंहास साता-याच्या गादीवर बसविले. कर्नाटकांतील सर्व किल्ले, ठाणी वगैरे घेऊन मनरो हा पुण्याकडे येण्यास निघाला. नागपुराकडे आप्पासाहेब भोसल्याने इंग्रजांवर हल्ला केला, पण तेथेहि फितुरीमुळे (दारूच्या पोत्यांऐवजी बाजरीची पोती निघाल्याने) भोसल्यांचा पाडाव होऊन, तो इंग्रजांच्या हाती लागला. मल्हारराव होळकराने मालकमशी तोंड दिले, त्यांत मल्हाररावांचाच मोड होऊन त्याने त्याच्याशी तह केला. याप्रमाणे यावेळी श्रीमंत एकटे पडले.

 

पेशवे अष्टीहून निघाले, तो त्यांनी कोपरगावाहून उत्तरेकडे मोर्चा फिरविला. येथे पटवर्धन सरदारांनी त्यांनां सोडले आणि खुद्द चिमाजीआप्पा, नारोपंत आपटे, आप्पा देसाई वगैरे मंडळी इंग्रजांच्या स्वाधीन झाली. श्रीमंत हे चांदा, पांढरकवडा, सिवणीवरून अशीरगडाजवळ धूळकोटास आले. नर्मदापार शिंद्याकडे जाण्याच्या वाटेवर मालकम बसला असल्याने शेवटी हताश होऊन त्यानी महूस मालकमकडे वकील पाठविला. यावेळी पेशवे जेर झाले होते, त्यांचे सर्व अश्रित त्यांनां सोडून गेले, कोणाकडूनहि त्याना मदत मिळेना, जवळ फक्त अरब वगैरे आडदांड लोक होते, तेहि पगारासाठी बंड करण्यास तयार झाले होते. अशा कचाटीत श्रीमंतानी मालकमशी बोलणे लाविले. मालकमहि तेथे आला व त्याने आपल्या जबाबदारीवर सालिना ८ लक्षांची जहागीर खुद्द पेशव्यांना कबूल केली आणि शेवटपर्यंत त्याच्यापाशी टिकून राहिलेल्या दोन तीन सरदारांना तोशीस न लावण्याचेहि कबूल केले. या शर्ती फार सढळ आहेत असे हेस्टिंग्जनें म्हणून अखेर त्या करार केल्या, मात्र आपण दक्षिणेस परत जाणार नाही व पेशवाईच्या गादीवर हक्क सांगणार नाही असे पेशव्यांकडून इंग्रजानी कबूल करवून घेतले. नंतर त्यांच्या पसंतीप्रमाणे ब्रह्मावर्त येथे त्यांना नेऊन ठेविले (जून १८१८).

ब्रह्मावर्ताचे राज्य सुमारे ६ चौरस मैलाचे होते. तेथे एक इंग्रज रेसिंडेट राहत असे, राज्याची लोकसंख्या १०-१५ हजार होती. यापुढे श्रीमंताचे व इंग्रजांचे संबंध स्नेहभावाचे होते. पेशव्यांनी इंग्रजांना एवढा ६ लक्ष रूपये देणगी दाखल देऊन १ हजार सैन्याचीहि मदत केली होती. येथे त्यांचे लक्ष धार्मिक कृत्यांत विशेष गढले, त्यानी तेथे देवळे, घाट वगैरे बांधले. त्यानी पुण्यास असता ६ लग्ने केली होती ब्रह्मावर्तास गेल्यावर आणीक ५ केली तेथे त्याना ३ मुली झाल्या, त्यापैकी एक कुसुमबाईसाहेब (बयाबाई आपटे) या होत्या, एक मुलगा झाला, पण तो वारला म्हणून त्यांनी ३ मुले दत्तक घेतली (नानासाहेब, दादासाहेब व बाळासाहेब) आणि आपला वारसा त्यापैकी नानासाहेबांस देण्यास इंग्रजास कळविले. त्यास इंग्रजांनी रुकार दिला होता. श्रीमंतांनी आपली शिल्लक इंग्रजांच्या रोख्यांत गुंतविली होती. ब्रह्मवर्तास याप्रमाणे ३३ वर्षे घालविल्यानंतर श्रीमंत बाजीराव रघुनाथ उर्फ बाबासाहेब पेशवे यांना १४ जानेवारी १८५१ रोजी देवाज्ञा झाली. श्रीमंतानी अग्निहोत्र घेतले होते म्हणून त्याचा अंत वेदीजवळ झाला. उत्तरकार्य नानासाहेबांनी केले. और्ध्वदेहिक व दान वगैरे कार्यास तीन लक्ष रु. खर्च आला. यावेळचे भूमिदानविषयक हृदयद्रावक वर्णन रघुनाथराव विंचूरकराने समक्ष पाहून केले आहे.

ज्ञानकोशवरून